Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

हिंगोलीत वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस
हिंगोली, २ जून/वार्ताहर

शहरामध्ये व परिसरात मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ४० ते ४५ मिनिटे वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला. या वादळी वाऱ्यात महसूल विभागातील तलाठी भवनाचे संपूर्ण टीन पत्रे उडून गेले तर औंढा रस्त्यावर एक टीनशेड उडाल्याने जवळपास अर्धा तास संपूर्ण वाहतूक बंद पडली होती. रामलीला मैदानावर अनेक किरकोळ व्यापाऱ्यांनी थाटलेल्या दुकानांचे पत्रे व ताटवे उडून गेल्याने मोठे नुकसान जाले. याच प्रमाणे मोंढय़ात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात आणलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे.

आरटीओ कार्यालयात खून करणारा तायडे अखेर गजाआड
औरंगाबाद, २ जून /प्रतिनिधी

प्रादेशिक परिवहन कार्यालयात घुसून लेखापाल डी. एस. कोंडावार यांच्यावर गोळ्या घालून खून करणारा सचिन तायडे याला आज पोलिसांनी अटक केली. खून केल्यापासून तो फरार होता आणि या काळात तो सतत फिरतीवर होता. पैठण येथील प्रसिद्ध ज्ञानेश्वर उद्यानात बसलेला असताना पोलिसांनी त्याला अटक केल्याचे पोलीस उपायुक्त एम. बी. तांबडे यांनी सांगितले. तायडेच्या साथीदाराला पूर्वीच अटक करण्यात आली आहे.

हायटेक
औरंगाबाद येथून प्रसिद्ध होणाऱ्या एका दैनिकात नुकतीच अशी बातमी प्रसिद्ध झाली की, महसूल खाते आता हायटेक होणार. जिल्ह्य़ात काम करणाऱ्या सर्व तलाठय़ांना लॅपटॉप दिले जाणार आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणताही विलंब न करता गा. न. सातबाराचा उतारा दिला जाणार. ही बातमी वाचून शेतकऱ्यांना निश्चितच आनंद झाला असणार. शेतकऱ्यांच्या जीवनात तसेही आनंदाचे दिवस फार कमीच असतात. त्यामुळेच या बातमीस विशेष महत्त्व.

विषबाधा झाल्याने ३० जनावरे मृत्युमुखी
नांदेड, २ जून/वार्ताहर

उन्हाळी ज्वारी कापल्यानंतर बुडावरते फुटलेली कोवळे कोंब खाल्ल्याने विषबाधा होवून जवळपास ३० ते ३५ जनावरे मृत्युमुखी पडली असून ५० ते ६० जनावरे अत्यवस्थ आहेत. त्यांचे प्राण वाचविण्यासाठी युद्धपातळीवर उपचार चालू आहेत. ही दुर्दैवी घटना किनवटपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या विदर्भातील खरबी शिवारात मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. ऐन पेरणीच्या मोसमात दुभती जनावरे व शेतात राबणारी गोऱ्हे दगावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

कैद्यांमधील माणुसकीला साद घालत गांधी विचारांचा प्रसार सुरू
उर्दू भाषेतील गांधीजींचे आत्मचरित्र अजमल कसाबलाही पाठवले

उस्मानाबाद, २ जून/वार्ताहर

दहशतवादावर मात करायची असेल तर उत्तर काय? महात्मा गांधींचे अहिंसेचे तत्त्वज्ञान. या तत्त्वज्ञानावार गाढ श्रद्धा असणाऱ्या एका तरुणाने अजमल कसाब यास महात्मा गांधींचे आत्मचरित्र वाचण्यास दिले आहे. खास उर्दू भाषेतील ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे पुस्तक ऑर्थर जेलच्या अधिकाऱ्यांना त्याने पाठविले आहे. विशेष म्हणजे धमकी देणे, खंडणी वसूल करणे अशा गुन्ह्य़ात शिक्षा भोगलेल्या लक्ष्मण गोले या तरुणाने गांधी विचारांची पताका सर्वत्र फडकत राहावी यासाठी कसाबला गांधीजींचे पुस्तक पाठवून सत्याच्या प्रयोगास नव्याने सुरुवात केली आहे.

