Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

लोकमानस

लाचारी सोडा! ‘भीमबाणा’ दाखवा!

 

लोकसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक नुकसान कुणाचे झाले असेल, तर ते आंबेडकरी चळवळीचे झाले आहे. आंबेडकरी चळवळीतील सर्वच रिपब्लिकन नेत्यांचा दारूण पराभव झाला. (की काँग्रेसने केला?) राज्यात आणि देशात सर्वत्र काँग्रेसला घवघवीत यश मिळाले अन् दोन्ही काँग्रेससोबत आघाडी करणाऱ्या रिपब्लिकन गटांच्या वाटय़ाला पराभव आला. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, डॉ. राजेंद्र गवई, सुलेखा कुंभारे, टी. एम. कांबळे, यशवंत मनोहर असे एकापेक्षा एक उमेदवार पराभूत झाल्याने आंबेडकरी चळवळीत नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषत: दोन्ही काँग्रेसना सोबत करणाऱ्या रामदास आठवले आणि राजेंद्र गवई यांचाही पराभव झाल्याने तो जनतेच्या जिव्हारी लागला आहे.
लोकसभेच्या निकालानंतर रामदास आठवले व राजेंद्र गवई यांनी दोन्ही काँग्रेसनेच आपणांस पाडल्याचा आरोप केला. शिर्डी मतदारसंघात संपूर्णपणे काँग्रेसचे वर्चस्व असताना तिथे नवखे उमेदवार वाकचौरे विजयी व आठवलेंसारखा मातब्बर उमेदवार पराभूत, हे कसे घडले? यामध्ये जातीयवादाने डोके वर काढले. ज्या ज्या मतदारसंघात रिपब्लिकन नेते उभे होते तिथे तिथे सेना- भाजपसह काँग्रेस-राष्ट्रवादीने जातीयवादी पातळीवर जाऊन प्रचार केला. ‘बौद्धांपेक्षा ‘हिंदू दलित’ बरे’ असाच एकमेव सूर सर्वच राखीव मतदारसंघातून व्यक्त झाला. त्यासाठी निरनिराळे मुद्दे निरनिराळ्या मतदारसंघांत उपस्थित करण्यात आले. अखेर बहुसंख्याक समाजाने रिपब्लिकन नेत्यांना नाकारले. रिपाइं नेत्यांचा हा पराभव महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा ठरणार, हे निश्चित!
रामदास आठवले कधी नव्हे ते काँग्रेस- राष्ट्रवादीविरोधात बोलण्याचे धाडस त्यांनी दाखवले. मात्र एकीकडे आठवले दोन्ही काँग्रेसवर एकमागून एक आरोप करीत आहेत तर दुसरीकडे तेच आठवले ‘पराभवाचे प्रायश्चित्त म्हणून काँग्रेसने मला राज्यसभेवर निवडून देऊन केंद्रात मंत्रीपद द्यावे’ अशी जोरदार मागणी करत आहेत आणि हे न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत रिपाइं वेगळा विचार करेल, असे म्हणत मनसेचेही कौतुक करून काही संकेत दिले आहेत. आठवलेंच्या पक्षाचे कार्यकर्ते राज्यभर ठिकठिकाणी दोन्ही काँग्रेसचा निषेध करीत आहेत. परंतु ही निदर्शने मोठय़ा प्रमाणावर नाहीत हेही सत्य आहे.
