Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मुळा धरणात आता केवळ पाऊण टीएमसी पाणीसाठा
राहुरी, २ जून/वार्ताहर

मुळा धरणात ८०० दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, आतापर्यंतच्या उन्हाळी आवर्तनात सव्वापाच टीएमसीहून अधिक पाणी दिले गेले. बारा दिवसांत सव्वा टीएमसी पाणी

 

पिकांसाठी सोडण्यात आले. धरणात सध्या ५ हजार २९६ दशलक्ष घनफूट पाणी आहे.
उजव्या कालव्यातून एक हजार क्युसेकने आवर्तन सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठा आणखी कमी होईल. मृतसाठा (डेडस्टॉक) पातळी ३ फूट बाकी आहे. एकीकडे पाण्यासाठी संघर्ष-वाद होत असताना मुळा धरणातील पिण्याचे पाणी, औद्योगिक वापर व शेती पिकासाठी देताना प्रशासन, पाटबंधारे अधिकाऱ्यांकडून पाणीवाटपाचा सुनियोजित कार्यक्रम राबविला गेला. मात्र, मे महिन्यातील उन्हाळी आवर्तनाद्वारे सव्वापाच टीएमसीहून अधिक पाणी देण्यात आले. अजूनही उजवा कालवा सुरू असून, सध्या एक हजार क्युसेकने देण्यात येणाऱ्या आवर्तनाद्वारे पाथर्डी, शेवगाव तालुक्यांतील भागात शेती पिकांसाठी पाणी दिले जात आहे. दि. १ मेपासून कालव्यांद्वारे सव्वापाच टीएमसीहून अधिक पाणी दिले गेले. धरणाचा मृतसाठा ४ हजार ५०० दशलक्ष घनफूट असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली धरणातील पाण्याच्या नियोजनाचे अधिकार आहेत. जूनच्या पहिल्या आठवडय़ात मान्सूनचा पाऊस हमखास दाखल होतो. मात्र, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मान्सूनचा पाऊस सक्रिय होण्यास दुसरा आठवडा उजाडतो.