Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

नवनीत

जी व न द र्श न
आदिमानव

अगदी पहिल्यांदा पुरुषाकार आत्मा एकटा होता. त्याने एकदा सहज आसपास पाहिले. त्याला त्याच्या व्यतिरिक्त कोणीही दिसले नाही. तेव्हा त्याच्या तोंडून उद्गार निघाला, ‘मी’. हे त्याचे नाव झाले. म्हणून दारावर टकटक केली वा दारावरली बेल वाजविली तर किती पटकन आपण म्हणतो ‘कोण आहे?’ नि त्याला तितक्याच वेगाने आपण उत्तरतो; ‘मी. मी आहे’. पूर्वीच्या स्त्रिया यावरून आपले यजमान आल्याचे ओळखत. हा बृहदारण्यक उपनिषदातील ‘मी’ हा सर्वापूर्वी त्याने सर्व पापांचे दहन केले म्हणून तो पुरुष झाला. त्याने बघितले. आपल्या जवळ कुणीही नाही. या कल्पनेने तो भयभीत झाला. त्याच्या मनात विचार आला. जर माझ्याहून दुसरे कुणीही इथे नाही. मग मला भीती का वाटते? हा विचार त्याच्या मनात आला. त्याचे भय संपले. व्दैत आले की भीती आलीच. सख्ख्यांचीच जास्त भीती. ते काय करतील याचा नेम नाही- तरीही त्याला कालांतराने त्याच्या एकाकीपणाचा कंटाळा आला. त्याला करमेनासे झाले. म्हणून त्याने दुसऱ्याची इच्छा केली. ज्याप्रमाणे परस्परांना आलिंगन दिलेले स्त्री आणि पुरुष मोठे होतात. तेवढय़ा आकाराचा तो झाला. त्याने आपल्या देहाचे दोन भाग केले. त्यातून पती-पत्नी असे मेहुण आले. म्हणून हे शरीर अर्धबृशल (म्हणजे द्विदल धान्याचे एक दल) आहे असे महर्षी याज्ञवल्क्य म्हणतात. हे आकाश स्त्रीत्वाने पूर्ण आहे. तो तिच्याशी संयुक्त झाला आणि त्यामुळे माणसे निर्माण झाली. त्याला मनु आणि शतरुपा अशी नावे मिळाली. शतरुपाला वाटले; आपल्यापासूनच मला उत्पन्न करून हा माझ्याशी समागम करीत आहे. म्हणून मी आता गुप्त व्हावे. त्याप्रमाणे ती गुप्त होऊन गाय झाली. तेव्हा मनु वृषभ झाला. नंतर ती घोडी झाली. तो अश्व झाला. अशी सृष्टीतील नानाविध रुपे झाली. तो सृष्टी बनला. हे जो जाणतो तो स्त्रष्टा बनला. आदिम मानवाच्या शोधाचे गूढ मूळ या भव्य रुपकात आहे.
यशवंत पाठक

कु तू ह ल
कृष्णविवर- २
कृष्णविवर म्हणजे काय?
माणसांप्रमाणेच ताऱ्यांचेही जीवनचक्र असते आणि ताऱ्यांनाही मृत्यू असतो. ताऱ्यांचे बाहेरचे भाग ताऱ्याच्या स्वत:च्याच गुरुत्वाकर्षणामुळे सतत आत ओढले जात असतात. मात्र, ताऱ्यांच्या अंतर्भागातील केंद्रकीय क्रियांतून निर्माण होणारी ऊर्जा आपल्या बलाद्वारे गुरुत्वाकर्षणामुळे होणाऱ्या या आकुंचनाला थोपवून धरते. या दोन बलांच्या एकत्रित परिणामामुळे ताऱ्याचा आकार कायम राखला जातो. ताऱ्यांमधील आण्विक इंधन संपुष्टात आल्यावर ही ऊर्जानिर्मिती थांबते आणि गुरुत्वाकर्षणाला होणारा विरोधही संपुष्टात येतो. त्यामुळे तारा आंकुचन पावू लागतो. जसा जसा ताऱ्याचा आकार कमी होऊ लागतो, तशी ताऱ्यांतील अणुंना जागा कमी पडू लागते आणि अणुंच्या आतील विविध बले या गुरुत्वाकर्षणाला विरोध करू पाहतात. अतिजड ताऱ्यांच्या बाबतीत ही अणुंच्या आतील बलेही हे आकुंचन रोखण्यास अपुरी पडतात आणि ताऱ्याचे संपूर्ण वस्तुमान एका बिंदुवत जागेत एकवटते.
आता आपल्या सूर्याहूनही कैकपटीने मोठा असलेला एखादा तारा जर एका बिंदूत एकटवला. तर त्याची घनता किती प्रचंड होईल! असा बिंदुवत तारा जवळपासच्या इतर वस्तूंवर आपलं प्रचंड गुरुत्वाकर्षण लादतो. प्रकाश किरणांवरदेखील या ताऱ्याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होतो. अशा ताऱ्यापासून कोणताही प्रकाशकिरण बाहेर पडू शकत नाही आणि या ताऱ्यावर पडणारे प्रकाश किरण परावर्तितही होऊ शकत नाहीत. त्यामुळे असा तारा दिसूही शकत नाही. अशा ताऱ्यावर पडणारी कोणतीही वस्तू या ताऱ्याचाच भाग बनून जाते व ती परत बाहेर येऊ शकत नाही. म्हणूनच अशा ताऱ्यांना कृष्णविवर असे म्हणतात. कृष्णविवरांची संकल्पना लाप्लास या फ्रेंच शास्त्रज्ञाने अठराव्या शतकात प्रथम मांडली. मात्र, या संकल्पनेला मिळालेली ‘कृष्णविवर’ ही संज्ञा जॉन आर्चिबाल्ड व्हीलर या अमेरिकन शास्त्रज्ञाने सुमारे ५० वर्षांपूर्वी प्रचलित केली.
अनिकेत सुळे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
तिआनमेन चौकातील रक्तपात
चीनच्या प्रगतीच्या आड सर्वसामान्य लोकांची होणारी गळचेपी कम्युनिस्टांच्या पोलादी पडद्याआडून जगाला कधीच दिसली नाही. विशेषत: बुद्धिवंतांची तर तेथे कदरच केली जात नव्हती. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी याच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. १९७६ व १९८७ च्या सुमारास कम्युनिस्टांच्या दडपशाहीच्या विरोधात चीनमध्ये आंदोलने झाली. त्याचा उद्रेक झाला ३ जून १९८९ या दिवशी. या काळात डेंगच्या आर्थिक धोरणामुळे चीनमध्ये मंदीची लाट आली. यात शेतकरी आणि कामगार होरपळले गेले. अनेकांनी आत्महत्या केल्या. लष्करात कमी वेतनामुळे असंतोष माजला होता. बुद्धिजीवी वर्ग तर पहिल्यापासून असंतुष्ट होता. त्यातच कम्युनिस्ट नेते तर कमालीचे भ्रष्ट झाले होते. याचे पडसाद ३ जूनला रात्री ११.३५ वा. उमटले. चीनमध्ये लष्करी अंमल जारी केला होता. आंदोलनाचे नेतृत्व अध्यापकांना शिकविणाऱ्या ‘बुअर केवसी’ यांच्याकडे होते. हजारोंच्या संख्येने राजधानी पेकिंग येथे विद्यार्थी जमले होते. पण डेंग यांनी आंदोलकांचे कोणतेही म्हणणे न ऐकता लष्करास गोळीबाराचा हुकूम दिला आणि.. आणि ३ जून १९८९ ला रात्री चारी बाजूंनी गोळीबार सुरू झाला. कहर म्हणजे चक्क रणगाडे विद्यार्थ्यांच्या अंगावरून घालण्यात आले. शेकडो चेंगरले होते. हजारो गोळीबारात ठार झाले. विद्यार्थी नेता ‘बुअर केवसी’ याला फरफटत नेले आणि कैदेत टाकले. रात्री ११.३५ ला सुरू झालेले हे भीषण हत्याकांड ४ जून उजाडला तरी चालू होते. ५००० च्या वर लोक ठार झाले. साऱ्या जगाने या घटनेचा निषेध केला. पण सरकारने मात्र या हत्याकांडामुळे देश वाचला, असे जाहीर केले. हा रक्तपात काळाच्या ओघात गडप झाला.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
