Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

मुकुल वासनिकांची साई मंदिरास भेट
नागपूर, २ जून/प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांनी मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथम साई मंदिरास भेट देऊन साईबाबाचा आशीर्वाद घेतला. मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब उत्तरवार यांनी मुकुल वासनिक यांचे स्वागत केले. मंडळाचे सचिव विजय तालेवार यांनी मुकुल वासनिक यांना बाबांची शाल व श्रीफळ दिले. कोषाध्यक्ष संजय शिंदे व विश्वस्त राजीव जयस्वाल, केशव ठाकरे यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी मुकुल वासनिकांनी मंडळाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी दीपक काटोले, अॅड. अनिल वडपल्लीवार, अजय हिवरकर, राजू ढोबळे, रमेश गिरडे, व्यवस्थापक दीपक बोरगावकर उपस्थित होते.

मान्सून वेळेतच?
नागपूर, २ जून/ प्रतिनिधी

पश्चिम बंगालमध्ये आलेल्या वादळामुळे मान्सूनच्या वेळापत्रकात थोडा बदल झाला असला तरी महाराष्ट्रात मात्र तो जूनच्या पहिल्या आठवडय़ात म्हणजे वेळेतच येण्याची शक्यता असल्याने शेतकरी सुखावला आहे. दोन दिवसांपासून पूर्व विदर्भातील काही जिल्ह्य़ांसह पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्हयात पावसाने लावलेली हजेरी मान्सून लांबणार या शंकेने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरली आहे. मान्सून या वर्षी त्याच्या नियोजित वेळेपेक्षा आठवडाभर आधीच, २३ मे रोजी केरळात दाखल झाल्याने तो यंदा वेळेपूर्वीच येईल, असा हवामान खात्याचा अंदाज होता.

मंदीतही नोकरीच्या संधींचा सुकाळ
पीयूष पाटील, नागपूर, २ जून

एकीकडे जागतिक मंदीमुळे जगभरातील लाखो लोकांना रोजगार गमवावा लागत असतानाच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागात अनेक पदे रिक्त झाली असल्याने मंदीच्या या काळात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. विविध महत्त्वाच्या खात्यांमध्ये अनेक जागा रिक्त असल्याने मोठय़ा प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून सर्वच क्षेत्रावर जागतिक मंदीचा विपरीत परिणाम झाला आहे. या मंदीमुळे एकीकडे उद्योगधंद्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.

तपासाचा अहवाल दाखल करण्यासाठी १० जूनपर्यंत मुदत
योगिता ठाकरे मृत्यूप्रकरण

नागपूर, २ जून/ प्रतिनिधी

महालातील गडकरी वाडय़ातील कारमध्ये योगिता ठाकरे ही मुलगी संशयास्पदरीत्या मृतावस्थेत आढळल्याच्या घटनेची सी.बी.आय. मार्फत चौकशी करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेत तपासाचा अहवाल दाखल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारला येत्या १० तारखेपर्यंत मुदत दिली आहे. मरण पावलेल्या मुलीच्या वडिलांनी केलेली ही याचिका यापूर्वी दोन वेळा सुनावणीला आली असता सरकार पक्षाने उत्तर सादर करण्यासाठी वेळ मागून घेतला होता. आज सुटीकालीन न्यायाधीश न्या. सी.एल. पांगारकर यांच्यासमोर याचिका सुनावणीला आली.

सवलतींचा वर्षांव करूनही महापालिकेच्या शाळेकडे विद्यार्थ्यांची पाठ
नागपूर, २ मे / प्रतिनिधी

सवलतींचा विशेष परिणाम नाही
तुकडय़ा बंद होण्याचा धोका
एक दोन नव्हे तर चक्क तेवीस सलवती देऊनही महापालिकेच्या शाळांना विद्यार्थी मिळत नसल्याने काही तुकडय़ा बंद करण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला असल्याचे विस्वसनीय सूत्रांकडून कळले आहे. महापालिकेच्या शहरात एकूण २१३ शाळा आहेत. त्यात २२ माध्यमिक व १९१ या प्राथमिक शाळांचा समावेश आहे. शाळेत विद्यार्थी मिळावे यासाठी महापालिकेने मागील वर्षांपासून शाळा सुधार प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार, दप्तरमुक्त शाळा, मुलांना पुस्तके, गणवेश, बुट, टाय मोफत देण्यात येत आहे.

