Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

दिल्लीत मित्राच्या मदतीने मुलीने केली आईची हत्या
नवी दिल्ली, २ जून/पी.टी.आय.

 

अनेक तरुणांबरोबर संबंध ठेवल्यामुळे आई सातत्याने हटकत असल्यामुळे पश्चिम दिल्लीमधील एका शिक्षिकेने आपल्या शिस्तप्रिय आईची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले. या मुलीने बनाव रचून ही हत्या लपवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी ही शिक्षिका आणि तिच्या मित्राला अटक केली आहे. साक्षी कपूर (२६) असे या शिक्षिकेचे नाव आहे. तिची शिस्तप्रिय आई किरण कपूर (५५) सातत्याने तिला अनेक मित्र असल्यावरून हटकत असे. त्यामुळे साक्षी ही आपल्या आईचा प्रचंड तिरस्कार करीत असे. २९ मे रोजी एका धार्मिक कार्यक्रमावरून परतल्यानंतर किरण यांनी साक्षीला तिच्या मित्रासोबत घरात एकत्र पकडले. किरण यांनी साक्षीला या कारणावरून फैलावर घेतले. तेव्हा रागावलेल्या साक्षीने सुऱ्याने आपल्या आईला अत्यंत निर्घृणपणे भोसकले. त्यानंतर मित्राला सोबत घेऊन सुमारे चोवीसवेळा किरण कपूर यांना भोसकण्यात आले. त्यांनी त्यानंतर घरातील बॉटल्स आणि इतर वस्तूंची तोडफोड करून दरोडय़ाचा बनाव रचला. याप्रकरणी साक्षी कपूर आणि तिचा मित्र सन्नी बात्रा (२०) याला पोलिसांनी चार दिवसांनी पश्चिम विहारमधील निवासस्थानातून अटक केली, अशी माहिती पोलीस उपायुक्त अजय कश्यप यांनी दिली. बात्राने साक्षीसोबत संबंध असल्याचे तिच्या आईपासून लपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिने त्या दोघांना घरातच पकडले. तिने आरडाओरडा केल्यानंतर साक्षी आणि बात्राने तिच्या आईला पकडून बेडरुममध्ये नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्यावर नियंत्रण आणणे शक्य न झाल्यामुळे साक्षीने तिच्या डोक्यावर मारले, त्यानंतर स्वयंपाक घरातून सुरा आणून किरण यांना भोसकले, असेही कश्यप यांनी सांगितले. दरोडेखोर घरात घुसले, त्यांनी आपल्या आईला मारले. आपण दुसऱ्या खोलीत लपलो होतो. अध्र्या तासानंतर दरोडेखोर बाहेर गेल्यानंतर बेडरूममध्ये आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यानंतर तिने आपले वडील, भाऊ आणि इतर नातेवाईकांना कळविले. जबानीमधील संदिग्धता लक्षात घेऊन पोलिसांनी केलेल्या पुढील चौकशीमुळे अखेर साक्षीने आपल्या आईच्या हत्येची कबुली दिली.