Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

निवडणुकीच्या तोंडावर ऑनलाईन प्रवेशाचा गोंधळ नको
आमदारांचे साकडे * आढावा घेण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना*

शिक्षण खाते मात्र ठाम

मुंबई, २ जून / खास प्रतिनिधी
इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास राजकीय नेत्यांनी विरोध दर्शविला असून, निवडणुकीच्या तोंडावर नाहक गोंधळ नको, अशीच त्यांची भूमिका आहे. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ऑनलाईनबरोबरच सध्याची पद्धत सुरू ठेवता येईल का, याचा आढावा घेण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाला केली आहे. मात्र शिक्षण विभाग ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेवर ठाम असून, दोन्ही पद्धत एकाच वेळी राबविता येणार नाहीत, अशी भूमिका घेतली आहे.

मुंबई हल्ल्यातील सूत्रधार सईद लाहोर कोर्टाकडून निर्दोष मुक्त
लाहोर, २ जून/वृत्तसंस्था

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि ‘जमात उद दवा’ या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या हाफिजम् महम्मद सईद आणि त्याचा साथीदार निवृत्त कर्नल नासीर अहमद या दोघांना सबळ पुराव्याअभावी लाहोर उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. गेले सहा महिने सईद नजरकैदेत होता. या निर्णयास पाकिस्तान सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. मुंबई हल्ल्यात पकडला गेलेला अतिरेकी महम्मद अजमल कसाब याच्या न्यायालयातील सुनावणीदरम्यान तसेच त्याच्या जबानी व डीएनए चाचणीच्या अहवालानुसार या हल्ल्याच्या आखणीत सईद याचा कसा महत्त्वपूर्ण सहभाग होता, हे उघड झाले आहे.

.. तर करकरे, कामटे, साळसकर यांचे प्राण वाचू शकले असते!
मुंबई, २ जून / प्रतिनिधी

मुंबईवरील २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याला सामोरे जाताना पोलीस आणि शासनाने घोडचुका केल्या नसत्या तर दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त आयुक्त अशोक कामटे व पोलीस निरीक्षक विजय साळसकर हे वरिष्ठ अधिकारी वाचू शकले असते, असे आता स्पष्ट होत आहे. या हल्ल्याची चौकशी करणाऱ्या राम प्रधान समितीने विधिमंडळात अहवाल सादर केला आहे. हा अहवाल सादर झाल्यानंतर त्यात मुंबई पोलिसांना क्लिन चीट दिल्याचे प्रसारमाध्यमात छापून आले होते.

राष्ट्रवादीच्या परतीच्या प्रवासाची सुरुवात?
संगमांचे ‘हृदयपरिवर्तन’; सोनियांची १० वर्षांनंतर भेट

नवी दिल्ली, २ जून/खास प्रतिनिधी
डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कन्येला स्थान मिळाल्यानंतर काँग्रेस आणि सोनिया गांधी यांचे कट्टर विरोधक माजी लोकसभा अध्यक्ष पी. ए. संगमा यांचे ‘ह्रदयपरिवर्तन’ झाले. आज सायंकाळी त्यांनी १०, जनपथ येथे त्यांनी कन्या अगाथा यांच्यासह सोनिया गांधींची भेट घेतली. सर्व राजकीय मुद्दे संपलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मूळ काँग्रेसकडे परतीचा प्रवास सुरु होण्याची ही प्राथमिक लक्षणे आहेत, असा अर्थ सोनिया-संगमा यांच्या भेटीतून काढला जात आहे.

अटलांटिक समुद्रामध्ये विमानाचे अवशेष सापडले
पॅरिस, २ जून/पीटीआय

एअर फ्रान्सच्या ए ३३० जातीच्या बेपत्ता झालेल्या विमानाच्या शोधादरम्यान ब्राझील हवाई दलाच्या विमानांना आज पहाटे अटलांटिक समुद्रामध्ये विमानातील एक खुर्ची व अन्य अवशेष तरंगत असलेले आढळून आले. एअर फ्रान्सचे विमान जिथून बेपत्ता झाले त्याच ठिकाणी हे अवशेष आढळून आले आहेत. मात्र हे अवशेष बेपत्ता झालेल्या विमानाचेच आहेत की नाही याबद्दल ब्राझिलच्या हवाई दलाने कोणतेही ठोस विधान केलेले नाही. दरम्यान एअर फ्रान्सच्या बेपत्ता विमानातील २२८ जणांपैकी कोणीही जिवंत असण्याची शक्यता मावळली आहे.

नाशिकमधील गुंडगिरीने घेतला पोलिसाचा बळी
नाशिकरोड, २ जून / वार्ताहर

टोळक्याने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले पोलीस नाईक कृष्णकांत विनायक बिडवे (४५) यांचा आज सकाळी उपचार सुरू असताना रुग्णालयात मृत्यू झाला. सायंकाळी शहरातील पोलीस मुख्यालयात शहीद बिडवे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर देवळाली गावातील अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. भीषण हल्ल्याच्या या घटनेमुळे शहरातील गुंडगिरी कोणत्या स्तरापर्यंत पोहोचली, याचीच चर्चा सगळीकडे सुरू असून अटक केलेल्या सात जणांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

‘स्वार्थासाठी मेटे यांनी मराठा समाजाला वाऱ्यावर सोडले’
मुंबई, २ जून / खास प्रतिनिधी

मराठा समाजाच्या नावावर स्वत:ची पोळी भाजून घेऊन विनायक मेटे यांनी मराठा समाजाला वाऱ्यावर सोडले असून आता शिवस्मारकाचा वाद उभा करत विधानसभेच्या तोंडावर पुन्हा पोळी भाजून घेण्याचा उद्योग सुरू केल्याची टीका मराठा समन्वय समितीचे मुंबईचे माजी अध्यक्ष व माजी पालिका अतिरिक्त आयुक्त विजयसिंह पाटणकर यांनी केली आहे. मेटे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना केलेला विरोधही आपल्याला मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्लीत मित्राच्या मदतीने मुलीने केली आईची हत्या
नवी दिल्ली, २ जून/पी.टी.आय.

अनेक तरुणांबरोबर संबंध ठेवल्यामुळे आई सातत्याने हटकत असल्यामुळे पश्चिम दिल्लीमधील एका शिक्षिकेने आपल्या शिस्तप्रिय आईची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले. या मुलीने बनाव रचून ही हत्या लपवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी ही शिक्षिका आणि तिच्या मित्राला अटक केली आहे. साक्षी कपूर (२६) असे या शिक्षिकेचे नाव आहे. तिची शिस्तप्रिय आई किरण कपूर (५५) सातत्याने तिला अनेक मित्र असल्यावरून हटकत असे. त्यामुळे साक्षी ही आपल्या आईचा प्रचंड तिरस्कार करीत असे.

‘स्मारकांच्या घोषणे’चे स्मारक उभारणे आहे!
मुंबई, २ जून/प्रतिनिधी

राज्याच्या अर्थसंकल्पात दरवर्षी लोकोत्तर पुरुषांच्या स्मारकांची घोषणा केली जाते. त्याकरिता रकमेची तरतूद केली जाते. परंतु प्रत्यक्षात एकही पैसा दिला जात नाही. मागील अर्थसंकल्पात साने गुरुजी व सी. डी. देशमुख यांचे स्मारक रायगड जिल्ह्यात त्यांच्या गावात उभारण्याकरिता प्रत्येकी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. परंतु एक पैसाही दिला गेला नाही. त्यामुळे आता ‘स्मारकांच्या घोषणे’चे स्मारक उभारण्याकरिता एकदाची तरतूद करा, असे संतप्त उद्गार स्मारकांच्या उभारणीकरिता पाठपुरावा करणारे कार्यकर्ते काढू लागले आहेत.

पद्मसिंह पाटील यांनीच दिली निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी
अटकेतील आरोपीचा दावा
मुंबई, २ जून / प्रतिनिधी

काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांची हत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व खासदार पद्मसिंह पाटील यांच्या आदेशावरून करण्यात आल्याची कबुली याप्रकरणी अटकेत असलेल्या पारसमल जैन या आरोपीने गुन्हे अन्वेषण विभागाला दिलेल्या जबानीत दिल्याची माहिती केंद्रीय अन्वेषण विभागानेच (सीबीआय) आज उघड केली. मात्र या माहितीची शहानिशा करण्यासाठी सदर आरोपीवर लाय डिटेक्टर तसेच नार्को चाचणी केली जाणार असल्याचे सीबीआयने स्पष्ट केल्याचे ‘पीटीआय’च्या बातमीत म्हटले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे दिलेल्या जबानीत जैन याने दावा केला आहे की, साखर कारखान्यातील घोटाळा २००५ मध्ये उघड करणाऱ्या पवनराजे निंबाळकर यांचा काटा काढण्यात यावा, असे पाटील यांना वाटत असल्याचे सहआरोपी मोहन शुक्ल याने आपल्याला सांगितले होते. यासाठी पाटील यांनी ३० लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती, असेही जैन याने जबानीत म्हटले आहे. ‘एचआयव्ही’वरील उपचारासाठी तसेच मृत्यूनंतर कुटुंबियांना पैशांची चणचण भासू नये यासाठी आपण निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी स्वीकारल्याचा दावा जैन याने जबानीत केला आहे. तसेच सुपारी स्वीकारल्यानंतर उत्तर प्रदेशला जाऊन पांडे, तिवारी आणि पिंटू सिंग या मारेकऱ्यांना निंबाळकर यांच्या हत्येसाठी मुंबईत आणल्याचेही जबानीत म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियात आणखी एका विद्यार्थ्यांवर हल्ला
मेलबर्न, २ जून/पी.टी.आय.

भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची कितीही हमी ऑस्ट्रेलिया प्रशासन देत असले, तरी हल्ले थांबविण्यात मात्र त्यांना अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. आणखी एका २० वर्षीय भारतीय विद्यार्थ्यांवर आज मेलबर्नमध्ये हल्ला झाल्याचे ऑस्ट्रेलियामधील वृत्तवाहिन्यांनी उघडकीस आणले. नरदीप सिंग असे आज हल्ला झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून कॉलेजला जात असताना वाटेत त्याच्यावर हल्ला करण्यात आला. गेल्या महिन्यातच नरदीप लुधियानामधून ऑस्ट्रेलियात आला आहे. येथील ‘चिसहोम टेक्निकल इन्स्टिटय़ूट’मध्ये तो नर्सिगचे शिक्षण घेत आहे. कॉलेजला जाण्यासाठी निघाला असताना त्याच्यावर एका वाहनतळाजवळ ५ व्यक्तींनी हल्ला केला.पाच जणांच्या टोळक्याने त्याच्याजवळ आधी सिगारेटची मागणी केली. आपण सिगारेट घेत नसल्याचे नरदीप याने सांगितल्यानंतर त्यांनी पैशांची मागणी केली. नरदीपने पैसे नाकारताच मारहाण करीत हल्लेखोरांनी त्याच्या छातीत तीक्ष्ण हत्यार भोसकले. त्या टोळक्यांपासून आपली सुटका करून घेत नरदीपने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्याच्या छातीत भोसकल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर रक्त वाहून गेल्याचे नरदीपच्या मित्रांनी सांगितले. नरदीपवर मेलबर्न येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 


प्रत्येक शुक्रवारी