Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

‘स्वीकृत’ निवडीवरून ‘राष्ट्रवादी’त वादंग
नाराज गटाचे शिष्टमंडळ पक्षश्रेष्ठींना भेटणार

नगर, २ जून/प्रतिनिधी

स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा वाद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री दिलीप वळसे यांनीच या निवडींबाबत स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केल्यानंतर आता निवडींच्या विरोधात पक्षांतर्गत मोहीम सुरू आहे. आज येथे झालेल्या बैठकीत हा प्रश्न धसास लावण्याचे ठरल्याचे समजते. मुळातच विलंबाने झालेल्या महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांसह स्थायी समितीच्या सदस्यांची निवड प्रक्रियासुद्धा वादग्रस्त ठरली आहे. त्यातून विविध कायदेशीर बाबीही पुढे आल्या आहेत.

नूतनीकरण - दालनाबरोबरच जि. प. अध्यक्षपदाचेही?
नगर, २ जून/प्रतिनिधी

जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे यांच्या दालनाचे पुन्हा नूतनीकरण केले जात आहे. त्यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाल येत्या सप्टेंबरमध्ये संपत आहे. मात्र, त्यापुढेही आपणच अध्यक्ष असू, पदावरचा आपला दावा कायम असेल, असेच त्यांना नूतनीकरणातून सूचित करायचे असल्याचे मानले जाते; अन्यथा उर्वरित तीन महिन्यांसाठी त्यांनी नूतनीकरण केले नसते, असा दावा विखेसमर्थक करतात. नवीन प्रशासकीय इमारतीत अध्यक्षांचे दालन आहे. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दोन वर्षांपूर्वी त्यांनी दालनाचे नूतनीकरण केले होते. त्यांच्या दालनासमोर असलेल्या स्थायी समितीच्या छोटेखानी सभागृहाचे अलीकडेच नूतनीकरण करण्यात आले.

‘निळवंडे व भंडारदरा जलसाठय़ाचे एकत्र व्यवस्थापन हवे’
शेतकरी सहविचार सभेत ठराव

अकोले, २ जून/वार्ताहर

निळवंडे धरणाच्या डोंगराच्या कडेने जाणाऱ्या उच्चस्तरीय कालव्यांमधून तालुक्यातील प्रवरा पट्टय़ातील शेतीला प्रवाही पद्धतीने पाणी देणे शक्य आहे. मात्र, त्यासाठी निळवंडे व भंडारदरा धरणातील जलसाठय़ाचे एकत्रित व्यवस्थापन करावे, असा ठराव येथे झालेल्या शेतकरी सहविचार सभेत करण्यात आला. निळवंडय़ाचे सध्याचे कालवे रद्द करून फक्त उच्चस्तरीय कालवेच ठेवावेत, अशी मागणीही करण्यात आली. निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कालव्यांबाबत तालुका किसान सभा, शेतकरी संघटना व अन्य संघटनांनी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

बचतगटांची उत्पादने विकण्यासाठी ‘बचत बाजार’
जिल्ह्य़ात ६ केंद्रांना मंजुरी

नगर, २ जून/प्रतिनिधी

बचतगटांची उत्पादने आकर्षक पॅक करून त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्ह्य़ातील पारनेर, कर्जत, जामखेड, नेवासे, शेवगाव व अकोले या सहा ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ‘बचत बाजार’ (ग्रामीण व्यापार केंद्र) उभारणार आहे. यंदा तीन व पुढील वर्षी तीन केंद्रे उभारली जातील. त्यासाठी प्रत्येकी १५ लाखांचा निधी मिळाला आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांनी ही माहिती दिली. पंचायत समिती कार्यालयाजवळ बचत बाजारच्या इमारती उभारल्या जातील. ग्रामपंचायत असणाऱ्या तालुका ठिकाणांना त्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे.

‘हजारे यांच्या हत्येची सुपारी देणाऱ्यांची सीबीआय चौकशी करा’
खासदार गांधींचे राष्ट्रपती, पंतप्रधानांना निवेदन

नगर, २ जून/प्रतिनिधी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी देण्याच्या प्रकाराची सीबीआयमार्फत सखोल चौकशी करावी, तसेच हजारे यांना चोख सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नगरचे खासदार दिलीप गांधी यांनी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, गृहमंत्री पी. चिदंबरम, विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे केली. समाज परिवर्तनाच्या कार्यात समर्पित वृत्तीने योगदान देणाऱ्या हजारे यांच्यासारख्या थोर समाजसेवकाच्या हत्येचा कट रचला जाणे हे दुर्दैवी व निषेधार्ह आहे.