मतदार नोंदणी, ओळखपत्रासाठी विशेष मोहीम सुरू
नागपूर, २ जून/ प्रतिनिधी

नवीन मतदार आणि ओळखपत्र तयार करण्यासाठी १ जूनपासून विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. २२ जुलैपर्यंत ती चालणार असून या काळात ज्यांनी ओळखपत्र तयार केले नसतील त्यांनी ती तयार करून घ्यावीत व ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांनी त्यांची नावे नव्याने नोंदवून घ्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना सहाचा अर्ज मतदारांना भरून द्यायचा असून त्यासोबतच रंगीत छायाचित्र जोडावे लागणार आहे. तसेच मतदार यादीत नाव असलेल्या पण त्यात छायाचित्र किंवा ओळखपत्र नसलेल्या मतदारांना नमुना आठ हा अर्ज भरून द्यावा लागणार आहे व त्यासोबतच छायाचित्रही जोडायचे आहे. तालुक्याच्या ठिकाणी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात तर नागपूर शहरात तहसील कार्यालयातील मतदारसंघ निहाय तयार करण्यात आलेल्या कार्यालयात हे अर्ज २२ जुलैपर्यंत भरून द्यायचे आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

मिहान प्रकल्पग्रस्त भागातील युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण
नागपूर, २ जून/ प्रतिनिधी

एमएडीसीच्या पुनर्वसन धोरणांतर्गत दिल्या जाणाऱ्या रोजगाराभिमुख प्रशिक्षणाचा आतापर्यंत ६०३ युवकांनी लाभ घेतला असून यानंतरच्या प्रशिक्षणाचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठीचे सर्वेक्षण सध्या सुरू होत आहे. मिहानग्रस्तांना प्रशिक्षण देण्यासाठी एमएडीसीचे मुख्य अभियंता एस.व्ही. चहांदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. मा. फोई या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे मिहानमधील गावांचे संर्वेक्षण करून त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यासाठी मिहानमधील सुमारे ११ गावातील १ हजार ६७२ घराचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. प्रत्येक घरातून एकाची प्रशिक्षणासाठी निवड केली जाईल. ८० टक्के हजेरी लावणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा २ हजार रुपये विद्यावेतनही दिले जाणार आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात १५० युवकांनी दीक्षाभूमीजवळील तसेच सीताबर्डी येथील आयआयटीमध्ये प्रशिक्षण घेतले. जानेवारी अखेरीस त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या योजनेस चांगला प्रतिसाद मिळाला. एप्रिल महिन्यांचा सुरुवातीस तब्बल ६०३ मिहानग्रस्तांची प्रशिक्षणासाठी निवड झाली. ते प्रशिक्षण आता संपत आले. असून तिसऱ्या टप्प्याच्या प्रशिक्षणासाठी सध्या सर्वेक्षण सुरू आहे, असे एमएडीसीच्या सूत्रांनी सांगितले.