राजेंद्र गवई यांनी विधानसभेसाठी गवई गटाला काँग्रेसने २५ जागा न सोडल्यास २८८ जागा लढवण्याचा निर्धार केला आहे. शिवाय आठवले यांनी पुन्हा एकदा रिपब्लिकन ऐक्याचा राग आळवताच अ‍ॅड्. प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टपणे रिपब्लिकन ऐक्य शक्य नसल्याचा पुनरुच्चार केला. या पाश्र्वभूमीवर आंबेडकरी चळवळीत सामान्य माणसांपर्यंत आपल्या नेत्यांच्या स्वार्थी राजकारणाबद्दल तीव्र संताप व्यक्त होतोय. विशेषत: रामदास आठवले यांचा दोन्ही काँग्रेसने निवडणुकीच्या निमित्ताने घोर अपमान केलाय. त्यांचे एवढे अवमूल्यन होऊनही गवई व आठवले यांनी एका- एका जागेच्या बदल्यात काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत आघाडी करून निवडणूक लढवली आणि काँग्रेसी राजकारणाने दोघांनाही धूळ चारली. असे असतानाही हे दोन्ही नेते अद्यापही काँग्रेसना ‘धडा’ शिकवण्याची बात न करता उलट त्यांची ‘लाचारी’च करताना दिसतात, हे लाजिरवाणे आहे. रोज टीव्हीवर रामदास आठवले ‘मला राज्यसभेवर पाठवा म्हणताना दिसतात, तेव्हा आपल्यावर एवढी लाचारीची वेळ का यावी, असा विचार पडतो व तळपायाची आग मस्तकात जाते.
वीस वर्षे काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत जाऊन फायद्यापेक्षा तोटाच अधिक सहन करावा लागला. सर्वच निवडणुकांत काँग्रेस- राष्ट्रवादीकडून विश्वासघात, दगाबाजी झाली. सत्तेतही पुरेसा वाटा दिला नाही की समाजाचे फार मोठे प्रश्नही सोडवले नाहीत. तरीसुद्धा एक आमदारकी व एक खासदारकी यांच्या बळावर ‘जातीयवादी’ शक्तींना रोखण्यासाठी कायम रिपाइं नेत्यांनी काँग्रेसला साथ दिली. पण पक्षाला, आंबेडकरी समाजाला काय मिळाले?
आता वेळ आली आहे लाचारी सोडण्याची! भीमबाणा दाखवण्याची! लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढायचे असेल, तर सर्व रिपब्लिकन गटांनी डाव्या पक्षांप्रमाणे ‘किमान समान कार्यक्रम’ ठरवून एकत्र येऊन आगामी राज्य विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढवायला हव्यात. राजकारणातील हाडवैरी निवडणुकीच्या वेळी एकत्र येऊ शकतात, मग एकाच पक्षाचे विविध गट किमान निवडणुकीपुरते तरी का एकत्र येऊ शकत नाहीत? निश्चय केला तर ते शक्य आहे. स्वाभिमानाचे जगणे व ‘भीमबाणा’ हाच खरा. आंबेडकरी चळवळीतील सर्वच नेत्यांनी या पराभवाचे चिंतन करून विधानसभा निवडणुकीत धवल यश मिळविण्याबाबत नवे पर्याय शोधायला हवेत.
संदेश पवार, अडेरे, चिपळूण

