Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

राष्ट्रवादीच्या परतीच्या प्रवासाची सुरुवात?
संगमांचे ‘हृदयपरिवर्तन’; सोनियांची १० वर्षांनंतर भेट
नवी दिल्ली, २ जून/खास प्रतिनिधी

 

डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कन्येला स्थान मिळाल्यानंतर काँग्रेस आणि सोनिया गांधी यांचे कट्टर विरोधक माजी लोकसभा अध्यक्ष पी. ए. संगमा यांचे ‘ह्रदयपरिवर्तन’ झाले. आज सायंकाळी त्यांनी १०, जनपथ येथे त्यांनी कन्या अगाथा यांच्यासह सोनिया गांधींची भेट घेतली. सर्व राजकीय मुद्दे संपलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मूळ काँग्रेसकडे परतीचा प्रवास सुरु होण्याची ही प्राथमिक लक्षणे आहेत, असा अर्थ सोनिया-संगमा यांच्या भेटीतून काढला जात आहे.
सोनिया गांधी कुठल्याही स्थितीत ंपंतप्रधान होऊ नये म्हणून पवार, संगमा आणि तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. पण पंतप्रधान होण्याची शक्यता स्वत सोनियांनीच संपुष्टात आणल्यामुळे राष्ट्रवादीच्या अस्तित्वाचा मुख्य मुद्दाच निकालात निघाला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधानपद पटकाविण्यासाठी सारी ताकद पणाला लावूनही त्यांच्या पक्षाला केवळ नऊच जागा मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचा सारा जोमच ओसरला आहे. त्यानंतर आपल्या राजकीय वारसांची सोय लावण्यासाठी काँग्रेसशी जुळवून घेणेच क्रमप्राप्त ठरेल, असा सूर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमटू लागला आहे.
संगमा यांचा सोनिया गांधींना असलेला टोकाचा विरोध बघता या प्रक्रियेत त्यांचीच अडचण ठरू शकेल. त्यामुळे संगमा यांच्या कन्येचा मंत्रिमंडळात समावेश केल्यास त्यांचा रोष निवळेल, असे राष्ट्रवादीच्या वतीने काँग्रेसश्रेष्ठींना सुचविण्यात आले. त्यानुसार काँग्रेसने अगाथा संगमा यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यानंतर पी. ए. संगमा यांचा विदेशी वंशाच्या सोनिया गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाबद्दल असलेला रोष ‘संपुष्टात’ आला. शरद पवार यांच्या निर्देशावरूनच संगमा यांनी सोनियांची भेट घेतल्याचे काँग्रेस सूत्रांचे म्हणणे आहे. आधी संगमांची नाराजी दूर करायची, नंतर हळूहळू काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अंतर मिटवायचे, असे या भेटीमागचा हेतू असल्याचे काँग्रेस सूत्रांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या अवघ्या आठ जागाजिंकल्यामुळे आपल्या खऱ्या क्षमतेचा परिचय झाल्याने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले आहेत. त्यातच विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे केंद्रातील सत्ताधारी काँग्रेसच्या पाशातून सुटून महाराष्ट्रात वेगळी राजकीय समीकरणे तयार करण्याची धमक आता राष्ट्रवादीमध्ये राहिलेली नाही. त्यामुळेच संगमा यांच्या माध्यमातून काँग्रेसशी जुळवून घेण्याचे व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पार पडल्यावर दीड-दोन वर्षांत काँग्रेसच्या प्रवाहात पुन्हा ‘एकरुप’ होण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असेच सोनिया-संगमा यांच्या भेटीचे वर्णन करण्यात येत आहे.