Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

कोल्हापुरात आजपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
अमोल गुप्ते उद्घाटक; सुलोचना, भानू अथय्यांचा विशेष सन्मान
कोल्हापूर, २ जून / विशेष प्रतिनिधी
जिल्हा प्रशासन व एनडीटीव्ही ल्युमिएर यांच्या सहकार्याने कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीने आयोजित केलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने आज कोल्हापूरच्या सांस्कृतिक क्षेत्रात एक नव्या पर्वाला प्रारंभ होत आहे. ‘तारे जमीं पर’चे लेखक व अभिनेते अमोल गुप्ते यांच्या हस्ते सायंकाळी ठीक ६ वाजता केशवराव भोसले नाटय़गृहात महोत्सवाचे उद्घाटन होत आहे.

सांगली पालिकेच्या २००० पासूनच्या व्यवहारांचे विशेष लेखापरीक्षण होणार
सांगली, २ जून / प्रतिनिधी

सांगली महापालिकेच्या सन २००० ते २००६ या कालावधीचे विशेष लेखापरीक्षण केले जाणार आहे. त्यामुळे या कालावधीतील बीओटी व भूखंड घोटाळ्यासह अनेक गैरप्रकारही उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून काँग्रेसची सत्ता आहे. या कालावधीत अनेक घोटाळे उघडकीस आले आहेत. सन १९९८ ते २००० या कालावधीतील विशेष लेखापरीक्षणही काही वर्षांपूर्वी झाले होते. त्यात मास्टर दीनानाथ मंगेशोत्सवासह अनेक गैरप्रकारावर प्रकाश पडला होता. आता पुन्हा सन २००० पासूनचे विशेष लेखापरीक्षण केले जाणार आहे.

मिळकतीवर संस्थानकालीन ब सत्ताप्रकार बदलासाठी लवकरच वटहुकूम- कदम
कोल्हापूर, २ जून/ विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर शहरामध्ये संस्थानकाळापासून असलेल्या मिळकतीवर लावण्यात आलेला ‘ब’ सत्ताप्रकार बदलण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांमध्ये दुरूस्ती करून प्रत्येक मिळकतनिहाय छाननीऐवजी गटनंबरनिहाय एका प्रकरणाची छाननी करून संबंधित मिळकत अ अथवा क सत्ताप्रकारामध्ये कायमस्वरूपी करण्याविषयी लवकरच वटहुकूम काढण्यात येईल असे आश्वासन महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सोमवारी कोल्हापूरवासियांच्या एका व्यापक शिष्टमंडळाला दिले.

महाराणा प्रताप पुतळ्याची बेकायदेशीर प्रतिष्ठापना
मंडळ अध्यक्षाविरुद्ध गुन्हा
सोलापूर, २ जून/ प्रतिनिधी

महाराणा प्रताप जयंतीनिमित्त शहरातील सात रस्त्यासारख्या मध्यवर्ती भागात भर चौकातील आयलँडमध्ये बेकायदेशीरपणे महाराणा प्रताप यांच्या अर्धपुतळ्याची प्रतिष्ठापना केल्याप्रकरणी संबंधित सार्वजनिक मंडळाच्या अध्यक्षाविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सात रस्त्याच्या चौकात आयलँडमध्ये महाराणा प्रताप जनहित संघटनेच्या वतीने विद्युत रोषणाई करून महाराणा प्रताप यांच्या अर्धपुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यासाठी सोलापूर महापालिकेकडून आवश्यक परवानगी घेण्यात नव्हती. परंतु चार दिवसांच्या या जयंती उत्सवानंतर अखेर पोलिसांनी त्याची दखल घेऊन संघटनेचे अध्यक्ष भारत मनसावाले यांच्या विरुद्ध सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीकरण कायद्याखाली गुन्हा दाखल केला. शहरात अलीकडे महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी साजरी करण्याचे प्रमाण प्रमाणापेक्षा वाढले आहे. त्यामुळे पोलिसांवरील ताण वाढत चालला आहे. यातच मोक्याच्या चौकात आयलँडमध्ये घुसखोरी करून महापुरुषांचे पुतळे बसविण्याची प्रथा सुरू झाली आहे. यात महापुरुषांचे विचार अंगीकारण्याऐवजी समाजाच्या अस्मिता जागविण्याचेच प्रयत्न होताना दिसून येतात. पुतळे बसविण्यासाठी महापालिकेकडून आवश्यक परवानगी घेण्याची गरजही संयोजकांना वाटेनाशी झाल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

