Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘निळवंडे व भंडारदरा जलसाठय़ाचे एकत्र व्यवस्थापन हवे’
शेतकरी सहविचार सभेत ठराव
अकोले, २ जून/वार्ताहर

निळवंडे धरणाच्या डोंगराच्या कडेने जाणाऱ्या उच्चस्तरीय कालव्यांमधून तालुक्यातील प्रवरा

 

पट्टय़ातील शेतीला प्रवाही पद्धतीने पाणी देणे शक्य आहे. मात्र, त्यासाठी निळवंडे व भंडारदरा धरणातील जलसाठय़ाचे एकत्रित व्यवस्थापन करावे, असा ठराव येथे झालेल्या शेतकरी सहविचार सभेत करण्यात आला. निळवंडय़ाचे सध्याचे कालवे रद्द करून फक्त उच्चस्तरीय कालवेच ठेवावेत, अशी मागणीही करण्यात आली.
निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कालव्यांबाबत तालुका किसान सभा, शेतकरी संघटना व अन्य संघटनांनी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी शेतकरी नेते रंगनाथ मालुंजकर होते. पाच वर्षांपूर्वीच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने उच्चस्तरीय कालव्यांना मंजुरी दिलेली आहे. मात्र, या कालव्यांमधून १५ जानेवारीपर्यंत पाणी देणे शक्य आहे. त्यानंतर पाणी देता येत नसल्यामुळे उच्चस्तरीय कालव्याचा प्रस्ताव मागे पडला. आता कालव्यांमधून उपसा करून तालुक्यातील उर्वरित शेतीला पाणी देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. आमदार मधुकरराव पिचड हा प्रस्ताव मंजूर व्हावा, यासाठी आग्रही आहेत. मात्र, किसानसभा, शेतकरी संघटना आदींचा त्यास विरोध आहे.
निळवंडे धरणाच्या कालव्याचा विमोचक ६१० मीटर तलांकावर आहे, तर उच्चस्तरीय कालव्यांसाठी ६३० मीटर तलांकावर विमोचक ठेवावा लागेल. ६१० ते ६३० मीटर तलांक पातळीत साठाद्वारे पाणी, जे निळवंडय़ाच्या लाभक्षेत्रासाठी आहे ते उच्चस्तरीय कालव्यांद्वारे सोडता येणार नाही. हे पाणी भंडारदरा लाभक्षेत्रासाठी वापरावे व इतकेच पाणी १५ जानेवारीपर्यंत भंडारदरा धरणातून सोडून पाणी पातळी ६३० मीटर तलांकापर्यंत ठेवावी. त्यामुळे निळवंडय़ाचे सर्व पाणी उच्चस्तरीय कालव्यातून देता येणार आहे. असे केल्यास सध्याची कालव्याची गरज राहणार नाही, अशी आग्रही मागणी या वेळी करण्यात आली. उच्चस्तरीय कालव्यांमधून सिंचन केल्यास सध्याच्या कालव्यांची गरज राहणार नसल्यामुळे या कालव्यांसाठी जाणारी तालुक्यातील बागायती जमीन वाढेल, तसेच प्रवाही पद्धतीने शेतीला पाटाचे पाणी मिळाल्यामुळे सिंचनासाठी विजेवर असणारे अवलंबित्व कमी होऊन उत्पादनखर्च मोठय़ा प्रमाणात कमी होईल. भूगर्भातील जलस्तरात वाढ होईल व प्रवरा खोऱ्यांचे बारमाही शेतीचे स्वप्न पूर्ण होईल, अशा भावना वक्तयांनी या वेळी व्यक्त केल्या.
निळवंडय़ातील पाण्यात तालुक्याचा नेमका हिस्सा किती? ज्या शेतकऱ्यांकडे प्रवरेचे पाणी उचलण्याचे परवाने आहेत त्यांना पुन्हा निळवंडय़ाच्या कालव्यातून पाणी उचलण्याचे परवाने देणार का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. असे असताना तालुक्यातील प्रत्येक खातेदाराला वैयक्तिक पत्र पाठवून ‘मी तुम्हाला निळवंडेचा पाणी परवाना देणार’ असे आश्वासन आमदार पिचड यांनी दिले आहे. हे पाणी परवाने निळवंडय़ाच्या कालव्यातून देण्याचा त्यांचा मनोदय आहे. मात्र, ही गोष्ट म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेची पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याची टीका या वेळी करण्यात आली.
उच्चस्तरीय कालव्यासाठी अधिग्रहीत करावयाच्या जमिनीस बागायती जमिनीच्या दराने मोबदला द्यावा, असा ठरावही या वेळी मंजूर करण्यात आला. श्री. मालुंजकर, चंद्रभान भोत, यादवराव नवले, डॉ. अजित नवले, एकनाथ वैद्य, रशीद पठाण, जालिंदर बंगाळ, डॉ. जनार्दन मोरे, विजय नाईकवाडी, आशा नाईकवाडी, मनेश ताजणे, विनायक धुमाळ, रामनाथ शिंदे आदी कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.