Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘हजारे यांच्या हत्येची सुपारी देणाऱ्यांची सीबीआय चौकशी करा’
खासदार गांधींचे राष्ट्रपती, पंतप्रधानांना निवेदन
नगर, २ जून/प्रतिनिधी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी देण्याच्या प्रकाराची सीबीआयमार्फत सखोल चौकशी करावी, तसेच हजारे यांना चोख सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नगरचे खासदार दिलीप गांधी यांनी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, गृहमंत्री पी.

 

चिदंबरम, विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे केली.
समाज परिवर्तनाच्या कार्यात समर्पित वृत्तीने योगदान देणाऱ्या हजारे यांच्यासारख्या थोर समाजसेवकाच्या हत्येचा कट रचला जाणे हे दुर्दैवी व निषेधार्ह आहे. हजारे यांचे जीवन विश्वकल्याणासाठी मोलाचे आहे. नगर जिल्ह्य़ाचा नावलौकिक जगात पोहोचविणाऱ्या अण्णांच्या बाबतीत घडलेला हा प्रकार समाजजीवनाला कलंक आहे, असे गांधी यांनी निवेदनात म्हटले आहे.
जनआंदोलनाचा इशारा
हजारे यांच्या आंदोलनामुळे अनेक राजकीय पुढाऱ्यांचा भ्रष्टाचार, गैरव्यवहार चव्हाटय़ावर आला. त्यांच्या हत्येची सुपारी देणारे तेरणा सहकारी साखर कारखान्याशी संबंधित आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करून सुपारी देणाऱ्यांना त्वरित अटक करावी; अन्यथा भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनातर्फे राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा जनआंदोलनाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक सब्बन यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
‘तेरणा’विरुद्ध अण्णांनी आंदोलन करून गैरव्यवहारांची पोलखोल केली होती. त्यामुळे संबंधितांनी वैफल्यापोटी ही कृती केली असावी. माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत आयोगाच्या कामकाजादरम्यानही अण्णांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल राज्याच्या गुप्तचर विभागाने दिला होता. त्या वेळी त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली. मात्र, नंतर ती अण्णांनी नाकारली. गुप्तचरांचा अहवाल मात्र पुन्हा पुन्हा धोक्याची सूचना देत होता. उघडकीस आलेल्या या प्रकाराची राज्य सरकारने गंभीर दखल घ्यावी. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा तपास लावावा, असे पत्रकात म्हटले आहे.
महासंघातर्फे आज निषेध सभा
हजारे यांच्या हत्येची सुपारी देणारे व घेणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या महासंघातर्फे उद्या (बुधवारी) सकाळी ११ वाजता गांधी मैदानात जाहीर सभा घेण्यात येणार आहे. या वेळी देशद्रोही भ्रष्टाचाऱ्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात येईल, अशी माहिती श्याम आसावा, संदीप कुसळकर, सुवालाल शिंगवी, एकनाथ कराळे, राजेंद्र पवार, शबाना शेख, दीपा कुरेशी, मीना शिंदे आदी संस्था प्रतिनिधींनी दिली.