Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सामाजिक प्रश्नांवर एकत्र येण्याची गरज - पवार
श्रीगोंदे, २ जून/वार्ताहर

मंत्र्यांना वेळ मिळत नसल्याने सनदी अधिकारी धोरणे ठरवितात. लोकसभेच्या निवडणुकीत पाणी, वीज, पीक याच्या नियोजनाबद्दल कुठल्याही पक्षाने जाहीरनाम्यात दखल घेतली नाही. किमान

 

सामाजिक प्रश्नावर तरी राजकीय पक्षांनी एकत्रित धोरणे ठरविण्याची गरज असून, ग्रामीण व्यवस्थेवर योग्य चिंतन झाले तरच आदर्श राज्यकर्ते पुढे येतील, असे परखड मत हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्या ५७व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळा येथील श्रीछत्रपती शिवाजी महाविद्यालयात झाला. त्या वेळी पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीगोंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे होते. पवार म्हणाले की, राजकारणावर मी बोलणे उचित नाही. मात्र, निवडणुकीतील प्रचाराच्या बदलत्या प्रचारपद्धती चिंताजनक आहेत. मुबलक प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी. मात्र, चर्चा भलतीच होती. मतदारांनी मत देण्याची पद्धत बदलली. अपेक्षा ठेवून मतदान होऊ लागले. त्यामुळे राजकारण्यांनाही कामाची पद्धत बदलावी लागली. पूर्वी राज्यकर्ते पॅटर्न राबवित होते. आता मात्र सनदी अधिकारी पॅटर्न राबवितात. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील या जुन्या मंडळींनी र्सवकष विचार करून धोरणे ठरवित होते. त्यांच्या दांडग्या अभ्यासामुळे ते दूरदृष्टीचे निर्णय घेऊ शकले. आता दूरदृष्टीऐवजी ‘शॉर्ट टर्म पॉलिसी’ आल्याने फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले जातात. परिणामी शेतीविषयक समस्या अथवा योजनांची दखल घेतली जात नाही.
या वेळी सत्काराला उत्तर देताना भोस म्हणाले की, कुठलाही राजकीय वारसा नसताना सहकाऱ्यांच्या जीवावर जिल्हा परिषद अध्यक्षापर्यंत मजल मारता आली. आर्थिक सुबत्ता नसली, तरी प्रामाणिक मित्रपरिवार हीच माझी श्रीमंती आहे. कार्यकर्त्यांनी गावपातळीवर राजकारण बाजूला ठेवून काम करणे गरजेचे आहे.
राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार, कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष कुंडलिकराव जगताप, हवामानतज्ज्ञ प्रा. बी. एन. शिंदे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हेमंत ओगले, दीपक भोसले यांची भाषणे झाली. कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष केशवराव मगर, जि. प. अर्थ-बांधकाम समितीचे सभापती बाळासाहेब गिरमकर, ‘श्रीगोंदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जि. प. सदस्य अरुण होळकर, अनिल ठवाळ, अंबादास पिसाळ, प्राचार्य पोपटराव लवांडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब जंगले उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. फुलसिंग मांडे व अशोक आळेकर यांनी केले. आभार नगरसेवक समीर बोरा यांनी मानले.