‘प्रसारमाध्यमांवर प्रबोधनाची जबाबदारी’
पाथर्डी, २ जून/वार्ताहर

आज भोगवादी प्रवृत्तींनी उच्छाद मांडला आहे. पैसा हेच सर्वस्व मानणारी पिढी अधपतनाकडे जात आहे. द्वेष, इर्षां, क्रोध, लोभ या वर्तुळात माणूस माणूसपण हरवून बसला. बदलत्या परिस्थितीत प्रसारमाध्यमांची प्रबोधनाची जबाबदारी वाढली आहे, असे प्रतिपादन प्रबोधनकार निवृत्तीमहाराज इंदोरीकर यांनी केले. दुलेचांदगाव येथे यशवंतराव गर्जे ऊर्फ शास्त्रीमहाराज यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमात इंदोरीकरमहाराज बोलत होते. ते म्हणाले की, कीर्तनकार, बुद्धिजीवी व समाजकार्यकर्त्यांनी समाजप्रबोधनासाठी वेगळ्या वाटेने प्रयत्न करावेत. अंधश्रद्धा, संस्कारहीनता व व्यसनाधीनतेमुळे समाज रसातळाला जात असताना केवळ धर्माच्या नावावर अधोगती रोखता येणार नाही. कीर्तनकार, प्रवचनकारांवर जनतेचा असलेला विश्वास समाजपरिवर्तनासाठी सहाय्यभूत ठरणार आहे. गर्जे शास्त्रीमहाराजांनी आयुष्यभर रुग्णांची मोफत सेवा केली. त्यांनी सेवाभाव हाच धर्म मानल्याने वेगळ्या देवधर्माची त्यांना गरज भासली नाही, असे इंदोरीकरमहाराज म्हणाले. प्रास्ताविक शिवाजीराव गर्जे व सूत्रसंचालन बाबासाहेब गर्जे
यांनी केले. अंकुश गर्जे यांनी आभार मानले.

हत्येचा कट रचणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाईची मागणी
संगमनेर, २ जून/वार्ताहर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करावी, अशी मागणी भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या येथील शाखेने प्रांताधिकाऱ्यांकडे केली. हजारे यांच्या हत्येची सुपारी २५ लाखांना मिळाल्याची कबुली पवनराजे निंबाळकर खून खटल्यातील आरोपी सतीश मंदाडे व मोहन शुक्ल यांनी पोलिसांना दिल्यानंतर एकच खळबळ उडाली. संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी घालवून देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी माहिती अधिकाराचा कायदा करण्यास सरकारला भाग पाडले. विकेंद्रीकरणातून विकासकामांमध्ये लोकांचा सहभाग वाढवून देशाची विकासप्रक्रिया गतीशील करण्यास चालना दिली. अशा हजारे यांच्या हत्येची सुपारी दिली जाते, ही दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन शाखेच्या वतीने निवेदनाद्वारे प्रांताधिकारी सावरकर-खारकर यांच्याकडे करण्यात आली. या वेळी शिरस्तेदार सुरेश भालेराव उपस्थित होते.

‘जामखेडच्या पाणीप्रश्नी जलसंपदामंत्र्यांना भेटणार’
जामखेड, २ जून/वार्ताहर

निमगाव गांगर्डा धरणातून कृष्णा खोऱ्याचे हक्काचे पाणी दुष्काळी जामखेड तालुक्याला मिळवून देण्यासाठी राज्याचे जलसंपदामंत्री अजित पवार यांची लवकरच भेट घेणार असल्याची माहिती उद्योजक भाऊसाहेब जंजिरे यांनी दिली. श्री. जंजिरे यांनी जामखेडसह खडर्य़ास भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात इच्छूक उमेदवार आहेत. राष्ट्रवादीसह काँग्रेस कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली. श्री. जंजिरे म्हणाले की, कर्जत आणि जामखेड हे दुष्काळीच तालुके आहेत. कर्जतला कुकडीचे पाणी मिळाल्यामुळे कर्जतच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न जवळपास निकाली निघाला. जामखेडच्या पाण्याच्या प्रश्नाला आपण अधिक महत्त्व देणार आहोत. कृष्णा खोऱ्यातील हक्काचे पाणी जामखेडला देण्यासाठी सीना नदीवरील निमगाव गांगर्डा धरणातून बालाघाटाच्या कडेने कालवा काढून हे पाणी जामखेडला देता येईल. त्याचबरोबर जामखेडमधील विंचरणा, नांदणी (कौतुका), डोना व खैरी या प्रमुख नद्या दक्षिणवाहिनी असल्याने या नद्यांमधून पाणी सोडल्यास तालुक्यातील साधारण ४० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते. तालुक्यातील पाण्याच्या प्रश्नाबरोबरच रोजगाराचा प्रमुख प्रश्न आहे. रोजगाराच्या संधी तालुक्यातच निर्माण करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे श्री. जंजिरे यांनी सांगितले.

