Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

निवडणुकीच्या तोंडावर ऑनलाईन प्रवेशाचा गोंधळ नको
आमदारांचे साकडे * आढावा घेण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना * शिक्षण खाते मात्र ठाम
मुंबई, २ जून / खास प्रतिनिधी

 

इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास राजकीय नेत्यांनी विरोध दर्शविला असून, निवडणुकीच्या तोंडावर नाहक गोंधळ नको, अशीच त्यांची भूमिका आहे. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ऑनलाईनबरोबरच सध्याची पद्धत सुरू ठेवता येईल का, याचा आढावा घेण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाला केली आहे. मात्र शिक्षण विभाग ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेवर ठाम असून, दोन्ही पद्धत एकाच वेळी राबविता येणार नाहीत, अशी भूमिका घेतली आहे.
इयत्ता दहावीचा निकाल २० जूनच्या आसपास जाहीर होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला एकतर्फी स्थगिती मिळू नये म्हणून राज्य शासनाच्या वतीने उच्च न्यायालयात आज कॅव्हेट दाखल करण्यात आले. तसेच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया विद्यार्थी आणि पालकांना समजावी म्हणून शासनाच्या वतीने माहिती पुस्तिका प्रसिद्ध केली जाणार आहे. इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सध्याच्या पद्धतीने म्हणजे अर्ज भरून सुरू ठेवावी, अशी मागणी काही आमदारांनी आज मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार कृपाशंकर सिंग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ऑनलाईनपेक्षा सध्याची पद्धत सुरू ठेवावी अशी मागणी केली. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे गोंधळ उडेल, असे आमदारांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी पर्सेटाईलचा गोंधळ झाला होता. यंदा ऑनलाईनचा गोंधळ उडेल, असाही आमदारांचा सूर आहे. शालेय शिक्षण खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे मात्र ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेवर ठाम आहेत. ते म्हणाले की, दोन्ही पद्धत एकाच वेळी सुरू ठेवता येणार नाहीत, असे या संदर्भात नेमण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीचे मत आहे. प्रवेशासाठी महाराष्ट्र ज्ञान मंडळाने जादा क्षमतेचा नवीन सव्‍‌र्हर बसविला आहे. तसेच ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यासाठी पुस्तिका प्रसिद्ध केली जाणार आहे. ही पुस्तिकेची किंमत दहा रुपये असेल. बहुतांशी शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्याकडील संगणक व इंटरनेट यंत्रणा अर्ज भरण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे. मुंबईत प्रवेशाकरिता २० विभाग स्थापन करण्यात आले असून, प्रत्येक विभागात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता समन्वयक उपलब्ध असतील. महाराष्ट्र ज्ञानमंडळाने ऑनलाईन प्रवेशाची सारी तयारी पूर्ण केली असल्याचेही विखे-पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण आल्यास त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शासनाची यंत्रणा उपलब्ध असेल. आठ ते दहा तास रांगेत उभे राहण्यापेक्षा ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पटकन पार पडेल. विशेषत: झोपडपट्टय़ा आणि आदिवासी भागात ऑनलाईन प्रवेशाची समस्या उद्भवू शकते हे लक्षात घेऊन तेथील शाळांमध्येच यंत्रणा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.