Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आमदारांना वेळ नाही,बैठकीअभावी संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी वंचित
जामखेड, २ जून/वार्ताहर

आमदार सदाशिव लोखंडे अध्यक्ष असलेल्या संजय गांधी निराधार योनजेची बैठक गेल्या चार महिन्यांपासून न झाल्याने १७३ लाभार्थी योजनेपासून वंचित राहिले आहेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी आमदार लोखंडे यांच्याशी तीनवेळा पत्रव्यवहार करूनही त्यांच्याकडून बैठकीसाठी

 

वेळ दिला जात नाही.
संजय गांधी निराधार योजनेच्या विविध योजनांतर्गत तालुक्यातून १७३जणांनी तहसीलदारांकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून चार महिन्यांपूर्वी अर्ज केले. या योजनेचा लाभ घेणारे बहुतांश लाभार्थी निराधार, वृद्ध, निराश्रीत, विधवा, घटस्फोटीत, तसेच अपंग आहेत. ही प्रकरणे मंजूर करण्यासाठी आमदार लोखंडे यांच्या उपस्थितीत बैठक होणे गरजेचे आहे. चार महिन्यांपूर्वीच संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व प्रकरणांची छाननी करून आमदारांशी बैठकीसाठी गेल्या चार महिन्यांत तीन वेळा पत्रव्यवहार केला. मात्र, आमदारांकडून बैठकीसाठी वेळ दिला जात नाही.
तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे ४६९, इंदिरा गांधी योजनेचे ७८, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेचे १०६३, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचे १८५० लाभार्थी आहेत. या लाभार्थीना महिन्याला प्रत्येकी ५०० रुपये दिले जातात.
दरम्यान, येत्या दोन महिन्यांत विधानसभेची आचारसंहिता लागू होणार असल्याने आमदार लोखंडे यांनी बैठकीसाठी वेळ द्यावा; अन्यथा प्रांताधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणास मंजुरी देऊन लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करावे, अशी मागणी लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे.