Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आठ लाख टन गाळप झाल्याससर्वाधिक भाव देऊ - धुमाळ
राहुरी, २ जून/वार्ताहर

कार्यक्षेत्रातील सर्व ऊस डॉ. तनपुरे कारखान्यात गाळपास आला आणि आठ लाख टनाचे गाळप झाल्यास जिल्ह्य़ातील साखर कारखान्यांपेक्षा एक रुपया जास्त भाव देण्यास आपण बांधिल

 

आहोत, अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष रामदास धुमाळ यांनी दिली.
कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी बारागाव नांदूर येथील गट बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एकनाथ बेल्हेकर होते.
जिल्ह्य़ातील इतर कारखाने कार्यक्षेत्रातून अधिक ऊसभावाचे आमीष दाखवून पळवितात. वास्तविक एकीकडे जादा भाव दाखवून मोठय़ा प्रमाणात उसाच्या वजनात शेतकऱ्यांची लूट केली जाते, हे आता शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. तालुक्यातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्यास दिला, तर निश्चितपणे जिल्ह्य़ातील कारखान्यांपेक्षा एक रुपया जास्त भाव देऊ, पण त्यासाठी किमान आठ लाख टन उसाचे गाळप केले पाहिजे. गाळप कमी झाले तर आर्थिक तोटा आणखी वाढतो, म्हणून अधिकाधिक गाळप करण्यासाठी सामूहिक प्रयत्न व्हावेत, असे आवाहन करून गेल्या तीनही हंगामांत कारखान्याने इतर कारखान्यांच्या बरोबरीने व एसएमपी दरापेक्षा अधिक भाव देऊन ऊसउत्पादकांच्या आर्थिक हिताचे रक्षण केले. येत्या हंगामात निश्चितपणे इतरांपेक्षा जास्त भाव देऊ.
अनेक ऊसउत्पादकांनी सवलतीच्या दराने मिळणाऱ्या साखर कूपन संदर्भात केलेल्या मागणीचा संदर्भ देऊन लवकरच सर्वंकष धोरण संचालक मंडळाच्या बैठकीत घेतले जाईल, असे धुमाळ यांनी सांगितले. सर्वश्री. शिवाजी गाडे, संचालक पंढरीनाथ पवार, शिवाजी पवार, भाऊसाहेब गाडे मच्छिंद्र कोहकडे यांची भाषणे झाली. तालुक्याची कामधेनू टिकली पाहिजे, त्यासाठी सामूहिक प्रयत्न करावे , असे आवाहन केले. कार्यकारी संचालक बी. बी. पवार यांनी मागील हंगामाचा आढावा घेतला.