प्रल्हाद सिडाम ‘अनिवा साथी’ व ‘शतकवीर’ पुरस्काराने सन्मानित
नागपूर, २ जून/ प्रतिनिधी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विदर्भातील सक्रिय कार्यकर्ते प्रल्हाद सिडाम यांना ‘अनिवा साथी’ व ‘शतकवीर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्यातील एका विशेष समारंभात पुणे विद्यापीठाचे कुलगुरू व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव व ज्येष्ठ चित्रपट अभिनेते श्रीराम लागू यांच्या प्रमुख उपस्थितीत अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी सन्मानचिन्ह देऊन सिडाम यांचा सन्मान केला. ‘अनिवा’चे संपादक प्रा. प.रा. आरडे हेही यावेळी उपस्थित होते. अंनिसचे मुखपत्र असलेल्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ या मासिकाच्या प्रचार आणि प्रसारासाठी हा पुरस्कार दिला जातो. प्रल्हाद सिडाम हे अंनिसचे क्रियाशिल कार्यकर्ते असून विविध वृत्तपत्रातून व मासिकातून शैक्षणिक आणि अंधश्रद्धेच्या विरोधात ते निरंतर लेखन करत आले आहेत. गेल्या वर्षी त्यांनी सहकुटुंब मरणोत्तर देहदान आणि नेत्रदानाचा संकल्प सोडला. अनेक विवेकवादी आणि विज्ञानवादी सामाजिक संघटनांशी ते जुळलेले आहेत. महाराष्ट्रातून एकमेव आदिवासी कार्यकर्त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. प्रल्हाद सिडाम यांना ‘शतकवीर’ पुरस्कार आणि ‘अनिवा साथी’ पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल विजय धाडसे, प्रकाश डब्बावार, प्रकाश आंबीलकर, प्रा. सुरेश वरभे, किशोर पारटकर, विजय क्षीरसागर आणि विजय गाडगे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

चाफले ले-आऊटमधील विकास कामाचे उद्घाटन
नागपूर, २ जून / प्रतिनिधी

मागास वस्त्यांचा विकास करणे हे माझे कर्तव्य आहे. विकासकामांसोबत सांस्कृतिक विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असा विश्वास आमदार दीनानाथ पडोळे यांनी व्यक्त केला.
चाफले ले-आऊटमधील रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. परिसरातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी वाचनालये, वाचन स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धाही आयोजित करण्यात यावे, असे सांगून ते म्हणाले माझ्या आमदार फंडातील जास्तीत जास्त निधी रिंगरोडच्या पलीकडच्या भागातच खर्च होत आहे. कारण हा भाग संपूर्णपणे अविकसित आहे. तसेच बराचसा भाग आरक्षित असल्याने या भागाच्या विकासकामाला अडचणी येत आहे. परंतु आता सर्व अडचणीतून मार्ग काढून या भागाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची कबुली पडोळे यांनी दिली. नागपूर शहराच्या विकासासाठी जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेतून खासदार विलास मुत्तेमवार यांच्या प्रयत्नाने एक हजार कोटी रुपये मिळणार असल्याची माहितीही पडोळे यांनी याप्रसंगी दिली. याप्रसंगी संजय चव्हाण, दिनेश तराळे, महेंद्र वासनिक, दिनेश वाघमारे, मनोहर दिवटेलवार, नरेश शरणागत, अविनाश ढाबरे, विनोद वाघमारे आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते. गणेश लोणारे यांनी संचालन केले. सुनील कांबळे यांनी आभार मानले.

महिला व विद्यार्थ्यांसाठी १६ जूनला घरगुती नर्सरी विकास प्रशिक्षण
नागपूर, २ जून/प्रतिनिधी