मैदान जिंकले
रेणुच्या तिसऱ्या मजल्यावरच्या फ्लॅटमधून इमारतीमागचे खेळाचे मैदान दिसत होते. मैदानाच्या सभोवताली हिरवीगार झाडे होती. मुले दंगा करत होती खेळत होती. आनंद करत होती. केवढे सुंदर मैदान या इमारतींच्या जंगलात टिकून आहे गं! त्यामुळे सगळ्या परिसराला निसर्गसुंदर मोकळेपणा मिळाला आहे’’ मी कौतुकाने म्हणाले, ‘‘अगं तुला या मैदानाची कथा सांगते. मोठी मजेशीर आहे’’ रेणू हसत म्हणाली. ‘‘हे मैदान एका बिल्डरने विकत घेतले होते. पाटी उभारली गेली ही जागा नियोजित इमारतीची आहे..वगैरे.तीन-चार कॉलनीतली पोरं फारच दु:खी झाली. जवळजवळ पंधरा-वीस इमारतींमधली मुले इथे रोज खेळायला यायची. वडिलधारी मंडळी सकाळी आणि संध्याकाळी फिरायला यायची. मैदानावरून वाहणारी मोकळी हवा कॉलनीतल्या रहिवाशांना थंडावा द्यायची. मैदानाची जमीन विकली गेली म्हटल्यावर सगळे हादरले. फिरायला येणाऱ्यांनी एकत्र येऊन सरकारकडे विनंतीअर्ज केले. कुणी वर्तमानपत्रात या विषयी लिहिले. कुणी काही कुणी काही प्रयत्न करत होते पण काहीच परिणाम झाला नाही. सगळी मुले एकत्र आली. त्यांनी मोर्चा काढायचे ठरवले. पोलीस चौकीला पूर्वकल्पना दिली.
‘‘झाडे वाचवा पर्यावरण वाचवा आम्हाला वाचवा।
आमचे मैदान, सगळ्यांचे मैदान वाचवा वाचवा।’’
छोटय़ा छोटय़ा मुलांच्या रांगा शिस्तीने घोषणा देत शासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे निघाल्या होत्या. रस्त्यावरून जाणारे कुतूहलाने थांबून फलक वाचत होते. घोषणा ऐकत होते. काहीजण मोर्चाच्या बाजूनी मुलांना पाठिंबा देण्यासाठी चालू लागले. वाटेत भेटणारी मुलेही मोच्र्यात सहभागी होत होती. हळूहळू मोर्चातली संख्या खूप वाढली. चांगली कामे ही जगन्नाथाच्या रथासारखी, देवाच्या पालखीसारखी असतात. त्याला आपोआप हजारो जणांचे हात लागतात. मुलांचा तो अभूतपूर्व मोर्चा शासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये पोहोचला. मुलांच्या शिष्टमंडळाने आपले निवेदन सादर केले. त्यावर सगळ्या मुलांनी सह्य़ा केल्या होत्या. मुलांच्या एकजुटीला, प्रयत्नांना आणि जिद्दीला यश मिळाले. मैदान पुन्हा मुलांच्या गलक्याने गजबजले, खेळण्याने दणाणले. वडिलधाऱ्या मंडळींच्या फिरायला येणाऱ्या गटांनी आणि त्यांच्या गप्पांनी प्रसन्न झाले. लहान मुलेही जगात बदल घडवू शकतात. त्यांच्याजवळ जीवनाकडे पाहण्याचा एक ताजा, स्वच्छ, नितळ दृष्टिकोन असतो. एखादी गोष्ट होऊ शकणार नाही असा नकारात्मक विचार त्यांच्या मनात नसतो. अनुभवातून येणारी आणि इच्छा उदासीनता त्यांच्या वृत्तीत नसते. नव्या गोष्टी करून पाहण्याचा उत्साह त्यांच्यात असतो. नव्या कल्पना असतात. स्वत:ची मते असतात. आजचा संकल्प: भोवतालच्या परिस्थितीत बदल घडविण्याचे सामथ्र्य माझ्यात आहे आणि मी तसा प्रयत्न करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com