Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

नाशिकमधील गुंडगिरीने घेतला पोलिसाचा बळी
नाशिकरोड, २ जून / वार्ताहर

 

टोळक्याने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले पोलीस नाईक कृष्णकांत विनायक बिडवे (४५) यांचा आज सकाळी उपचार सुरू असताना रुग्णालयात मृत्यू झाला. सायंकाळी शहरातील पोलीस मुख्यालयात शहीद बिडवे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर देवळाली गावातील अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. भीषण हल्ल्याच्या या घटनेमुळे शहरातील गुंडगिरी कोणत्या स्तरापर्यंत पोहोचली, याचीच चर्चा सगळीकडे सुरू असून अटक केलेल्या सात जणांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
रविवारी रात्री जेलरोड भागात ही घटना घडली होती. बिडवे हे आपले सहकारी पोलीस नाईक रामदास शिंदे यांच्यासोबत गस्त घालत असताना रस्त्यावरून २० ते २५ जणांचे टोळके जाताना दिसले. संशयावरून टोळक्यास हटकले असता हल्लेखोरांनी थेट हल्ला चढविला. यावेळी शिंदे यांनी तेथून पळ काढला आणि या घटनेची माहिती नाशिकरोड पोलीस ठाण्यात कळविली. पोलीस कुमक घटनास्थळी येईपर्यंत हल्लेखोरांनी हत्यारे व लाठय़ा-काठय़ांनी बिडवे यांना बेदम मारहाण करून जखमी केले. त्यांच्या शासकीय दुचाकीवर मोठे दगड मारून तिचीही मोडतोड करण्यात आली. तसेच पसार होताना हल्लेखोरांनी बिडवे यांच्याकडील ७५ हजार रूपये किंमतीचे शासकीय पिस्तुलही लंपास केले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी बिडवे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. अतिशय नाजूक अवस्थेत असणाऱ्या बिडवे यांचा आज सकाळी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. सायंकाळी बिडवे यांचे पार्थिव पोलीस मुख्यालयात आणण्यात आले. पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी बिडवे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर देवळालीगाव येथील अमरधाममध्ये बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.