Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

प्राथमिक शिक्षकांचे प्रशिक्षण दोन वा तीन केंद्रांवर होणार
पारनेर, २ जून/वार्ताहर

इयत्ता पहिली ते चौथीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमासाठी आयोजित प्राथमिक शिक्षकांचे प्रशिक्षण तालुक्याच्या ठिकाणी एकाच केंद्रावर न ठेवता शिक्षकांच्या सोयीनुसार प्रत्येक तालुक्यात दोन अथवा तीन केंद्रांवर घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सदस्य रा. या.

 

औटी यांनी दिली.
राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा शाखेच्या शिष्टमंडळाने श्री. औटी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे, उपाध्यक्ष सुजित झावरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दिनकर टेमकर, उपशिक्षणाधिकारी अरुम धामणे यांच्याशी प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा केली. समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिंदे, लक्ष्मण टिमकाडे, दिनकर ठोकळे, शेषराव बडे, जयप्रकाश साठे, पंढरीनाथ व्यवहारे, ज्ञानदेव बटुळे, संजय धामणे, राजेंद्र ठाणगे आदी उपस्थित होते.
इयत्ता पहिली ते चौथीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमासाठी ४ ते १२ जूनदरम्यान प्रत्येक तालुक्यात एका केंद्रावर प्राथमिक शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिक्षण विभागाकडून आयोजन केले होते. तालुक्याचा मोठा विस्तार व शिक्षकांची मोठी संख्या यामुळे शिक्षकांसाठी तालुक्यात एकाच केंद्रावर प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणे गैरसोयीचे होते. त्यामुळे शिक्षण समितीने प्रत्येक तालुक्यात दोन अथवा तीन केंद्रांवर प्रशिक्षणाचे आयोजन करण्याची मागणी केली. ती मान्य करण्यात आली. तशा सूचना गटशिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या वेळी अकोले तालुक्यातील शिक्षकांच्या एकस्तरीय वेतनश्रेणीच्या ५ टक्के फरकाबाबत चर्चा झाली. या फरकाची रक्कम सुमारे ८४ लाख रुपये आहे. यापैकी ५० टक्के रक्कम चालू महिन्यात शिक्षकांना अदा करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आल्याचे श्री. औटी यांनी सांगितले. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पदाची नुकतीच सूत्रे हाती घेतलेल्या टेमकर यांचे समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले.