Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

जल्लोष कृष्णाच्या स्वागताचा
अमेय गिरोल्ला

विमानतळावर उतरताच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी घातलेला वेढा.. आई, आजी, मावशीसकट सर्व नातेवाईकांनी मारलेल्या कडकडून मिठय़ा.. सोबत गळ्यात घातले जाणारे हार व एकामागोमाग मिळणारा पुष्पगुच्छांचा नजराणा.. विमानतळावरील सर्वसामान्य मराठी जनांकडून केला जाणारा कौतुकाचा वर्षांव.. तर अमराठी व्यक्तींकडून कुतूहलपूर्वक केली जाणारी विचारपूस.. अशा अतिशय भारलेल्या वातावरणात एव्हरेस्ट कन्या कृष्णा पाटील हिचे मुंबई विमानतळावर स्वागत करण्यात आले.

मूड फेस्टिवल
प्रतिनिधी

एप्रिल-मे महिना म्हणजे खरं तर सुटय़ांचा हंगाम. सकाळी सॉरी, दुपारी सूर्य मध्यान्ही आल्यावर उठायचं आणि चंद्र मावळतीकडे झुकायला लागला की मगच झोपायचं असा तरुणाईचा खास दिनक्रम.. म्हणजे सुट्टय़ा आणि आराम यांचे तसे जवळचे नातेच बनले आहे, पण या सगळ्याला छेद देत झेवियर्स आणि एन. एम. महाविद्यालयाचे विद्यार्थी मात्र सध्या जोरदार काम करीत आहेत. अलबत निमित्त आहे ‘मल्हार- ०९’ आणि ‘उमंग-०९’ या दोन तरुणाईवर राज्य करण्याच्या कॉलेज फेस्टिवल्सचे

५१ हजारात लग्न !
प्रतिनिधी

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधण्यात येतात असे म्हटले जात असले तरी त्या पृथ्वीवरच पक्क्या कराव्या लागतात. एकदा का ही गाठ पक्की झाली की लग्नासाठी हॉल, सजावट, जेवणावळ इत्यादीकरिता दीड-दाने लाखांचा खर्च सहज होतो. सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात लग्नावर एवढा पैसा खर्च करणे अनेकांना नकोसे होते. यावर उपाय म्हणून लग्नासाठीही ‘पॅकेज डील्स’ निघाले आहेत. याअंतर्गत केवळ ५१ हजार रुपयांत साग्रसंगीत लग्न करून देण्यात येते. या संदर्भातील एक प्रदर्शन ४ ते ७ जून दरम्यान प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये एक प्रदर्शन भरविण्यात येत आहे.

नेक्स्ट जनरेशन फ्युएल
पेट्रोल, डिझेल आदी इंधनाचे साठे संपुष्टात येत आहेत आणि जगभरात पेट्रोल-डिझेलसाठी मागणी वाढत आहे. यामुळे मागणी आणि पुरवठय़ातील तफावत वाढत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी भविष्यात पर्यायी इंधन तयार करण्याच्या दृष्टीने विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये जैवतंत्राचा वापर करून इंधन तयार करण्याच्या प्रक्रियेच्या विविध संशोधनांमध्ये जगभरातील शास्त्रज्ञ व्यस्त आहेत. हे सर्व संशोधन सुरू असताना त्यातून निर्माण होणारे उत्पादन आर्थिक आणि पर्यावरणदृष्टय़ा सोयीस्कर असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्याकडून ‘तिरुपतीवारी’तील अधिकाऱ्यांना वाचविण्याचे प्रयत्न!
प्रतिनिधी

दक्षिण मुंबईतील डीसी रूल ३३ (७) अंतर्गत कोटय़वधी रुपयांचे पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी सुमारे ४०० सकारी अधिकाऱ्यांना एका खासगी बिल्डरने घडविलेल्या तिरुपतीवारीतील अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील एक मुदतवाढ मिळालेला अधिकारी प्रयत्नशील असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळते.
या ४०० अधिकाऱ्यांमध्ये म्हाडातील सव्वाशे अधिकारी असल्याचे स्पष्ट झाले असून त्यापैकी ४० हून अधिक अधिकाऱ्यांची नावे बाहेर आली आहेत.

माजी विद्यार्थी संघ शाळेच्या विकासातील मुकुटमणी - सुधीर जोगळेकर
प्रतिनिधी

शाळेतील कौटुंबिक वातावरण विद्यार्थ्यांच्या विकासाबरोबर शाळेचा विकास करीत असते. माजी विद्यार्थी संघ या विकास प्रक्रियेतील एक मुकुटमणी आहे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक सुधीर जोगळेकर यांनी सोमवारी येथे केले. कल्याणमधील न्यू हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा ६९ वा वर्धापनदिन आणि माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शाळेत आयोजित केला होता. यावेळी माजी आमदार प्रभाकर संत, शिवसेनेचे उपनेते अनंत तरे, संस्थेचे उपाध्यक्ष जोगळेकर, शालेय समितीचे अध्यक्ष बार्सेकर, प्राचार्य खैरे उपस्थित होते. शाळेची स्थापना १९४१ मध्ये झाली. त्यावेळेपासूनचे माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