अ.भा. मराठी साहित्य महामंडळावर सोलापूरच्या पद्माकर कुलकर्णीची निवड
सोलापूर, २ जून / प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यकारिणीवर सोलापूरचे पद्माकर कुलकर्णी यांची फक्त एका मताने निवड झाली. पुण्यात साहित्य परिषदेत झालेल्या निवडणुकीत श्री. कुलकर्णी हे दोघाजणांचा पराभव करून निवडून आले. त्यांच्या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्य़ास प्रथमच साहित्य महामंडळावर जाण्याची संधी मिळाली. या निवडणुकीत सात इच्छुकांपैकी चौघाजणांनी माघार घेतली. त्यानंतर झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत वध्र्याचे डॉ. भगवान ठाकूर यांना ३, मंचर-घोडेगावचे डॉ. पुरुषोत्तम काळे यांना ८ तर सोलापूरचे पद्माकर कुलकर्णी यांना ९ मते मिळाली. अवघ्या एका मताने कुलकर्णी यांचा विजय झाला. त्यांच्या निवडीनंतर पुणे साहित्य परिषदेचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे.कुलकर्णी हे २००६ मध्ये पुण्याच्या मसापच्या कार्यकारिणीवर निवडून आले. साहित्य परिषदेच्या साहित्य पत्रिका, विभागीय साहित्य संमेलन, नाटय़ विभाग आदी समित्यांमध्ये ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय सोलापूरच्या साहित्य परिषदेवर ते उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. साहित्य क्षेत्राबरोबरच इयत्ता चौथी आणि आठवीच्या बदललेल्या नवीन अभ्यासक्रमाच्या मराठी विषयाच्या स्वाध्याय पुस्तिकेत लेखन-संपादन मंडळावर त्यांनी काम केले आहे. प्राथमिक शिक्षकांच्या निवडश्रेणी अभ्यासक्रमातही त्यांनी लेखन केले आहे.

सोलापुरात आयआरसीतर्फे डॉ. सय्यद यांचे उद्या व्याख्यान
सोलापूर, २ जून/प्रतिनिधी
इस्लाम धर्माची समाजाला वस्तुनिष्ठ ओळख व्हावी आणि या धर्माविषयक असलेले समज-गैरमसज, पूर्वदूषित ग्रह दूर व्हावेत या उद्देशाने सोलापुरात इस्लामिक रीसर्च सेंटरच्यावतीने (आयआरसी) गुरुवारी ४ जून रोजी डॉ. शुएब सय्यद (मुंबई) यांचे ‘इतर धर्मांमध्ये ईश्वराची संकल्पना’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हुतात्मा स्मृतिमंदिरात सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या या खुल्या व्याख्यानासाठी सर्व धर्मियांना आमंत्रित करण्यात आले आहे. अध्यक्षस्थान पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय हे भूषविणार असून यावेळी ते स्वत ‘इस्लाम- शांतीचा मार्ग’ या विषयावर अभ्यासपूर्ण विचार मांडणार आहेत. याबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष मो. सादिक अडते यानी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डॉ. शुएब सय्यद हे पीस टीव्हीवरील इस्लाम धर्माचे तत्त्वचिंतक वक्ते म्हणून सुपरिचित आहेत. वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केल्यानंतर अध्यात्म मार्गाकडे वळले, असे अडते यांनी सांगितले. यावेळी याकूब मंगलगिरी हे उपस्थित होते.

टँकरच्या कमी खेपांची अंकले ग्रामस्थांची तक्रार
जत, २ जून / वार्ताहर
कायम दुष्काळी जत तालुक्यातील अंकले गावाला सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राजकीय हस्तक्षेप व तालुका प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे पाण्याच्या खेपा व्यवस्थित केल्या जात नाहीत. तसेच गावाखालील सरगर व खराडे वस्तीला या पाणीपुरवठय़ापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात आहे. या वस्त्यांना पाणीपुरवठा व्यवस्थित न केल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य काशिलिंग खामकर व भाऊसाहेब सरगर यांनी दिला आहे. पाच हजारांवर लोकसंख्या असलेल्या अंकले या गावाला सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या गावाला नळपाणीपुरवठा योजनाही मंजूर आहे, मात्र दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या ओढापात्रात या योजनेची विहीर आहे. पण या विहिरीत थेंबभरही पाणी नाही. त्यामुळे सध्या या गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

