Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मुंबई हल्ल्यातील सूत्रधार सईद लाहोर कोर्टाकडून निर्दोष मुक्त
लाहोर, २ जून/वृत्तसंस्था

 

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि ‘जमात उद दवा’ या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या हाफिजम् महम्मद सईद आणि त्याचा साथीदार निवृत्त कर्नल नासीर अहमद या दोघांना सबळ पुराव्याअभावी लाहोर उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. गेले सहा महिने सईद नजरकैदेत होता. या निर्णयास पाकिस्तान सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.
मुंबई हल्ल्यात पकडला गेलेला अतिरेकी महम्मद अजमल कसाब याच्या न्यायालयातील सुनावणीदरम्यान तसेच त्याच्या जबानी व डीएनए चाचणीच्या अहवालानुसार या हल्ल्याच्या आखणीत सईद याचा कसा महत्त्वपूर्ण सहभाग होता, हे उघड झाले आहे. भारताने पाकिस्तानला दिलेल्या पुराव्यात यासंबंधातील कागदपत्रे आहेत. असे असताना सईदची खुलेआम सुटका झाल्याने भारताला धक्का बसला आहे. आता पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात तरी निष्पक्ष न्याय होईल, अशी आशा भारतीय अधिकाऱ्यांना वाटत आहे.
‘जमात उद दवा’च्यावतीने अ‍ॅड. ए. के. डोगर यांनी पाऊण तासाच्या युक्तिवादात सांगितले की, ‘मुंबईवरील हल्ल्यात सईद याचा हात असल्याचा कोणताही पुरावा नसल्याने त्यांची नजरकैद ही देशाची घटना व कायद्याच्या विरोधात आहे. त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्रांनी या संघटनेवर बंदी घालताना तिची मालमत्ता गोठविण्यास तसेच तिच्या नेत्यांच्या प्रवासावर बंदी घालण्यास सांगितले आहे, कोणत्याही नेत्याच्या अटकेची शिफारस केलेली नाही. पाकिस्तानी कायद्यानुसार एखाद्याला अटक झाली तर पंधरवडय़ाच्या आत त्याचे कारण द्यावे लागते. सरकारने हा नियमही पाळलेला नाही.’ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांची अमलबजावणी करणे पाकिस्तानी कायद्यानुसार बंधनकारक नाही, असाही दावा त्यांनी केला. मात्र या ठरावाच्या अंमलबजावणीचे बंधन आमच्यावर आहे, असा प्रतिवाद सरकारच्या वतीने करण्यात आला. अर्थात सईदविरोधात सरकारी पक्षाला कोणताही ठोस पुरावा देता न आल्याने त्रिसदस्यीय खंडपीठाने ५९ वर्षीय सईद आणि त्याचा साथीदार कर्नल (निवृत्त) नासीर अहमद यालाही तात्काळ मुक्त केले. विशेष म्हणजे, सईद याचे अल काईदाशी संबंध असल्याचा प्राथमिक पुरावा सरकारकडे आहे, असा ठोस दावा या आधीच्या एका सुनावणीत पाकिस्तानचे अ‍ॅटर्नी जनरल लतिफ खोसा यांनी न्यायालयात केला होता. असे असताना आज सरकारपक्षाला पुरावा देता न आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

‘कसाबशी आमचा संबंध नाही’
मुंबई हल्ल्यात पकडला गेलेला अजमल कसाब याचा आमच्या संघटनेशी कोणताही संबंध नाही तसेच मुंबईवरील हल्लेही आम्ही घडविलेले नाहीत, असा दावा जमात उद दवाचा म्होरक्या हाफिज़्‍ा महम्मद सईद याने आज लाहोर येथे पत्रकार परिषदेत केला. काश्मीर स्वातंत्र्याचा लढा यापुढेही सुरू राहील, असा निर्धारही त्याने व्यक्त केला. भारताच्या दबावामुळे आपल्याला नजकैदेत ठेवले गेले, असा आरोपही त्याने केला. आपली संघटना शांती व स्थैर्यासाठी कार्यरत असून लष्कर ए तयबाशी आमचे नाव जोडणे गैर असल्याचेही तो म्हणाला. त्याचा साथीदार नासीर अहमद याने सांगितले की आत्मघातकी हल्ले इस्लामशी विसंगत असले तरी स्वात खोऱ्यात सुरू असलेल्या लष्करी कारवाईला आपला विरोध आहे.