बेलापूर शुगरविरुध्द कारवाई न केल्याची तक्रार
श्रीरामपूर, २ जून/प्रतिनिधी

सहायक कामगार आयुक्तांनी वसुली प्रमाणपत्र देऊनही हरेगाव येथील बेलापूर शुगर इंडस्ट्रिजविरूद्ध कारवाई करण्यात आली नाही, अशी तक्रार सवरेद्योग कामगार संघाचे सरचिटणीस वसंतराव रणशूर यांनी केली आहे. राज्याचे तत्कालीन कामगारमंत्री भगवंतराव गायकवाड यांनी साखर कामगारांसाठी नेमलेल्या तिसऱ्या वेतन मंडळाने दिलेली अंतरिमवाढ व साखर कामगारांसाठी महागाई भत्त्यात करावयाची वाढ, यासंबंधी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न केल्याने सहायक कामगार आयुक्तांनी कंपनीविरूद्ध नऊ लाखांचे वसुली प्रमाणपत्र दिले. परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही, असे रणशूर म्हणाले. बेलापूर कंपनी ताब्यात घेऊन तिची गोविंदराव आदिक यांनी विक्री केली. परंतु कामगारांच्या कराराची अंमलबजावणी केली नाही. राजकीय दबावाखाली वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी होत नसल्याची माहिती रणशूर यांनी दिली.

डाळिंबावरील तेल्यानिर्मूलन;कर्जतला ५१ लाख अनुदान
कर्जत, २ जून/वार्ताहर

डाळिंबावरील तेल्या रोगाच्या निर्मूलनासाठी कर्जत व जामखेड तालुक्यांतील शेतकऱ्यांना ६० लाख ३७ हजार रुपयांचे अनुदान सरकारने मंजूर करून पाठविल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बी. पी. नेटके यांनी दिली. सन २००८ व २००९ या वर्षी डाळिंब फळावर तेल्या रोगाचा मोठा प्रादूर्भाव होता. या रोगावर राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करण्यात आले असले, तरी कर्जत व जामखेड तालुक्यांतील शेतकऱ्यांना मात्र अनुदान दिले जात नव्हते. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख सचिन पोटरे यांनी दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने अनुदान मिळावे, या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत कृषी विभागाने तातडीने हालचाल करून दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी आज अनुदान आल्याचे जाहीर केले. कर्जत तालुक्यासाठी ५१ लाख ३७ हजार, तर जामखेड तालुक्यासाठी ९ लाख रुपये अनुदान प्राप्त झाले. त्याचे धनादेश शेतकऱ्यांना तातडीने दिले जाणार आहेत.

जीवन प्राधिकरण विभागीय कार्यालय स्थलांतरास स्थगिती
श्रीरामपूर, २ जून/प्रतिनिधी

जीवन प्राधिकरणाच्या विभागीय कार्यालयाच्या स्थलांतरास मुख्यमंत्री अशोक चव्हाण व मंत्री अजित पवार यांनी स्थगिती दिल्याची माहिती आमदार जयंत ससाणे यांनी दिली. जीवन प्राधिकरणाचे कार्यालय १९८८मध्ये शहरात स्थापन करण्यात आले. सहा तालुक्यांचा कार्यभार कार्यालयाकडे असून जीवन प्राधिकरणाच्या नगरच्या अधीक्षक अभियंत्यांच्या सूचनेनुसार एक जूनपासून कार्यालय बंद करण्याचा आदेश देण्यात आला. कार्यालयाचे स्थलांतर क रू नये, यासाठी आमदार ससाणे यांनी मुख्यमंत्री चव्हाण व मंत्री पवार यांची भेट घेतली. कार्यालयामार्फत साठ क ोटींची कामे सुरू आहेत. कार्यालय हलविल्यास पाणीयोजनांवर परिणाम होऊ शकतो, असे ससाणे यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

