Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘स्मारकांच्या घोषणे’चे स्मारक उभारणे आहे!
मुंबई, २ जून/प्रतिनिधी

 

राज्याच्या अर्थसंकल्पात दरवर्षी लोकोत्तर पुरुषांच्या स्मारकांची घोषणा केली जाते. त्याकरिता रकमेची तरतूद केली जाते. परंतु प्रत्यक्षात एकही पैसा दिला जात नाही. मागील अर्थसंकल्पात साने गुरुजी व सी. डी. देशमुख यांचे स्मारक रायगड जिल्ह्यात त्यांच्या गावात उभारण्याकरिता प्रत्येकी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. परंतु एक पैसाही दिला गेला नाही. त्यामुळे आता ‘स्मारकांच्या घोषणे’चे स्मारक उभारण्याकरिता एकदाची तरतूद करा, असे संतप्त उद्गार स्मारकांच्या उभारणीकरिता पाठपुरावा करणारे कार्यकर्ते काढू लागले आहेत.
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील वडघर येथे साने गुरुजींचे स्मारक उभारण्याचे तर रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील तळा येथे माजी केंद्रीय अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांचे स्मारक उभारण्याची घोषणा तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पात केली होती. याकरिता प्रत्येकी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. साने गुरुजींचे स्मारक निसर्गरम्य ४० एकर जागेवर उभारले जाणार असून त्याकरिता सुमारे पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एकूण खर्चाच्या एकतृतीयांश रक्कम शासनाकडून मिळावी अशी असून दोनतृतीयांश रक्कम लोकसहभागातून उभारण्यात येणार आहे. आतापर्यंत दीड कोटी रुपये खर्च झाले आहेत. स्मारकाच्या पहिल्या टप्पा २००२ मध्ये पूर्ण झाला. त्याच्या उद्घाटनाला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुनील तटकरे, गणपतराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. स्मारकात दरवर्षी सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. एका युवक शिबिराला खुद्द तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील उपस्थित होते. त्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात दोन कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र एक रुपयाही स्मारकाला प्राप्त झाला नसल्याचे स्मारकाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला तर ज्यांनी तुमचे पैसे जाहीर केले त्यांच्याकडून तुमचे पैसे मिळवा, अशी उत्तरे अधिकाऱ्यांनी दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यातील सी. डी. देशमुख यांच्या स्मारकाचीही फारशी प्रगती झालेली नाही. तेथेही सरकारी अनास्थेचेच दर्शन घडले आहे. आतापर्यंत ग. दि. माडगुळकर, अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, क्रांतीसिंह नाना पाटील आदींची स्मारके उभारण्याच्या घोषणा झाल्या आहेत. नेमकी कोणती स्मारके उभी राहिली हा संशोधनाचा विषय असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.