शिवज्योतीसह शिवभक्तांचा ताफा सोलापुरातून रायगडला रवाना
सोलापूर, २ जून / प्रतिनिधी
येत्या शुक्रवारी ५ जून रोजी रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी सोलापुरातील शिवप्रभू प्रतिष्ठानच्या चारशे शिवभक्तांचा ताफा तुळजापूर येथून श्री तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादाची शिवज्योत घेऊन शहरात दाखल झाला. शिवाजी चौकातील शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या ताफ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शिवप्रभू प्रतिष्ठानचे संस्थापक पुरुषोत्तम बरडे, राजन जाधव, नागनाथ जाधव, शिवाजी भोसले आदींनी या शिवभक्तांच्या ताफ्याचे स्वागत केले

गडहिंग्लज शहरात दोन दुकानांना आग
गडिहग्लज, २ जून/ वार्ताहर
शहरातील सुपर मार्केटमधील दोन दुकानांना शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये अंदाजे पाच लाखांचे नुकसान झाले. आगीचा प्रकार वेळीच निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर शॉर्टसर्किटमुळेच आग लागली असण्याची शक्यता गृहीत धरून संपूर्ण संकुलाचा विद्युतपुरवठा तातडीने बंद करण्यात आला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शिवाजी चौगुले यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. अधिक तपास हे. कॉ. श्याम देवणे हे करीत आहेत.

सहावा वेतन आयोग लागू करण्यासाठी आंदोलन
आटपाडी, २ जून/वार्ताहर
केंद्राप्रमाणे सहावा वेतन आयोग लागू करावा व प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी, या मागणीसाठी आज पंचायत समितीच्या गेटवर कर्मचाऱ्यांच्या युनियनने काळय़ा फिती लावून कामकाज व बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. पंचायत समितीच्या गेटवर जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष वैभव दिवटे, जिल्हा उपाध्यक्ष मुक्तेश्वर माडगूळकर, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष बी. ए. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. तालुक्यातील ग्रामसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती संघटनेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घोषणा देऊन पंचायत समितीचा परिसर दणाणून सोडला.

हिंदू जनजागृती समितीची महिलांसाठी ‘रणरागिणी’
सोलापूर, २ जून/प्रतिनिधी
हिंदू जनजागृती समितीने आपल्या हिंदुत्व प्रसाराच्या कार्यात महिलांचा सहभाग घेण्यासाठी ‘रणरागिणी’ ही महिलांची स्वतंत्र शाखा स्थापन केली आहे. सोलापुरात या शाखेचा शुभारंभ उद्या बुधवारी ३ जून रोजी हुतात्मा स्मृतिमंदिरात होत आहे. ‘रणरागिणी’ शाखेच्या उद्घाटनासाठी अखिल भारतीय हिंदू महासभेच्या अध्यक्ष हिमानी सावरकर यांच्यासह अ‍ॅडव्होकेट अपर्णा रामतीर्थकर, रणरागिणीच्या जिल्हा संघटक राजश्री तिवारी व समितीचे प्रवक्ते रमेश शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.

‘एसटीची सेवा अखंडितपणे सुरू राहावी’
आटपाडी, २ जून/वार्ताहर

प्रवाशांच्या सेवेचे व्रत अंगीकारलेल्या एसटीची सेवा अखंडितपणे सुरू राहावी, अशा शुभेच्छा माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी एसटीच्या ६१व्या वर्धापनदिनानिमित्त बसस्थानकावर आयोजित कार्यक्रमात दिल्या. वर्धापनदिनानिमित्त देशमुख यांच्या हस्ते केक कापण्यात आला. कर्मचाऱ्यांना पेढे वाटून वर्धापनदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी अशोकराव देशमुख, यशवंत देशमुख, महीपतराव पवार उपस्थित होते. स्थानकप्रमुख आलम देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

