Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

प्रादेशिक

‘पर्यावरणसंरक्षणाचे एव्हरेस्ट सर करायचे आहे’
मुंबई, २ जून / प्रतिनिधी

एव्हरेस्ट शिखर सर करणे ही प्रत्येक गिर्यारोहकाची महत्त्वाकांक्षा असते. पुण्याच्या कृष्णा पाटीलने वयाच्या १९ व्या वर्षीच ही कामगिरी फत्ते केली. कृष्णा म्हणते की, ही केवळ सुरुवात आहे. यापुढे पर्यावरण संरक्षणासाठी काम करत राहणे ही माझी इच्छा आहे. भारतातील हिमालय, गंगोत्री, यमनोत्री या भागात मोहिमा काढून त्या ठिकाणी पर्यावरणविषयक जागृती निर्माण करणे आणि तेथे पर्यावरण संरक्षणासाठी काम करणे हे तिचे ध्येय राहणार आहे.

मध्य व पश्चिम रेल्वेच्या मदतीला सरसावले एमआरव्हीसी
एटीव्हीएम आणि फर्निचरसाठी सात कोटींचा निधी
कैलास कोरडे
मुंबई, २ जून

तिकीट खिडक्यांवरील लांबलचक रांगामुळे त्रस्त मध्य व पश्चिम रेल्वेला एटीव्हीएम आणि तिकीट खिडक्यांसाठी नवे फर्निचर घेण्यासाठी सात कोटींचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) घेतला आहे. या निर्णयामुळे दोन्ही रेल्वेंप्रमाणेच प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळेल. तसेच नव्या फर्निचरमुळे तिकीट खिडक्यांचाही चेहरामोहरा बदलून जाईल. मध्य व पश्चिम रेल्वेने केलेल्या मागणीमुळे हा निर्णय घेण्यात आला.

नक्षलवादाचा बीमोड करण्याची सरकारची इच्छाशक्ती नाही
विरोधकांचा आरोप !
मुंबई, २ जून/ खास प्रतिनिधी
यापुढे सरकार पोलिसांचे मृत्यू पाहात राहणार नाही, तर नक्षलवादाचा संपूर्ण बिमोड करेल, असे स्पष्ट आश्वासन देत गृहमंत्री जयंत पाटील यांनी यापुढे नागपूर ऐवजी गडचिरोलीतून पोलीस महानिरीक्षक नक्षलवादविरोधी मोहीम राबवतील, असे सांगितले. गडचिरोलीचे दोन पोलीस जिल्हे तयार करण्यात येणार असून गोंदियासह याठिकाणी तीन पोलीस अधीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी १०० कोटी रुपयांची अत्याधुनिक साधनसामुग्री तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.

दक्षिण, मध्य मुंबईतील जनतेचे पाण्यावाचून हाल!
मुंबई, २ जून / प्रतिनिधी

वांद्रे येथे रेल्वेच्या पाचव्या व सहाव्या मार्गासाठी मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा धरणाची जलवाहिनी खोलवर नेण्याचे काम पालिका प्रशासनाने हाती घेतल्यामुळे दक्षिण मध्य मुंबईतील अनेक विभागात आज पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे या परिसरातील जनतेचे हाल झाले. हजारो लोकांचे पाण्यावाचून हाल होत असताना महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते किंवा वरिष्ठ अधिकारी यांनी या परिसराला भेट देऊन लोकांचे साधे ग्राहणे ऐकून घेण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे आधीच हैराण झालेल्या जनतेने संताप व्यक्त केला.

प्रभागात कमी खड्डे असणाऱ्या अधिकाऱ्यांना बक्षिस!
मुंबई, २ जून / प्रतिनिधी

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही रस्त्यांवरील खड्डे बुजविताना पालिका प्रशासनाच्या नाकी नऊ येण्याची शक्यता असून आता ज्या विभागातील रस्त्यांवर कमी खड्डे असतील त्या विभागातील अभियंत्यांना ‘बक्षीस’ देण्याचा विचार प्रशासन करीत आहे. मात्र ज्या विभागांत जास्त खड्डे असतील त्या विभागातील अभियंत्यांना ‘सजा’ही भोगावी लागणार आहे.पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे ही मोठी समस्या आहे. मध्यंतरी हे प्रकरण तर उच्च न्यायालयातही गेले होते. न्यायालयाने पालिकेचे चांगलेच कान टोचले होते. या वर्षी २०मेपर्यंत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येतील, अशी घोषणा पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आर. ए. राजीव यांनी केली होती. मात्र आता ठेकेदारांना मुदतवाढ देण्यात आली आहे. खड्डे बुजविण्यासाठी नागरिकांना बक्षीस देण्यात यावे, अशी सूचना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी गेल्या वर्षी केली होती. ही सूचना अंमलात आली नाही मात्र आता पालिका प्रशासनाने आपल्या अधिकाऱ्यांना ‘बक्षीस’ देण्याचा विचार सुरू केला आहे. ज्या अभियंत्यांच्या विभागातकमी खड्डे असतील त्या अभियंत्यांना पगारवाढ देण्याचा आणि ज्यांच्या विभागात जास्त खड्डे असतील त्यांची पगारवाढ रोखण्याचा एक प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधिन असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, टेलिफोन कंपन्या, वीज कंपन्यांनी केलेले खड्डे त्यांनी ताबडतोब बुजवावेत, असा दम पालिकेने या कंपन्यांना भरला आहे.

केबलच्या वादातून युवक काँग्रेस उपाध्यक्षाची हत्या
कल्याण, २ जून/वार्ताहर

कल्याण पूर्व भागातील युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष देवीदास गायकवाड यांच्यावर केबलच्या वादातून सुमारे २० ते २५ जणांनी जीवघेणा हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना डोंबिवलीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असता ते मृत झाले. कल्याण पूर्व भागात राहणारे देवीदास गायकवाड यांचा आपल्या भूखंडामधून केबल न्यायची नाही, यासाठी गेले तीन वर्ष वाद सुरू होता. त्यांनी न्यायालयातून मनाई आदेशही आणला होता. या वादातून रात्री ११ वाजता सुमारे २० ते २५ जणांनी तलवार, चॉपर, सळ्यांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मारहाण झाली. त्यांना डोंबिवलीमधील खासगी रुग्णालयात दाखल केले असता ते मृत पावले. त्यांनी आपल्यावर हल्ला केलेल्या २० जणांची नावे पोलिसांना दिली आहेत. याबाबत कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बांधकाम साहित्य पडून मुलगा ठार
बांधकाम साहित्य डोक्यात पडून तेजस अशोक मढवी (१४) हा जागीच मृत झाल्याची घटना आज दुपारी गांधारी रोड परिसरात घडली आहे.

नद्यांचे प्रदूषण : तीन महिन्यात कृति आराखडा
मुंबई, २ जून / प्रतिनिधी

राज्यातील नद्यांच्या प्रदूषणाबाबत तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली असून तीन महिन्यात या संदर्भात कृति आराखडा तयार करण्यात येईल, अशी घोषणा आज विधानपरिषदेत करण्यात आली. शिवसेनेच्या निलम गोऱ्हे यांनी या विषयावर अर्धातास चर्चा उपस्थित केली होती. ‘लोकसत्ता’ने नद्यांच्या प्रदूषणावर लेखमाला प्रसिद्ध केली होती. .याचे पडसाद आज विधान परिषदेत उमटले. राज्यातील बुहतेक नद्या प्रदूषित झाल्या आहेत. मात्र याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून या संदर्भात तयार करण्यात आलेला अहवाल मंत्रिमंडळापुढेही ठेवण्यात आलेला नाही, अशी तक्रार गोऱ्हे यांनी केली. या चर्चेला उत्तर देताना जलसंपदा राज्यमंत्री विजय वड्डेट्टीवार यांनी सांगितले की, हा अहवाल राज्य मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात आला असून सरकारने तज्ज्ञांची एक समितीही नियुक्त केली आहे. या समितीने तीन महिन्यात कृति आराखडा तयार करावा, असे त्यांना सांगण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, पर्यावरण खाते, केंद्र सरकार यांच्याशी या बाबत विचारविनीमय करून ठोस उपाय केले जातील, असेही राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

अण्णा हजारे राज्यव्यापी दौरा करणार
मुंबई, २जून / प्रतिनिधी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती हे उघड झाल्याने राज्यात खळबळ माजली असून स्वत: अण्णा हजारे याच्या निषेधार्थ राज्यव्यापी दौरा करणार आहेत. काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांची हत्या करणाऱ्यांनाच अण्णा हजारेंची सुपारी देण्यात आली होती. गृहमंत्री जयंत पाटील यांनी हजारे पोलीस संरक्षण देण्याची घोषणा केली. मात्र हे संरक्षण नाकारून हजारे यांनी ११ जूनपासून राज्यव्यापी दौरा करण्याची घोषणा केली आहे.