Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

गटारासाठी ‘रास्ता रोको’; आत्मदहनाचा प्रयत्न
नगर, २ जून/प्रतिनिधी

नगर-कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर, भावनाऋषी कॉलनी परिसरात रखडलेल्या गटाराच्या कामाच्या निषेधार्थ, तसेच पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी परिसरातील नागरिकांनी आज ‘रास्ता रोको’ केला. या वेळी एका तरुणाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. किरकोळ दगडफेकही झाली. जमावबंदी आदेशाचा भंग केल्याबद्दल तोफखाना पोलिसांनी आंदोलकांविरुद्ध

 

गुन्हा दाखल केला.
आमदार अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक गणेश कवडे, दिलीप सातपुते, दिगंबर ढवण, दत्ता मुदगल, सचिन शिंदे आदी सहभागी झाले होते. महापालिका आयुक्त कल्याण केळकर यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन गटाराचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सकाळी दहाच्या सुमारास आंदोलन सुरू झाले. मनपाचे अधिकारी न आल्याने आंदोलक चिडले. त्यांनी नेप्ती चौकात आंदोलन सुरू केले. संतप्त झालेल्या गोटू हारवाले या तरुणाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला. चिडलेल्या आंदोलकांनी अमरधाम परिसरातील दुकानांवर दगडफेक केली. दुकानदारांनी घाबरून दुकाने बंद केली.
आंदोलकांचा लोंढा नंतर माळीवाडा बसस्थानकाकडे आला. आयुक्त केळकर, उपायुक्त डॉ. पंकज जावळे तेथे आले. त्यांनी गटाराचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ‘रास्ता रोको’मुळे ठिकठिकाणी रहदारी विस्कळीत झाली होती.
शिवाजीनगर परिसरात गेल्या १४ महिन्यांपासून गटाराचे काम चालू आहे. काही काम झाले आहे. मात्र, सप्तमी हॉटेल ते सीना नदीपर्यंतचे काम रखडले आहे. गटारे नसल्याने पावसाळ्यात या भागातील अनेक घरात गेल्या वर्षी पाणी घुसले होते. मात्र, नंतर मनपाने
त्याकडे दुर्लक्ष केले, असे नागरिकांचे म्हणणे आहे.