मॅग्नम फाउंडेशनच्या वतीने महिला व विद्यार्थ्यांसाठी घरगुती नर्सरी विकास प्रशिक्षण कार्यक्रम १६ जूनला सकाळी १० ते ५ या कालावधित आयोजित करण्यात आला आहे. घरगुती नर्सरी कशी उभारावी, घरगुती नर्सरीमध्ये कोणती झाडे लावावी व त्यांचा विकास कसा करावा, नर्सरीसाठी खत कसे तयार करावे व त्याचा वापर केव्हा व कसा करावा, घरगुती नर्सरीसाठी पाण्याचे नियोजन, कुंडय़ांची सजावट कशी करावी, कुंडय़ासहित किंवा प्लॅस्टिकमध्ये झाडे, रोपांचे विक्री तंत्र, कार्यक्रमासाठी झाडाच्या सजावटीचे व्यापारी तत्वावर करार, नर्सरीद्वारे लहान मुलांवर संस्कार करण्याचे तंत्र, कौटुंबिक सलोख्यासाठी नर्सरीचा उपयोग आदी विषयावर या प्रशिक्षण कार्यक्रमात भर दिला जाणार आहे. प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी प्रभा शिर्के, समन्वयक मॅग्नम फाउंडेशन, ९०९-अ, ९ वा माळा, अ-विंग, लोकमत भवन, वर्धा रोड, नागपूर, दूरध्वानी २४४२५८६ यांच्याशी ११ ते २ वाजेपर्यंत संपर्क साधावा. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे.

मॉयलच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा सत्कार
नागपूर, २ जून/प्रतिनिधी

मॅगनिज ओर लिमिटेड कंपनीतून सेवानिवृत्त झालेल्या वित्त-आंतरिक लेखा परीक्षा प्रमुख एजाज अहमद, वरिष्ठ व्यवस्थापक सी.ओ. सोमलवार, कार्यकारी खासगी सचिव के. वर्गीस या तीन अधिकाऱ्यांना निरोप देण्यात आला. निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी सहव्यवस्थापकीय संचालक के.जे. सिंह होते. प्रमुख पाहुणे म्हणून अर्थ विभागाचे संचालक एम.ए.व्ही. गौतम, वाणिज्य संचालक ए.के. मेहरा, महाव्यवस्थापक व्ही.आर. सेनगुप्ता, महाव्यवस्थापक एम.डी. सोरठिया, महाव्यवस्थापक डी. सोम, महामंत्री रामअवतार देवांगन उपस्थित होते. याप्रसंगी सेवानिवृत्ती अधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, एसएसपीएफचा धनादेश व क्रेडीट सोसायटीचा धनादेशसुद्धा देण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन उपमहाव्यवस्थापक एल.एम. तेलंग यांनी केले. वरिष्ठ व्यवस्थापक नितीन पागनीस यांनी आभार मानले.

योजना सभासदांपर्यंत पोहोचवा -रमेश बंग
नागपूर, २ जून/प्रतिनिधी

सभासद नोंदवून पक्षाची ताकद वाढवत असताना सदस्य हा पक्षवाढीचा महत्त्वाचा दुवा आहे हेही लक्षात ठेवावे. शासकीय योजना सभासदांपर्यंत पोहोचल्यास, त्यांच्या अडचणी दूर झाल्यास पक्षाबद्दल आपुलकीची भावना त्यांच्या मनात निर्माण होते. त्यामुळे योजना सभासदापर्यंत पोहचविण्याचेही कार्य करावे, असे संपर्क मंत्री रमेश बंग म्हणाले. मध्य नागपूरतर्फे सभासद नोंदणी मोहिमेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. सदस्य बनवून त्यांच्या अडीअडचणी सोडवून परिवारातील सदस्य बनवायचे असाच आमचा उद्देश असून ५० हजार सदस्य बनविण्याचा निर्धार अनील अहीरकर यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासचिव अशरफ खान यांनी केले. रवी घाडगे पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला माजी शहर अध्यक्ष दिलीप पनकुले, प्रदेश संघटन सचिव प्रवीण कुंटे, रमेश फुले, रवींद्र इटकेलवार, संजय शेवाळे, महिला अध्यक्ष शैल जेमिनी कडू, शारदा हाडगे आदी उपस्थित होते.