वांबोरीला भुईमुगाच्या शेंगांची मोठी आवक
राहुरी, २ जून/वार्ताहर

भुसार मालासाठी प्रसिद्ध असलेल्या वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समितीत भुईमूग शेंगाची मोठय़ा प्रमाणात आवक झाली. आवक व बाजारभाव टिकून आहेत. ओल्या व वाळवलेल्या शेंगा विक्रीसाठी येऊ लागल्या. या हंगामात आजअखेर सुमारे आठ हजार पोत्यांची शेंगांची आवक झाली. आज सातशे पोत्यांची आवक झाली. ओल्या शेंगांचा बाजारभाव ११०० ते १४५० रुपये प्रतिक्विंटल, तर सुकलेल्या शेंगांचा भाव २००० ते २४५० रुपये निघाला. या बाजारात गहू, ज्वारी, बाजरी, मका, सूर्यफूल यासह भुईमूग शेंगा विक्रीसाठी येतात. भुईमुगाच्या शेंगासाठी वांबोरी बाजार समिती जिल्ह्य़ात प्रसिद्ध आहे. सध्या भुईमूग शेंगा काढणीचा हंगाम व लगबग ग्रामीण भागात सुरू आहे. शेतकऱ्यांनी आपला भुसार माल कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती अरुण तनपुरे यांनी केले आहे. शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून व्यवस्थापनाने विशेष दखल घेऊन उपाययोजना केल्याचे वांबोरीचे व्यवस्थापक मुळे यांनी सांगितले.

अपंग मुलीवर बलात्कार; आरोपीस अटक
शेवगाव, २ जून/वार्ताहर

तालुक्यातील एरंडगाव शिवारातील उसाच्या शेतात अल्पवयीन अपंग मुलीवर बलात्कार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीस पोलिसांनी अटक केली. एरंडगाव (धस) येथील काही मजूर एका उसाच्या शेतात ऊस खुरपण्यासाठी गेले होते. या मजुरांत महिलांचा समावेश होता. त्यातील अल्पवयीन मुलगी पिण्याचे पाणी आणण्यासाठी उसातील पाईपलाईनवर गेली असता, तेथे दबा धरून बसलेल्या आरोपी पिनू ऊर्फ जमाल माणिक शेख (रा. सुसरे, तालुका पाथर्डी) याने मुलीस बळजबरीने उसाच्या शेतात नेत कुऱ्हाडीने मारून टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर पाशवी बलात्कार केला. बलात्कारीत जखमी मुलीस पुढील उपचारासाठी नगर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बलात्काराचा गुन्हा ३० मे रोजी घडला. परंतु काल रात्री या प्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. गुन्ह्य़ाचा तपास पोलीस निरीक्षक भास्कर पवार, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर करचे करीत आहेत.

‘वधू-वर सूचक उपक्रमास समाजाने सहकार्य करावे’
नगर, २ जून/प्रतिनिधी

विभक्त कुटुंबपद्धतीमुळे विवाह जमण्यास अडचणी निर्माण होतात. त्यासाठी सूचक मंडळांची गरज आहे. मराठा समाज वधू-वर सूचक मंडळाचा हा उपक्रम स्तुत्य आहे. समाजातील व्यक्तींनी एकत्र येऊन या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन लेखिका प्रा. मेधा काळे यांनी केले.
मराठा समाज वधू-वर सूचक मंडळातर्फे येथील ओम गार्डन मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्याचे उद्घाटन प्रा. काळे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून धर्मराज औटी, बाळासाहेब पवार, सुनीता नरसाळे, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. स्वागत मंडळाचे अध्यक्ष महादेव निमसे व आशा निमसे यांनी केले. प्रास्ताविक राजेंद्र चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन मृदुला लिमये-जोशी यांनी केले. या वेळी स्मरणिकेचे प्रकाशन सुनीता नरसाळे यांनी केले.