बाबासाहेब देशमुख यांना आदरांजली
आटपाडी, २ जून/वार्ताहर
तालुक्याचे शिल्पकार स्वर्गीय श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांना २३ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध संस्थांमध्ये भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.माणगंगा सहकारी साखर कारखान्यावर स्व. बाबासाहेब देशमुख यांच्या पुतळ्यास सरपंच पुजारी यांनी पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, आनंदराव पाटील, संजय विभुते, मोहन विभुते, हरिभाऊ माने, कार्यकारी संचालक के. एस. गोंजारी, पं. समिती सभापती रुक्मिणी खंदारे, भगवानराव मोरे संचालक व सभासद उपस्थित होते. बाबासाहेब देशमुख सूतगिरणीवर माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी प्रतिमापूजन केले. सेवक सहकारी पतमंडळात चेअरमन एम.ए. मुल्ला व व्हा-चेअरमन सौ. एम. ए. गवळी यांनी प्रतिमापूजन केले. या वेळी सचिव दशरथ बनसोडे व संचालक उपस्थित होते. शिक्षण संस्थेत संस्थेचे उपाध्यक्ष बी.ए. भिंगे यांनी प्रतिमापूजन केले. याशिवाय तालुक्यातील विविध संस्थांमध्ये स्व. देशमुख यांना आदरांजली वाहण्यात आली.

पर्यटकाच्या खोलीतून चोरी करणारे दोघे अटकेत
महाबळेश्वर, २ जून /वार्ताहर
पर्यटकाच्या खोलीतून लंपास केलेल्या ३५ हजारांच्या चोरीचा शोध महाबळेश्वर पोलिसांनी केवळ चोवीस तासांत लावला. मध्यरात्री स्वच्छतागृहाच्या काचा काढून झोपेत असलेल्या पर्यटकांच्या खोलीत प्रवेश करून चोरी करणाऱ्या दोन गुन्हेगारांना पोलीस खात्याने अल्पकाळात जेरबंद केल्याने पोलीस खात्याचे कौतुक होत आहे. या घटनेची सविस्तर माहिती अशी, नीलेश संभाजी रंधवे, रा. वाघेरे पार्क, पिंपरी गाव, पुणे आपल्या कुटुंबीयांसह २८ मे रोजी महाबळेश्वरला फिरण्यास आले. रात्री थोडा उशिरा ते महाबळेश्वरमध्ये आल्याने अखेर येथील महाड नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अप्सरा हॉटेलमध्ये त्यांना खोली मिळाली. गुरुवार ते शुक्रवार दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरटय़ांनी या हॉटेलच्या स्वच्छतागृहाच्या काचा काढून नीलेश यांच्या पँटमधील पैशाचे पाकीट, पर्समधील रोख रक्कम, तसेच दोन मोबाईल व एक सोनी कंपनीचा डिजिटल कॅमेरा असा सुमारे ३५ हजारांचा माल चोरून पोबारा केला.

कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी कुरळपकर
इस्लामपूर, २ जून / वार्ताहर
कासेगाव शिक्षण संस्थेच्या इस्लामपुरातील श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. राजेंद्र कुरळपकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कन्या महाविद्यालयाच्या स्थापनेपासून प्राध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. कुरळपकर यांचा या महाविद्यालयाच्या प्रगतीत सिंहाचा वाटा आहे. डॉ. कुरळपकर हे या महाविद्यालयात गेली १५ वर्षे उपप्राचार्य म्हणून काम पहात होते, तर ऑगस्ट २००९ पासून ते प्रभारी प्राचार्य म्हणून काम पहात होते. महाविद्यालयाचे एन. एस. एस. विभागाचे प्रमुख, होस्टेल प्रमुख व महाविद्यालय नॅक समन्वयक समितीचे समन्वयक म्हणूनही डॉ. कुरळपकर यांनी काम पाहिले आहे. विद्यापीठाच्या विविध समितीवर ते सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. डॉ. कुरळपकर यांचे संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील, उपाध्यक्ष बी. आर. ढवळेकर व सचिव प्राचार्य आर. डी. सावंत यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकांनी अभिनंदन केले