प्रा. राम शेवाळकरांच्या जीवनावर आधारित झेपतर्फे आज ‘अभिवादन..शेवाळकर’
नागपूर, २ जून / प्रतिनिधी

प्रा. राम शेवाळकर यांच्या मासिक श्राद्ध दिनानिमित्त ‘झेप’ या संस्थेतर्फे उद्या, बुधवारी सायंटिफिक सभागृहात सायंकाळी ७ वाजता ‘अभिवादन.. शेवाळकर’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रा. शेवाळकर यांच्या जीवनाचे काही पैलू उलगडण्यात येणार असल्याची माहिती झेपचे कार्याध्यक्ष संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार व ज्ञानसाधू वासुदेवराव चोरघडे त्यांच्या व्याख्यानातून प्रा. शेवाळकर यांच्या पूर्वार्धातील अनेक विशेष बाबी स्पष्ट करणार आहेत. याच कार्यक्रमात प्रा. शेवाळकरांनी रचलेल्या व आनंद मास्टे यांनी संगीत दिलेल्या दोन कवितांचे सादरीकरण अमर कुळकर्णी करणार आहे. याप्रसंगी दृकश्राव्य माध्यमाचा वापर करण्यात येणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर करणार आहेत. या कार्यक्रमास शेवाळकर प्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जोशी यांनी याप्रसंगी केले. पत्रकार परिषदेला प्रफुल्ल माटेगावकर, दीपक गाडे, नगरसेविका सुमित्रा लुले, प्रज्ञा बनसोड, चंचल भिडे उपस्थित होते.

तंबाखूविरोधी दिनी गुटखा व सिगारेट पाकिटांची होळी
नागपूर, २ जून/ प्रतिनिधी

प्रतापनगर चौकात तंबाखूविरोधी दिनाला गुटखा व सिगारेटच्या पाकिटांची होळी करण्यात आली. तंबाखूमुळे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक हानी होते, असे विचार मनोहर ताम्हणकर यांनी यावेळी सांगितले. उपस्थितांनी तंबाखू सोडून दीर्घायुषी व्हावे, असा त्यांनी सल्ला दिला. विशेष पाहुणे श्यामराव राऊत यांनी तंबाखूमुळे कर्करोग व पक्षघात आदी आजार होतात, अशी विस्तृत माहिती दिली. याप्रसंगी मानवी शृंखला तयार करण्यात आली. उपस्थितांनी तंबाखू सोडण्याची प्रतिज्ञा केली. कृ. द. दाभोळकर यांनी आभार मानले. अण्णासाहेब प्रभुणे आणि अॅड. दिलीप सांबरे उपस्थित होते.

मनोरमा कांबळे प्रकरणी पोलिसांचे जबलपूर उच्च न्यायालयात अपील
नागपूर, २ जून/ प्रतिनिधी

जरीपटका येथील मनोरमा कांबळे बलात्कार व खूनप्रकरणी छिंदवाडय़ाच्या सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध राज्य सरकारच्या वतीने जरीपटका पोलिसांनी जबलपूर उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. छिंदवाडय़ाच्या सत्र न्यायालयाने गेल्या १३ फेब्रुवारीला या प्रकरणात आरोपी असलेल्या देवानी कुटुंबातील आठजणांची निर्दोष सुटका केली होती. या निकालाविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करून विविध दलित संघटनांनी राज्य सरकारने या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान द्यावे, अशी मागणी केली होती. त्यावर विचार करून, अपिलाची मुदत संपता आली असताना सरकारने त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला. सत्र न्यायालयाने निकाल देताना बचाव पक्षाचेच म्हणणे प्रामुख्याने लक्षात घेतले, त्या मानाने अभियोजन पक्षाच्या युक्तिवादाचा विचार करण्यात आला नाही. शिवाय निकालपत्राच्या पहिल्या व शेवटच्या पानावर वेगवेगळ्या तारखा आहेत, असे सरकारने अपील करताना म्हटले आहे. जबलपूर उच्च न्यायालयात सरकारची बाजू मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील अतिरिक्त सरकारी वकील भारती डांगरे या मांडणार आहेत. याशिवाय विशेष सरकारी वकील म्हणून शासनाने अॅड. योगेश मंडपे यांचीही नेमणूक केली आहे.