खत विक्रेत्यावरील कारवाईस स्थगिती
कर्जत, २ जून/वार्ताहर

तालुक्यातील रासायनिक खतांचे व्यापारी ए. आर. दोशी यांचा खतविक्रीचा परवाना तात्पुरता रद्द करण्याच्या कारवाईस जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी टी. एन. देशमुख यांनी आज स्थगिती दिली. दोशी यांनी करमाळा तालुक्यातील उमरड येथील शेतकऱ्याला खते विकल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्ह्य़ाबाहेर खते विकल्यास कारवाई करण्याच्या आदेशानंतर ही कारवाई केली होती. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ही खते नेणारा टेम्पो पकडून राशीन दूरक्षेत्रात आणल्यावर पंचायत समितीचे कृषी अधिकारी रूपचंद जगताप यांच्या फिर्यादीवरून दोशी यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता. या कारवाईचे तालुक्यात तीव्र पडसाद उमटले. सोमवारी राशीन येथे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष, शेतकरी संघटना यांनी एकत्र येऊन अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले. खंडणीसाठी ही कारवाई झाल्याचा अनेकांनी आरोप केला होता. या वेळी उपस्थित असलेले कृषी अधिकारी पोटे यांनी या प्रकरणी सुनावणी ५ जूनऐवजी आज घेण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले होते. त्यानुसार आज जि. प.चे कृषी अधिकारी देशमुख, पोटे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेत सुनावणी झाली. त्या वेळी दोशी, तसेच अजय दोशी, सुरेश शिंदे, शहाजीराजे भोसले, रामकिसन साळवे, शाहुराजे भोसले उपस्थित होते. १९८३ खंड ३२ (२) रासायनिक खते कायदा यानुसार, तसेच दोशी यांनी खते शेतकऱ्यास विकली होती, याआधारे त्यांचा तात्पुरता परवाना रद्द करण्याच्या कारवाईस स्थगिती देऊन परवाना पुन्हा बहाल केला.

अपघातामुळे वाहतूक तीन तास खोळंबली
देवळाली प्रवरा, २ जून/वार्ताहर

नगर-मनमाड रस्त्यावर राहुरी खुर्द येथे आज सकाळी मालमोटार व देशी दारूच्या खोक्यांनी भरलेल्या टेम्पोची समोरासमोर धडक होऊन टेम्पो व देशी दारूच्या मालाचे मोठे नुकसान झाले. टेम्पोचालकाने दिलेल्या फिर्यादीवरून मालमोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
बाभळेश्वरहून राहुरीमार्गे नगर येथे देशी दारूची खोकी घेऊन जाणारा टेम्पो (एमडब्ल्यू ९-७२२०) व नगरहून राहुरीच्या दिशेने येणारी मालमोटार (जीजे १-झेड ९००९) यांची समोरासमोर धडक झाली. सकाळी साडेअकरा वाजता हा अपघात घडला. अपघातामुळे दोन्ही बाजूंची रहदारी दुपारी तीनपर्यंत खोळंबली होती. टेम्पोचालक संजय सरोदे (वय ३५, बाभळेश्वर) याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातात टेम्पो व मालाचे अंदाजे दीड लाखाचे नुकसान झाले.

बनावट नेमणूकपत्र प्रकरण; तिघांना दि. ११पर्यंत कोठडी
देवळाली प्रवरा, २ जून/वार्ताहर

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी सहायकपदाचे बनावट नेमणूक आदेश देऊन सुशिक्षित तरुणांची फसवणूक करणाऱ्या तिघा आरोपींना ११ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. बांधकाम व्यावसायिक अल्ताफ इस्माईल शेख (वय ४५, जुना बाजार, नगर), तोतया पत्रकार कमाल खान (वय ५०, वरवंडी, तालुका राहुरी) व प्रवीण विनायक गिरी (वय ४५, विरार) या तिघा आरोपींनी संदीप जोशी, मनोज राजपूत (दोघे चाळीसगाव), प्रमोद खैरनार, मनोज पाटील (दोघे धुळे) व सुनील पाटील (सिंधखेड राजा) या कृषी सहायक परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून बनावट नेमणूक आदेश दिले होते. नेमणूक आदेश दिल्यानंतर प्रत्येकी ३ लाख रुपये देण्याचे ठरले होते. प्रभारी उप कुलसचिव भिकाजी पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघा आरोपींना सोमवारी अटक करण्यात आली. आरोपींना आज राहुरी न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश डी. एस. खेडेकर यांनी पोलीस कोठडी सुनावली.