निकालाची भीती!
‘‘रोहन, आज सकाळपासून कॉम्प्युटरला हात लावला नाहीस. दोन दिवस पाहतेय मित्रांमध्येही जात नाहीस, काय होतंय?’’ नेहा- ‘‘आई, हल्ली रात्री दचकून जाग येते, खूप धडधडतं, भूकच लागत नाहीये. कसंतरी होतंय. का ते कळत नाही.’’ असे संवाद अनेक घरांत सुरू झाले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीची मजा अचानक संपून गेलीये. याला कारण म्हणजे दहावी-बारावी- ‘सीईटी’चे निकाल जवळ येत चाललेत. वर्षभर या निकालांची तयारी मुलांनी तसेच पालकांनीही कष्टाने केलेली असते.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा अभ्यासक्रम तयार करण्यास समिती स्थापन करावी
प्रतिनिधी

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या लढय़ाला ४९ वर्षे पूर्ण झाली असून या लढय़ाने यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण केले आहे. त्या पाश्र्वभूमीवर या चळवळीचा इतिहासाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकतेच जाहीर केले आहे. या निर्णयाचे समतावादी छात्रभारतीने स्वागत केले असून संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ाचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तत्काळ समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. याबाबत संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिले आहे.

देशातील पहिल्या सेंटर फॉर एनर्जी बायोसायन्सचे उद्घाटन
प्रतिनिधी

मुंबईतील ‘इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’ म्हणजेच आयसीटीमध्ये देशातील पहिल्या सेंटर फॉर एनर्जी बायोसायन्सचे उद्घाटन आयसीटीचे माजी संचालक डॉ. एम. एम. शर्मा यांच्या हस्ते नुकतेच झाले. आर्थिकदृष्टय़ा सोयीस्कर अशी जैवइंधन प्रक्रिया तयार करण्याच्या दृष्टीने संशोधन करण्यासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेल यासारख्या इंधनाच्या उत्पादन प्रक्रियांच्या किमती सुमारे ५० टक्क्यांनी घटविण्यासाठीचे प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान डॉ. एम. एम. शर्मा यांचे वीजनिर्मितीविषयक भारत आणि जगभरातील परिस्थिती याचा आढावा घेणारे भाषण झाले. यामध्ये त्यांनी पर्यायी इंधनांचा आणि वीजनिर्मितीचा आढावा घेतला. तसेच हे सर्व पर्याय कशा प्रकारे विकसित व्हायला हवेत याची समीकरणेही स्पष्ट केली. केंद्राचे प्रमुख प्राध्यापक डॉ. अरविंद लाली यांनी केंद्रात यशस्वी झालेल्या बायोइथेनॉल प्रकल्पाची माहिती यावेळी दिली. तर डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे चित्रीत केलेले भाषण यावेळी दाखविण्यात आले. त्यांनीही या केंद्राची गरज का आहे ते आपल्या भाषणातून स्पष्ट केले. कार्यक्रमाला विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अख्यत्यारित येणाऱ्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या डॉ. रेणू स्वरूप उपस्थित होत्या. त्यांनी शासनातर्फे या संशोधन प्रक्रियेला पूर्णत: पाठिंबा मिळेल, असे आश्वासन दिले. यावेळी आयसीटीचे नवनिर्वाचित संचालक डॉ. जी. डी. यादव, डॉ. जी. बी. जोशी हे व्यासपीठावर होते. तर वैज्ञानिक क्षेत्रातील विविध मान्यवर आणि आयआयटी मुंबईचे संचालक डॉ. देवांग खक्कर उपस्थित होते. आयसीटी आणि आयआयटी यांनी समन्वयाने काम करण्याच्या दृष्टीने बोलणी सुरू झाली असल्याचे यावेळी अधिकृतरित्या सांगण्यात आले.

‘मलबार हिल, गिरगाव परिसरातील पाणी समस्या प्राधान्याने सोडवणार’
प्रतिनिधी :
मलबार हिल, गिरगाव, ग्रॅन्ट रोड परिसरातील पाणी टंचाईचा प्रश्न बिकट झाला असून काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. या परिसरातील पाणीटंचाई आधी सोडवण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिकेने करावा आणि मग दक्षिण मुंबईला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याची योजना राबवावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी अलिकडेच पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटून केली. या परिसरातील स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह योगिता जुईकर (अध्यक्षा - स्थापत्य समिती शहर), मलबार हिल विधानसभा भाजपचे अध्यक्ष सिद्धार्थ गमरे, बाणगंगा रहिवासी संघाचे संदीप दुबे तसेच विविध रहिवाशांनी पालिकेचे हायड्रॉलिक इंजिनिअर संतोष कार्लेकर यांची भेट घेऊन परिसरातील पाणी टंचाईच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले.
या प्रश्नाची सोडवणूक केल्यानंतरच कफ परेड, कुलाबा व मोहम्मद अली रोड परिसरातील अतिरिक्त पाणी पुरवठय़ाचा विचार करावा, अन्यथा या विषयावर रहिवाशांतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रतिनिधी मंडळाने पालिकेला दिला. या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करून तातडीने कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन या वेळी कार्लेकर यांनी प्रतिनिधी मंडळाला दिले.