Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बचतगटांची उत्पादने विकण्यासाठी ‘बचत बाजार’
जिल्ह्य़ात ६ केंद्रांना मंजुरी
नगर, २ जून/प्रतिनिधी

बचतगटांची उत्पादने आकर्षक पॅक करून त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्ह्य़ातील पारनेर, कर्जत, जामखेड, नेवासे, शेवगाव व अकोले या सहा ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून

 

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ‘बचत बाजार’ (ग्रामीण व्यापार केंद्र) उभारणार आहे. यंदा तीन व पुढील वर्षी तीन केंद्रे उभारली जातील. त्यासाठी प्रत्येकी १५ लाखांचा निधी मिळाला आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांनी ही माहिती दिली. पंचायत समिती कार्यालयाजवळ बचत बाजारच्या इमारती उभारल्या जातील. ग्रामपंचायत असणाऱ्या तालुका ठिकाणांना त्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे.
विविध प्रकारची उत्पादने करणारे सात हजारांवर महिला बचतगट जिल्ह्य़ात कार्यरत आहेत. त्यांच्या उत्पादनांना ‘ब्रॅण्डनेम’ नसल्याने व बचतगटांकडे विक्री कौशल्य नसल्याने बाजारपेठेअभावी गुणवत्तापूर्ण उत्पादन असूनही मालास उठाव मिळण्यात अडचणी निर्माण होतात, ही बाब लक्षात घेऊन ग्रामीण व्यापार केंद्र (रुरल हट) योजना सुरू करण्यात आली आहे.
बचतगटांची उत्पादने बचत बाजारमध्ये ब्रॅण्डनेम देऊन आकर्षक पॅक करून विकण्यात येतील. नंतरच्या काळात बचत बाजार जिल्हा परिषद व डीआरडीएशी ऑनलाईन जोडले जातील.
ग्रामीण व्यापार केंद्रांतर्गत मोठय़ा गावांतील आठवडेबाजार विकसित केले जाणार आहेत. या गावांत प्रत्येकी अडीच लाख रुपये खर्चून ५ गाळे उभारले जातील. स्वयंरोजगारास चालना देण्यासाठी आठवडेबाजारावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. सुवर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेत २० टक्के निधी मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मिळतो. या निधीतून गाळे उभारले जातील. ५० गावांतील गाळ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. बचतगट, स्थानिक कारागीर यांना त्यात प्राधान्य मिळेल.
रस्त्यावर, धुळीत भरणारे आठवडेबाजार बंद करून त्याजागी विक्रेत्यांना छोटे ओटे बांधून दिले जाणार आहेत. एका गावात २ लाख रुपये खर्चून आठवडेबाजारात २० ओटे तयार केले जाणार आहेत. त्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आल्याची माहिती चौधरी यांनी दिली.