Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

नूतनीकरण - दालनाबरोबरच जि. प. अध्यक्षपदाचेही?
नगर, २ जून/प्रतिनिधी

जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे यांच्या दालनाचे पुन्हा नूतनीकरण केले जात आहे. त्यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाल येत्या सप्टेंबरमध्ये संपत आहे. मात्र, त्यापुढेही आपणच अध्यक्ष असू, पदावरचा आपला दावा कायम असेल, असेच त्यांना नूतनीकरणातून सूचित करायचे असल्याचे मानले जाते; अन्यथा उर्वरित तीन महिन्यांसाठी त्यांनी नूतनीकरण केले नसते, असा दावा

 

विखेसमर्थक करतात.
नवीन प्रशासकीय इमारतीत अध्यक्षांचे दालन आहे. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दोन वर्षांपूर्वी त्यांनी दालनाचे नूतनीकरण केले होते. त्यांच्या दालनासमोर असलेल्या स्थायी समितीच्या छोटेखानी सभागृहाचे अलीकडेच नूतनीकरण करण्यात आले. त्याच वेळी त्यांच्या अॅण्टीचेंबरचेही नूतनीकरण झाले होते.
सभागृहाच्या नूतनीकरणावेळीच दालनाच्या नूतनीकरणाच्या खर्चास मंजुरी घेऊन ठेवण्यात आली होती. परंतु दालनाच्या नूतनीकरणाच्या कामास तेव्हा सुरुवात न करता ती कालपासून करण्यात आली.
जि. प. अध्यक्षपद मिळवण्यासाठी काँग्रेस अंतर्गत विखे व थोरात गटात रस्सीखेच होती. परंतु सव्वा-सव्वा वर्षांचा तह करीत विखे यांनी बाजी मारत प्रथम अध्यक्षपद मिळवले. थोरात गटाचे सत्यजित तांबे यांनी सव्वा वर्ष संपण्याची प्रतीक्षा सुरू केली. मात्र, कुरघोडी करीत श्रीमती विखे यांनी वाटचाल सुरू केली. ती पूर्ण होण्यास तीन महिने बाकी आहेत.
पुढील अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित आहे. त्याची प्रतीक्षा तांबे यांना आहे. परंतु सदस्यांची इच्छा असेल तर अध्यक्षपदावर आपण कायम राहू, असे पूर्वीच जाहीर करून श्रीमती विखे यांनी थोरात गटास आव्हान दिले आहे.
श्रीमती विखे यांनी आपल्या पसंतीनुसार पुन्हा दालनाचे नूतनीकरण करून पुढील कार्यकालासाठी आपला दावा कायम ठेवल्याचे मानले जाते. श्रीमती विखे सध्या मुंबईत असून, मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांच्या भेटी घेऊन जि. प.चे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या प्रयत्नात आहेत.