राजकीय पोळी भाजली नाही म्हणून हा आक्रोश
रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवलेंचा शिर्डी मतदारसंघात दारुण पराभव झाला आणि रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेसच्या नावाने शिमगा केला. परंतु त्याचा काँग्रेस- राष्ट्रवादीवर कोणताही परिणाम झाला नाही आणि आठवले समर्थक मात्र शांत झाले. मुळातच रामदास आठवले यांनी धर्मनिरपेक्ष पक्षांना मदत करण्यासाठी आणि धर्माध शक्तींना विरोध करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीशी लगट करून स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला. रामदास आठवले यांना ना दलितांची ना कार्यकर्त्यांची पर्वा. ‘मला मंत्रीपद हवे’ या एकाच अटीवर त्यांनी आता काँग्रेसला तीन महिन्यांचा अवधी दिला आहे. वास्तविक तीन महिन्यांऐवजी तीन दिवसांचा अवधी त्यांनी का दिला नाही? आता दलितांचे ऐक्य करायचे सोडून ते लाचारीने मंत्रिपद मागत आहेत याला काय म्हणावे? इतका लाचार दलित नेता उभ्या महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही.
अरुण खटावकर, लालबाग, मुंबई

युतीच्या राजकारण्यांचे बेगडी हुतात्मा प्रेम
युतीच्या उमेदवारांनी हुतात्मा चौकात जाऊन हुतात्म्यांचे आशीर्वाद घेतल्याचे छायाचित्र पाहून (३० एप्रिल) महाराष्ट्र राज्य निर्मितीतील एक आंदोलक व हुतात्म्याचा आप्त म्हणून संतापच आला. कारण ही मंडळी ४० वर्षांत कधीही २१ नोव्हेंबर या हुतात्मादिनी स्मारकावर फिरकली नव्हती.
१ मे १९६० साली महाराष्ट्र स्थापनेनंतर १९६१ साली त्या लढय़ाचे नेतृत्व केलेल्या संयुक्त महाराष्ट्र समितीने लोकवर्गणीतून हे हुतात्मा स्मारक उभारले, त्याच दिवशी सं. म. समिती संपुष्टात आली. आणि राज्य रौप्य महोत्सवी वर्षांपर्यंत या स्मारकापाशी २१ नोव्हेंबर या हुतात्मा दिनी हुतात्मा आप्तांशिवाय एकही राजकीय नेता फिरकला नव्हता. इतकेच नव्हे तर निवडणुकांतून मतदारांना या हुतात्म्यांच्या नावाने साकडे घालणाऱ्या राजकीय पक्षांनी हुतात्मा स्मारकाला व हुतात्मा आप्तांना मात्र वाऱ्यावर सोडले होते. (त्याचे पुरावे माझ्यापाशी आहेत.)
राज्य रौप्यमहोत्सवी वर्षांत गोवा सत्याग्रहींप्रमाणे संयुक्त महाराष्ट्र आंदोलकांना शासनाने मान्यता देऊन मानधन सुरू करावे, असे माझे पत्र लोकसत्तातून प्रसिद्ध झाले. त्या पत्राच्या प्रती काढून मुख्यमंत्री व मुंबईतील मराठी आमदारांकडे निवेदनांसह पाठविल्या. परंतु मुख्यमंत्री कार्यालय व एकमेव आमदार छगन भुजबळ यांनी पाठविलेल्या पोच- पावतीशिवाय कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. आमदार केशवराव धोंडगे यांच्याकडे मी केलेल्या पाठपुराव्यामुळे हुतात्मा आप्तांना पेन्शन सुरू झाले. दरम्यान, महापौर छगन भुजबळ यांनी हुतात्मा स्मारक सुशोभीकरण करताना स्वत:चे नाव मात्र चकचकीत ताम्रपटात तर हुतात्म्यांची नावे तकलादू धातूमध्ये तयार करून शिल्पावर फेव्हिकॉलने चिकटविली. वर्षभरात ती एकामागोमाग गळून पडत रिडल्स मोर्चामुळे संपूर्ण नष्ट झाली.
एकाही राजकीय नेत्याने ती नावे पुनरपि झळकविण्यासाठी कष्ट घेतले नाहीत. लोकसत्ता हुतात्मा नातेवाईक शोध समितीचे वसंत शिंदे व मी वर्षभर एकत्र बसून १०६ हुतात्म्यांच्या नावांची यादी तयार केली. शासन व पालिका प्रशासनाकडे सदर यादी सुपूर्द केल्यावर पालिकेने जुलै १९९० मध्ये सुवर्णाक्षरात ती स्मारक शिल्पावर झळकविली. तत्कालीन मुख्यमंत्री सर्वश्री शरद पवार, मनोहर जोशी व नारायण राणे यांना निवेदनासह सदर हुतात्म्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करावीत म्हणून विनंती केली. परंतु आजमितीस १०६ हुताम्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध झाली नाहीत. यावरून १ मे या महाराष्ट्र दिनी हुतात्म्यांना अभिवादन करणाऱ्या राजकीय नेत्यांचे बेगडी हुतात्मा प्रेम सिद्ध होते.
दत्ता घाडीगांवकर, लालबाग, मुंबई