Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

रस्ते तयार करा, पुन्हा खोदा..
नगर, २ जून/प्रतिनिधी

शहरात नुकत्याच तयार करण्यात आलेल्या रस्त्यांना महापालिकेच्या बांधकाम खात्याच्या नियोजनाअभावी दृष्ट लागली आहे. डांबरीकरण करायचे मग ते खोदायचे असा ‘उद्योग’ सुरू असल्यामुळे सर्वसामान्य नगरकरांच्या चांगल्या रस्त्यांच्या स्वप्नावर पाणी पडत आहे.

 

विवेकानंद चौकातील श्रीस्वामी समर्थ मठाजवळील रस्ता मनपाच्या बांधकाम विभागाने आज खोदला. या रस्त्याच्या मध्यभागातून गेलेली गटार तुंबल्यामुळे परिसरातील काही घरांना दुषित पाणीपुरवठा होत असल्याने दुरुस्तीसाठी हा रस्ता खोदण्यात आल्याचे विभागातर्फे सांगण्यात आले. काही आठवडय़ांपूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. खोदाईमुळे हा खर्च पाण्यात (की गटारात) गेला.
खरे तर नवीन रस्ते तयार करतानाच नियोजन केले जायला हवे. पिण्याच्या पाण्याचे नळ व गटार रस्त्याच्या कडेने घेतले जावेत. तसे केल्यास अख्खा रस्ता खोदावा लागणार नाही. जेणेकरून पैशांचा अपव्यय व नागरिकांचा त्रास टाळता आला असता.
हा प्रकार नवा नाही. २-३ दिवसांपूर्वीच सक्कर बिस्किट कारखान्यासमोर, तर काही आठवडय़ांपूर्वी भोसले आखाडय़ातही रस्त्याची अशीच खोदाई करण्यात आली. गटार किंवा पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी मोठय़ा प्रमाणावर नवीन रस्ते खोदले गेले. यात पैशांचा अपव्यय होऊन चांगले रस्ते खराब झाले. महापालिकेची दुखरी नस झालेला आनंदऋषी रुग्णालय ते कोठी चौक या रस्त्यावरही डागडुजीचा फार्स सुरूच आहे.
खड्डेमय झालेले नगर शहरातील रस्ते माजी महापौर संदीप कोतकर यांच्या कारकिर्दीत बऱ्यापैकी नूतन करण्यात आले. मात्र, काही महिनेसुद्धा हे रस्ते चांगले राहिले नाहीत. लवकरच पावसाळा सुरू होत असल्यामुळे नागरिकांच्या त्रासात भर पडणार आहे.