गायरान जमीन भूमिहिनांच्या नावाने करण्याची मागणी
लातूर, २ जून/वार्ताहर

रेणापूर तालुक्यातील गरसुळी येथील गायरान जमिनीवर १९७८ पासून गावातील श्रमिक कुटुंबाचा ताबा आहे. या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पादनावरच त्यांची उपजीविका आहे. ३० वर्षांपासून कसत असलेली ही जमीन नावे करावी अशी मागणी या गावातील श्रमिक कुटुंबांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, गरसुळी येथील जमीन हैदराबाद स्टेटच्या जमीन कूळ कायद्यानुसार कास्तकरांच्या नावे व्हावयास हवी. पण ही जमीन एका सैनिकाला देण्याच्या हालचाली सुरू आहेत. रेणापूर येथील तहसीलादारांनी २६ मार्च २००९ ला मंडळ अधिकाऱ्यांमार्फत पंचनामा केला; परंतु यासंदर्भात कसलीही कारवाई करण्यात आली नाही. अद्यापपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनीही निर्णय घेतलेला नाही. कायदेशीर कारवाई करून गायरान जमीन नावे करावी अन्यथा भूमिहीन कुटुंबीयांतर्फे आत्महत्या करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर नामदेव घोडके, नानासाहेब घोडके, रमेश घोडके, बाबासाहेब घोडके, कुसुम घोडके, सुमित्रा घोडके, वंदना घोडके, कुसुम शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

औसामधील उद्यान, व्यापारी संकुलाचेकाम प्रगतीपथावर
औसा, २ जून/वार्ताहर

औसा शहरातील मुक्तेश्वर मंदिर परिसरात वैशिष्टय़पूर्ण योजनेअंतर्गत सुमारे ५१ लाख ४१ हजार रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आगामी पावसाळ्यात फुलझाडे, शोभिवंत झाडे, आणि हिरवळीच्या लागवडीनंतर हे उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. याच योजनेतील एक कोटी ४३ लाख रुपयांचे व्यापारी संकुलाचे काम प्रगतीपथावर आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी व लहान मुलांना खेळण्यासाठी एखादे उद्यान असावे अशी मागणी होती. राज्य साक्षरता परिषदेचे अध्यक्ष अॅड. त्र्यंबकदास झंवर यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक दिवसांची मागणी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. नगराध्यक्ष संगमेश्वर ठेसे यांनी वेळोवेळी प्रयत्न करून ही योजना राबविली आहे. यामध्ये सहाशे मीटर लांबीचा जॉगिंग ट्रॅक, नैसर्गिक जुन्या ओढय़ाला आधुनिक पिचिंग करण्यात आले आहे. लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी येथे असणार आहेत. योग अभ्यासासाठी गार्डन सेल्टर उभारण्यात आले आहे, असे नगर परिषदेचे मुख्याधिकारी उदय कुरवलकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

मराठवाडय़ात टँकरची संख्या एक हजारावर
औरंगाबाद, २ जून /प्रतिनिधी

मराठवाडय़ात साडेआठशे गावे आणि सुमारे पाचशे वाडय़ांची तहान भागविण्यासाठी टँकरवरच अवलंबून रहावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून टँकरच्या संख्येत वाढ झाली आहे. मे महिन्याच्या अखेरीस ८६१ गावे आणि ४७९ वाडय़ांना १०४५ टँकर्स आणि ५ बैलगाडय़ांतून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे. गेल्या वर्षी मे महिन्याच्या अखेरीस टँकरची संख्या ९७० इतकी होती. यंदा पाऊस उशिरा सुरू झाला तर ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या आठवडय़ात ५४ नवीन टँकर नव्याने सुरू करण्यात आले आहेत. टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणारी सर्वाधिक गावे बीड जिल्ह्य़ात (२२९) आहेत. त्यापाठोपाठ जालना (१७८), औरंगाबाद (१५९) आणि नांदेड (१४७) जिल्ह्य़ाचा क्रमांक लागतो. लातूर जिल्ह्य़ात ७९ गावे, हिंगोलीत ३१ तर परभणी जिल्ह्य़ात २७ गावांची तहान टँकरवरच अवलंबून आहे. उस्मानाबाद जिल्हा यात सुदैवी असून येथे फक्त ११ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

बौद्ध धम्म कधीच नष्ट होणार नाही - सुशीला पट्टेकर
औरंगाबाद, २ जून /खास प्रतिनिधी

८४ हजार विहारे, स्तूप व लेण्या निर्माण करून सम्राट अशोकाने तथागतांची धम्म तत्त्वे जनमानसात रुजविली; परंतु सम्राट अशोकाने भारतात रुजविलेली बौद्ध संस्कृती पुण्यमित्र शुंगाच्या प्रतिक्रांतीने नष्ट केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीने बौद्ध संस्कृतीचे पुनरुज्जीवन केले. आता हा बौद्ध धम्म भारतातून कधीच नष्ट होणार नाही, असे मत धम्म चळवळीतील वक्तया सुशीलाताई पट्टेकर यांनी व्यक्त केले. बुद्धिस्ट फाऊंडेशनच्या वतीने आयोजित महोत्सवात त्या प्रमुख वक्तया म्हणून बोलत होत्या. त्यांचा विषय ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीचे परिणाम’ असा होता. अध्यक्षस्थानी डॉ. अरुणा लोखंडे या होत्या. सुशीलाताई पट्टेकर पुढे म्हणाल्या, या देशात बुद्ध तत्त्वज्ञानाचे पहिले प्रचार प्रसारक हे शुद्ध गणल्या गेलेल्या मागास जमाती व स्त्रिया हेच होते. त्यांनीच तथागतांचा बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मानवतावादी विचार जनमानसात रुजविला. पण पुण्यमित्र शुंगाच्या प्रतिक्रांतीनंतर निर्माण करण्यात आलेल्या मनुस्मृतीने तथागतांच्या धम्माचा न्याय, नीती व मानवतेचा प्रचार, प्रसार करणाऱ्या प्रचारकांच्या गळ्यात गाडगे आणि पाठीला झाडू लटकविला. याच महोत्सवामध्ये विचारवंत व लेखक अर्जुन डांगळे यांचे ‘आंबेडकरांच्या धम्मक्रांतीचे भवितव्य’ या विषयावर व्याख्यान झाले.

योगा शिकविण्याच्या नावाखाली सुनेचा लैंगिक छळ
औरंगाबाद, २ जून /प्रतिनिधी

योगा शिकविण्याच्या नावाखाली सासऱ्याने सुनेचा लैिगक छळ केल्याची घटना उस्मानपुऱ्यातील कबीरनगर भागात घडली. हा प्रकार पती आणि तिच्या आईला सांगितल्यानंतर सासरच्या मंडळींनी बेदम मारहाण करून तिला घराबाहेर हाकलून दिले. विवाहितेने अहमदनगर येथे माहेरी गेल्यानंतर पोलिसात तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीवरून तिचा पती संतोष हरिश्चंद्र रेसवाल, सासरा हरिश्चंद्र महादू रेसवाल, सासू पुतळाबाई, नणंद हेमा आणि ताराबाई, दीर सुनील आणि अनिल (सर्व राहणार कबीरनगर) यांच्याविरुद्ध उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे.
चार वर्षांंपूर्वी फिर्यादी महिलेचे संतोष याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर साधारणपणे एका महिन्याने सासरा हरिश्चंद्र याची सुनेवर वाईट नजर होती. त्यातच त्याने सुनेला योगा शिकविन असे सांगितले. योगाच्या नावाखाली तो सुनेच्या अंगाला हेतुपुरस्सर हात लावत होता. याला तिने विरोध केला तर योगामध्ये असेच करावे लागत असल्याचे तो सांगत होता. तिने हा प्रकार पती आणि तिच्या आईला सांगितला. पतीने यावर काहीही केले नाही. तिच्या आईने सासरच्या मंडळींकडे जाब विचारला. तिच्या आईने जाब विचारल्याचा राग आल्याने सर्वानी संगनमताने तिला बेदम मारहाण केली.