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची सोलापुरात निदर्शने
सोलापूर, २ जून/प्रतिनिधी
केंद्र शासनाप्रमाणे घरभाडे, वाहतूक आदी सर्व भत्ते देण्यात यावेत या मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेच्यावतीने सोमवारी दुपारी भोजन सुट्टीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या प्रश्नासाठी येत्या १२ जून रोजी राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा विधिमंडळावर काढण्यात येणार आहे. घरभाडे भत्ता, स्थानिक पूरक भत्ता आणि वाहतूक भत्ता सुधारित दराने देण्यात यावा, सहाव्या वेतनाच्या फरकाची रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा न करता रोखीने देण्यात यावी, मागील २८ महिन्यांची थकित महागाई भत्त्याची रक्कम रोखीने अदा करावी, रिक्त पदे तात्काळ भरावीत, अनुकंपा तत्त्वावरील नोकर भरती त्वरित करण्यात यावी आदी प्रलंबित मागण्यांसाठी १२ जून रोजी विधिमंडळावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

वंचित शेतक ऱ्यांना पॅकेज देण्याची मागणी
आटपाडी,२ जून / वार्ताहर
डािळबावरील तेल्या रोगाचे उच्चाटन करण्यासाठी जाहीर केलेल्या पॅकेजच्या अंमलबजावणी बाबतच्या नियमांबाबत संदिग्धता असल्याने अनेक डािळब उत्पादक शेतकरी वंचित राहिल्याने यासंदर्भात केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी संबंधितांना आदेश देण्याची मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी केली आहे. डािळबावर तेल्या रोगाचे अस्मानी संकट कोसळल्यानंतर केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पॅकेजची घोषणा करून शेतक ऱ्यांना दिलासा दिला होता. कृषीमंत्री पवार, एन. आर. सी. सोलापूर व राहुरी विद्यापीठाच्यामते सामुदायिक प्रयत्नाद्वारे तेल्याचे निर्मूलन केले जाते आणि त्यासाठी पॅकेजचा वापर करण्याचे नियोजन होते. सांगली जिल्ह्य़ातील विशेषत: आटपाडी तालुक्यातील कृषी अधिकारी वर्गाची आडमुठी भूमिका दप्तर दिरंगाई यामुळे तालुक्यातील शेतकरी या लाभापासून वंचित आहेत.

भटक्या-विमुक्तांसाठी ५, ६ रोजी विशेष शिबिर
सोलापूर, २ जून/प्रतिनिधी
येत्या ५ आणि ६ जून रोजी प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयात बहुरुपी, डोंबारी, नाथपंथी, डवरी, गोसावी, वैदू या भटक्या विमुक्तांसाठी विशेष शिबिर घेऊन त्यांना जातीचे व उत्पन्नाचे दाखले देण्याबरोबरच मतदारयादीत नावे नोंदणे, शिधापत्रिकेसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. विशेषत महिलांसाठी आरोग्य तपासणी करुन वैद्यकीय लाभांच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. यासाठी दोन छायाचित्रे, आवश्यक कागदपत्रे लागणार असून नाममात्र शुल्कही आकारण्यात येणार आहे. या दाखल्यांसाठी भटक्या विमुक्तांतील व्यक्तींनी दलालांच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी केले आहे.

अनियमित पाणीपुरवठय़ामुळे आटपाडीत टँकर्सची वाढती मागणी
आटपाडी, २ जून / वार्ताहर
आटपाडी शहरात पाणीपुरवठा करणारी यंत्रणा आधीच कालबाह्य़ झाली असून वीज भारनियमनामुळेही पाणीपुरवठा करण्यात आडथळे निर्माण होत आहे. त्यामुळे सर्वत्र नियमित पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे पत्र ग्रामपंचायतीने तहसीलदारांना दिले असून, आसपासच्या वाडय़ांना टँकरने पाणी देण्याची मागणी केली आहे.

सिगारेट प्रतिकृतीचे दहन
कोल्हापूर, २ जून/प्रतिनिधी

तंबाखूविरोधी दिनानिमित्त येथील हिंदू युवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवाजी चौकामध्ये सिगारेटच्या मोठय़ा प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. एखाद्या सामाजिक संघटनेच्या वतीने अशाप्रकारचा तंबाखू विरोधी उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात आला. हिंदूू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक देसाई, तसेच वल्लभ देसाई, केरबा जाधव, किरण पाटील, बाजीराव पाटील, दीपक धोंड, संदीप कात्रट, अजय ठक्कर यांनी शिवाजी चौकात भल्या मोठय़ा सिगारेटची प्रतिकृती आणली. या सिगारेटचे दहन अॅड.धनंजय पठाडे, पोलीस निरीक्षक संजय कुरूंदकर, नगरसेवक अमोल माने यांच्या हस्ते करण्यात आले.