Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

.. तर करकरे, कामटे, साळसकर यांचे प्राण वाचू शकले असते!
मुंबई, २ जून / प्रतिनिधी

 

मुंबईवरील २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याला सामोरे जाताना पोलीस आणि शासनाने घोडचुका केल्या नसत्या तर दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त आयुक्त अशोक कामटे व पोलीस निरीक्षक विजय साळसकर हे वरिष्ठ अधिकारी वाचू शकले असते, असे आता स्पष्ट होत आहे. या हल्ल्याची चौकशी करणाऱ्या राम प्रधान समितीने विधिमंडळात अहवाल सादर केला आहे. हा अहवाल सादर झाल्यानंतर त्यात मुंबई पोलिसांना क्लिन चीट दिल्याचे प्रसारमाध्यमात छापून आले होते. त्यानंतर या समितीतील एक सदस्य व रॉ या गुप्तचर संघटनेचे माजी अधिकारी व्ही. बालचंद्रन यांनी एका वेबसाईटवर आपली बाजू स्पष्ट करताना अहवालात कुठेही मुंबई पोलिसांना क्लिन चीट दिेलेली नाही असे स्पष्ट केले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने ३० मे २००९ च्या अंकात बालचंद्रन यांच्या रिडिफ डॉट कॉमचा हवाला देत सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. मुंबई पोलिसांनी आठ तर शासनाने १६ गंभीर चुका केल्या. या चुका टाळल्या गेल्या असत्या तर करकरे, कामटे, साळसकर यांचे प्राण वाचले असते, असे बालचंद्रन यांनी म्हटल्याचे कळते. मुंबई पोलीस दलातील उच्च नेतृत्त्वाचा आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांचा एकमेकांशी समन्वय नव्हता. तसा समन्वय असता तर अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांचा नाहक जीव गेला नसता. हल्ल्याला सामोरे जाताना पोलीस दलाने काही महत्त्वाच्या बाबींना सामोरे जाणे गरजेचे होते. परंतु नेमके तेच पाळले गेलेले नाही. कुठल्याही प्रकारचा समन्वय न ठेवता ज्येष्ठ पोलीस अधिकारी हल्ल्याच्या विविध ठिकाणी गेले. अनेक अधिकारी कामा इस्पितळाच्या दिशेने गेले. त्यामुळे ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे बळी गेले, असेही त्यांनी आपल्या ‘ब्लॉग’वर म्हटले आहे. विशेष म्हणजे आता हा ‘ब्लॉग’ हटविण्यात आला आहे. हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलिसांचे जे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचणे आवश्यक होते ते उशिरा पोहोचले. पोलिसांकडे पुरेशी एके ४७ तसेच इतर शस्त्रे असतानाही त्याचा पुरेसा वापर झाला नाही, असेही त्यात नमूद आहे. कोण अधिकारी काय करतोय याचाही कुणाला पत्ता नव्हता. पोलिसांचे नेतृत्त्व करणारा अधिकारी घरी बसून नियंत्रण करीत होता, असेही त्यात म्हटले आहे.