Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘स्वीकृत’ निवडीवरून ‘राष्ट्रवादी’त वादंग
नाराज गटाचे शिष्टमंडळ पक्षश्रेष्ठींना भेटणार
नगर, २ जून/प्रतिनिधी

स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा वाद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री दिलीप वळसे यांनीच या निवडींबाबत स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केल्यानंतर आता निवडींच्या विरोधात पक्षांतर्गत मोहीम सुरू आहे. आज येथे झालेल्या बैठकीत हा

 

प्रश्न धसास लावण्याचे ठरल्याचे समजते.
मुळातच विलंबाने झालेल्या महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांसह स्थायी समितीच्या सदस्यांची निवड प्रक्रियासुद्धा वादग्रस्त ठरली आहे. त्यातून विविध कायदेशीर बाबीही पुढे आल्या आहेत. पालकमंत्री वळसे, तसेच भाजप-शिवसेना युतीनेही वेगवेगळ्या कारणांसाठी या निवडींना आक्षेप घेतला आहे. खुद्द वळसे यांनीच नाराजी व्यक्त केल्याने राष्ट्रवादीमध्ये दोन गट कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले.
विभागीय आयुक्तांकडे झालेली नगरसेवकांची गटनोंदणी व विविध निवडींच्या वेळी महापालिकेत गृहित धरण्यात आलेली गटनोंदणी हा न्यायालयीन मुद्दा ठरण्याची चिन्हे आहेत. भाजप-शिवसेना युती त्या दृष्टीने प्रयत्नशील असतानाच राजकीय पातळीवर स्वीकृत नगरसेवकांची निवड राष्ट्रवादीतच वादग्रस्त ठरू लागली आहे. या निवडींमुळे शहरातील पदाधिकाऱ्यांचा मोठा गट नाराज असून, वळसे यांच्या भूमिकेमुळे या गटाचे बळ आणखी वाढले आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत खुद्द वळसे यांना डावलले गेल्याचे समजते. त्यांनी शिफारस केलेली नावे ऐनवेळी वगळून दुसऱ्याच लोकांना ही संधी दिल्याचे सांगण्यात येते. शिवाय ज्यांची निवड करण्यात आली, त्यांच्या पक्षनिष्ठेवरही या गटाचा आक्षेप आहे. वळसे यांनी निवडीबाबत नाराजी व्यक्त केली असली, तरी तेवढय़ावर नाराज गटाचे समाधान झाले नाही. केवळ नाराजी व्यक्त करून पक्षाची प्रतिमा सुधारणार नाही, त्याची गंभीर दखल श्रेष्ठींनी घ्यावी यासाठी नाराज गट प्रयत्नशील आहे. या संदर्भात वळसे यांनी आमदार शिवाजी कर्डिले यांना फटकारल्याचे समजते.
गेले १०-१२ दिवस हा असंतोष खदखदत असतानाच आता मात्र वरिष्ठ पातळीवर त्याची दखल घेतली जावी, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. याच संदर्भात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील, तसेच जलसंपदामंत्री अजित पवार यांचेही लक्ष वेधण्यात आले आहे. सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू असून, परवा (गुरुवार) राज्य सरकारचा अर्थसंकल्प विधिमंडळात मांडण्यात येणार आहे. त्यानंतर स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीबाबत नाराज गटाला ठोस कार्यवाहीची अपेक्षा आहे.
याच संदर्भात आज सायंकाळी शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाल्याचे समजते. या बैठकीतही पक्षातील व्यक्तीकेंद्रीत राजकारणाबाबत अनेकांनी कमालीची नाराजी व्यक्त केली. विविध कारणांनी पक्षाची प्रतिमा दिवसागणिक रसातळाला चालल्याच्या भावना व्यक्त करून या सगळ्या गोष्टी थांबविण्यासाठी श्रेष्ठींनी प्राधान्याने स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीबाबत ठोस कारवाई करावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. त्यासाठी नाराज गटाचे शिष्टमंडळ येत्या एक-दोन दिवसांत मुंबईला जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेणार असल्याचे समजते.