Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अटलांटिक समुद्रामध्ये विमानाचे अवशेष सापडले
पॅरिस, २ जून/पीटीआय

 

एअर फ्रान्सच्या ए ३३० जातीच्या बेपत्ता झालेल्या विमानाच्या शोधादरम्यान ब्राझील हवाई दलाच्या विमानांना आज पहाटे अटलांटिक समुद्रामध्ये विमानातील एक खुर्ची व अन्य अवशेष तरंगत असलेले आढळून आले. एअर फ्रान्सचे विमान जिथून बेपत्ता झाले त्याच ठिकाणी हे अवशेष आढळून आले आहेत. मात्र हे अवशेष बेपत्ता झालेल्या विमानाचेच आहेत की नाही याबद्दल ब्राझिलच्या हवाई दलाने कोणतेही ठोस विधान केलेले नाही. दरम्यान एअर फ्रान्सच्या बेपत्ता विमानातील २२८ जणांपैकी कोणीही जिवंत असण्याची शक्यता मावळली आहे. यासंदर्भात ब्राझिल हवाई दलाचे प्रवक्ते जॉर्ज अमाराल यांनी सांगितले की, विमानाची खुर्ची, एक बॅरल व अन्य काही अवशेष समुद्राच्या पाण्यावर तरंगत असल्याचे आज पहाटे ब्राझीलच्या हवाई दलाच्या विमानांच्या निदर्शनास आले. हे अवशेष सापडलेल्या ठिकाणी तेलाचा अंशही आढळून आला. एअर फ्रान्सचे एअरबस ए ३३० जातीचे हे विमान मंगळवारी भारतीय वेळेनुसार सकाळी साडेसात वाजता बेपत्ता झाले. या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात येते. हे विमान रिओ डी जानेरो येथून पॅरिसला चालले होते. ब्राझिल हवाई दलाच्या आठ विमानांकरवी बेपत्ता विमानाचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान बेपत्ता झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांशी संवाद साधताना फ्रान्सचे अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांनी सांगितले की, अपघातग्रस्त एअर फ्रान्सच्या विमानातील २२८ जणांपैकी कोणीही जिवंत असण्याची शक्यता आता मावळली आहे.