Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘स्वार्थासाठी मेटे यांनी मराठा समाजाला वाऱ्यावर सोडले’
मुंबई, २ जून / खास प्रतिनिधी

 

मराठा समाजाच्या नावावर स्वत:ची पोळी भाजून घेऊन विनायक मेटे यांनी मराठा समाजाला वाऱ्यावर सोडले असून आता शिवस्मारकाचा वाद उभा करत विधानसभेच्या तोंडावर पुन्हा पोळी भाजून घेण्याचा उद्योग सुरू केल्याची टीका मराठा समन्वय समितीचे मुंबईचे माजी अध्यक्ष व माजी पालिका अतिरिक्त आयुक्त विजयसिंह पाटणकर यांनी केली आहे. मेटे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना केलेला विरोधही आपल्याला मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या भूमिकेतून पुणे येथे आठ महिन्यांपूर्वी सर्व मराठा संघटनांची बैठक झाली होती. यातूनच समन्वय समितीची स्थापना करण्यात आली होती. या बैठकीत समितीच्या अध्यक्षपदाबाबत कोणताही निर्णय
झालेला नव्हता. तसेच मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना धडा शिकविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्यक्षात विनायक मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्षपद मिळविण्यासाठी समन्वय समितीला वेगवेगळ्या पक्षांच्या दावणीला बांधण्याचा उद्योग केला. ज्या छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध करण्याची भूमिका घेतली
त्यांच्या पुतण्यासाठी नाशिक येथे जाऊन लोकसभा निवडणुकीत मेटे यांनी प्रचार केला. भुजबळ यांच्याप्रमाणेच गोपीनाथ मुंडे, शेकापचे जयंत पाटील आदींसाठी प्रचार करण्याचे उद्योग करून मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा उद्योग मेटे यांनी केल्याचा आरोप विजयसिंह पाटणकर यांनी केला.
पुणे येथील मराठा संघटनांच्या बैठकीत मराठा समन्वय समितीची स्थापना करण्यात आल्यानंतर लोकसभा निवडणुकीत आपापल्या पक्षाचा प्रचार करण्यास कोणतीही हरकत नाही अशी भूमिका घेतानाच ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला अशांना कोणत्याही प्रकारे मदत न करण्याचे निश्चित झाले होते. मात्र स्वत:चे महत्व वाढविण्यासाठी मेटे यांनी समन्वय समितीला अंधारात ठेवून परभणी येथे परस्पर पाच मराठा संघटनांची बैठक घेऊन समन्वय समिती स्थापन करून स्वत:ला अध्यक्ष म्हणून घोषित केले. त्यानंतर संपूर्ण मराठा समाजाचे केवळ आपणच नेते आहोत, असे भासवत मराठा समाजाची फसवणूकच केली. मेटे यांच्या मनमानी कारभारामुळे मराठा समाजाचे नुकसानच होणार असल्यामुळे आपण समन्वय समितीच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मेटे यांनी पुन्हा मराठा समाजाला दावणीला बांधण्याचा उद्योग सुरू केला असून त्यांच्या घाणेरडय़ा राजकारणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा दूर जात असल्याची टीका पाटणकर यांनी केली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबाबतची मेटे यांची भूमिका व त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर केलेली टीका ही राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी खेळलेली चाल असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत शासन दरबारी आपला लढा सुरूच राहील, असा इशारा मेटे यांच्या अध्यक्षतेखालील मराठा समन्वय समितीने एका पत्रकाद्वारे दिला आहे.