केजमधील प्रलंबित वीजप्रश्न सोडविण्याचा निर्णय
अंबाजोगाई, २ जून/वार्ताहर

केज विधानसभा मतदारसंघातील विद्युत विभागातील सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी या विभागाच्या आमदार व राज्याच्या सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री डॉ. विमल मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित खात्याच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत या मतदारसंघातील संपूर्ण वीजप्रश्न सोडवण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विद्युत पंपासाठी प्रलंबित असलेल्या २२०० विद्युतपंप जोडणी संदर्भात चर्चा करण्यात आली. या चर्चेत प्रलंबित २२०० जोडणींपैकी १००० विद्युत पंपांची जोडणी येत्या तीन महिन्याच्या आत पूर्ण करण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला. या कामासाठी आवश्यक असणाऱ्या विद्युत खांब, विजेच्या तारा व इतर साहित्यांची तात्काळ खरेदी करण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली. तसेच जवळबन, माळेगाव आणि डोंगरपिंपळा येथील ३३ केव्ही उपकेंद्र निर्मितीचे केंद्र, विविध विभागात डीपीवरील लोड कमी करून ११९ नवीन डीपी येत्या तीन महिन्यांत बसविणे, पाथरा आणि वाघाला येथे १३२ केव्ही उपकेंद्र उभारण्या संदर्भातही निर्णय घेण्यात आला. दारिद्रयरेषेखालील लोकांना फक्त १५ रुपये भरून घरगुती वापरासाठी देण्यात येणाऱ्या वीजपुरवठय़ाची जोडणी तातडीने सुरू करण्यासंदर्भातही सूचना केल्या.

मनीषा तोकले यांना ‘गरुड भरारी’ पुरस्कार
बीड, २ जून /वार्ताहर

मानवी हक्क अभियानाच्या मनीषा तोकले यांना या वर्षीचा गरुड भरारी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. साहेब प्रतिष्ठान आणि भारतीय विद्यार्थी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात येतो. मानवी हक्क अभियान महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मनीषा तोकले यांना भारतीय विद्यार्थी सेना व साहेब प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा गरुड भरारी पुरस्कार मुंबई येथील बांद्रा, कुर्ला संकुल मैदान येथे भारतीय विद्यार्थी सेनेच्या भरारी मेळाव्यामध्ये रश्मीताई ठाकरे व अभिजीत पानसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कौटुंबिक हिंसाचार कमी करण्यासाठी, स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्यासाठी व महिलांमध्ये नेतृत्व निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या वैशिष्टय़पूर्ण कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी मनीषा तोकले म्हणाल्या, छत्रपती शिवराय, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रात दलित, कष्टकरी महिलांच्या आयुष्यातील कष्ट कमी होवून त्यांच्या जीवनामध्ये आनंद यावा व त्यांना भयमुक्त जगता यावे यासाठी कार्य करत आहे. महाराष्ट्रातील ३५ हजार युवक-युवती या भरारी मेळाव्याला उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मानवी हक्क अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. एकनाथ आवाड यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. समाजातील विविध स्तरांतून मनीषा तोकले यांचे अभिनंदन होत आहे.

‘रेणा’ च्या अध्यक्षपदी यशवंत पाटील तर उपाध्यक्षपदी आबा पाटील
लातूर, २ जून/वार्ताहर

रेणापूर तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रेणा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी यशवंत पाटील तर उपाध्यक्षपदी आबासाहेब पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
कारखानास्थळी पालकमंत्री दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या संचालकांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. मांजरा कारखान्याच्या पावलावर पाऊल टाकीत हा कारखाना वाटचाल करत आहे. कारखाना स्थापन झाल्यापासून या दोन महिन्यांपूर्वी कारखान्याची निवडणूक झाली.
यात पालकमंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सर्व संचालक बिनविरोध काढण्यात आले.
कारखान्यात पहिल्यापासूनच अध्यक्ष यशवंत पाटील व उपाध्यक्ष आबासाहेब पाटील हे होते. रविवारी (३१ मे) अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात अध्यक्षपदी यशवंत पाटील तर उपाध्यक्षपदी आबासाहेब पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे. या वेळी पालकमंत्री दिलीपराव देशमुख यांच्यासह संचालक मंडळ, कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.