Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

गट शिक्षणाधिकारी सुलोचना पटारे निलंबित
बेवारस पुस्तके, गणवेष साठा
नगर, २ जून/प्रतिनिधी

श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर केंद्र शाळेत आढळलेल्या पाठय़पुस्तके व गणवेषाच्या बेवारस साठाप्रकरणी पंचायत समीतीच्या गट शिक्षणाधिकारी सुलोचना पटारे यांना निलंबित करण्याचा आदेश देण्यात आला. याच संदर्भात श्रीरामपूरमधील तालुका मास्तर, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी

 

अशा सातजणांची विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
पटारे यांना निलंबित करण्याचा शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त सचिवांचा आदेश तीन दिवसांपूर्वीच प्राथमिक शिक्षण विभागाला मिळाला. मात्र, त्यावर कार्यवाही झाली नसल्याची बाब मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम माने यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत आदेश दिले.
दोन वर्षांपूर्वी सन २००७मध्ये अशोकनगरच्या केंद्र शाळेचे स्थलांतर करताना एका बंद खोलीत पाठय़पुस्तकांचे व गणवेषाचे गठ्ठे आढळले.
सर्व शिक्षा अभियानातून १ली ते ४थीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठय़पुस्तके, तर जिल्हा परिषद सेसमधून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेष दिले जातात. अशोकनगरच्या शाळेत अभ्यासक्रमातून बाद झालेली ३२ हजार २८९ व अभ्यासक्रमात असलेली १९ हजार ४०१ पुस्तके आणि अवांतर ४ हजार ४१६ अशी एकूण ५६ हजार १०७ पुस्तके आढळली. विद्यार्थ्यांना वितरित करण्यासाठी ही पुस्तके अशोकनगरच्या केंद्र शाळेत पोहोच करण्यात आली होती. केंद्रात असलेल्या इतर शाळांना त्यांचे वाटप करायचे होते. परंतु सन २००४-०५पासून ही पुस्तके बंद खोलीत पडून राहिली. मुलांच्या गणवेषाचे शर्ट-पँटचे ४ हजार ३०८ व मुलींच्या गणवेषाचे ६ हजार ६६२ स्कर्ट ब्लाऊज वितरित न करता पडून राहिले. परिणामी लाभार्थी वंचित राहिले.
यासंदर्भात तत्कालीन शिक्षणाधिकारी महादेव गोसावी यांनी चौकशी करून अधिकारी, कर्मचारी व प्राथमिक शिक्षक अशा एकूण ११जणांना दोषी धरले. गट शिक्षणाधिकारी पावसे व कुलकर्णी यांच्याकडे प्रभारी कार्यकाळ असल्याने त्यांना दोषारोपातून वगळण्यात आले. सातजणांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव पूर्वीच पाठवण्यात आला होता. मात्र, आता अधिकारी पटारे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली.