Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सर्वाधिक भाव व पांढरा ऊस स्वीकारण्याची ‘तनपुरे’ची ग्वाही
राहुरी, २ जून/वार्ताहर

जिल्ह्य़ातील सर्वाधिक भाव देणाऱ्या सहकारी साखर कारखान्याच्या बरोबरीने उसाला भाव आणि पांढरा ऊस स्वीकारला जाईल, अशी स्पष्ट ग्वाही डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक

 

सोपानराव म्हसे यांनी दिली.
कारखान्याच्या वतीने ऊसउत्पादकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रात आयोजिलेल्या राहुरी येथील गटनिहाय बैठकीत श्री. म्हसे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी संचालक भास्करराव भुजाडी होते. अतिरिक्त व शिलकीच्या उसामुळे तत्कालीन परिस्थितीत पांढरा ऊस गाळपास घ्यायचा नाही हा निर्णय संचालक मंडळाला नाईलाजास्तव घ्यावा लागला होता. मागील सर्व हंगामांत गाळलेल्या उसास कारखान्याने ऊसउत्पादकांना चांगला भाव दिलेला आहे. याही गळीत हंगामात चांगला भाव देऊन उसाच्या वजनकाटय़ात, मापात पाप करणाऱ्या काही अपप्रवृत्तीपासून उत्पादकांनी दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. यंदाच्या गाळप हंगामात जास्तीत जास्त उसाचे गाळप करण्याचे संचालक मंडळाचे नियोजन असून, डॉ. तनपुरे कारखान्यालाच ऊस द्यावा, सभेत ऊसउत्पादकांनी भावाबद्दलच्या केलेल्या मागणीची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या पदरात योग्य माप टाकले जाईल, असे सांगून श्री. म्हसे यांनी उत्पादकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली.
भास्करराव भुजाडी म्हणाले की, कारखाना चांगला चालावा ही सर्वाचीच अपेक्षा आहे. गेल्या हंगामात कारखान्याने अपेक्षित क्षमतेने गाळप केले नाही. कारखाना बंद पडला, तर तालुक्यातील शेतकऱ्यांची परवड होईल. उपलब्ध उसाच्या आकडेवारीचा अभ्यास करून गाळपाचे नियोजन करावे, अशी सूचना त्यांनी केली. नगरसेवक विजय डौले म्हणाले की, ऊसपुरवठादारांवर सातत्याने अन्याय होतो. पांढरा ऊस न घेण्याचा निर्णय दुर्दैवी होता. सर्व संचालकांनी प्रथम कारखान्याला ऊस द्यावा, ऊसउत्पादक नेहमीच कारखाना हिताचा विचार करत आलेला आहे.
विवेक देशपांडे, श्री. लोखंडे यांनी रस्त्यांची समस्या मांडली. डॉ. धनंजय मेहेत्रे, रमेश येवले, संभाजी तनपुरे, बबन भवार यांनी चर्चेत भाग घेतला. बैठकीत ऊसउत्पादक शेतकरी, कार्यकारी संचालक बी. बी. पवार उपस्थित होते.