Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

अतिक्रमण घोटाळ्यातील सूत्रधाराचा शोध घ्या
शिवसेनेचे मागणी उपोषण

नवी मुंबई प्रतिनिधी : नवी मुंबई महापालिकेत झालेल्या अतिक्रमण घोटाळ्यातील बोलविता धनी कोण, असा प्रश्न करीत या भ्रष्टाचारातील खऱ्या सूत्रधारास बेडय़ा ठोका, अशी मागणी करीत आज नवी मुंबई शिवसेनेने महापालिका मुख्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या घोटाळ्यातील कंत्राटदार एच.बी.भिसे याच्यावर यापूर्वीच सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे असले तरी महापालिकेतील कनिष्ठ लिपिक राजेश पाटील आणि भिसे हे दोघे या प्रकरणातील छोटे मासे असून, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ऐरोलीतील एक ज्येष्ठ नगरसेवक या घोटाळ्याच्या केंद्रस्थानी आहे, असा आरोप शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी यावेळी केला.

पाम बीचवर आता बेस्टची सफारी
नवी मुंबई, (प्रतिनिधी) :
नवी मुंबईचा क्वीन्स नेकलेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाम बीच मार्गाशी एवढे दिवस फटकून वागणारी बेस्टची बस आता मार्गावरून दररोज ५० हून अधिक फेऱ्या मारणार आहे. खारघरमधील जल-वायुविहापर्यंत बससेवा सुरू करून बेस्टने सिडकोच्या या ड्रीम सीटीत चंचुप्रवेश करून २४ तासांचा कालावधी उलटत नाही तोच वडाळ्यापासून थेट सी-वूडपर्यंत ५०२ क्रमांकाची नवी सेवा सुरू करून बेस्टने नेरुळ पश्चिमेकडील रहिवाशांनाही दिलासा दिला आहे. विशेष म्हणजे, पाम बीच मार्गास लागूनच उभ्या राहिलेल्या वसाहतींमधून हजारोंच्या संख्येने राहावयास आलेल्या कुटुंबाना या सेवेमुळे मुंबईकडे जाण्यासाठी आता घराजवळूनच बस पकडता येणार आहे.

..तर वंदे मातरम् राष्ट्रगीत झाले असते!
पनवेल/प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते तर ‘जन-गण-मन’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ हे आपले राष्ट्रगीत झाले असते आणि त्यांनी सर्व धर्मीयांकडून ते वदवून घेतले असते, असे मत दुर्गेश परुळेकर यांनी व्यक्त केले. स्वा. सावरकरांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त हिंदू जनजागृती समितीतर्फे येथील गोखले सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी सनातन भारतीय संस्कृती संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक यांचेही व्याख्यान झाले.

रोजगारामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील -नितीन गडकरी
बेलापूर/वार्ताहर :
विदर्भ हा खनिज संपत्तीत अग्रेसर असून, त्यावर आधारित प्रकल्प राबवून येथील प्रत्येक घरात रोजगार उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबतील, असा विश्वास भाजपचे प्रदेश अध्यक्ष नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केला. नेरुळ येथे विदर्भ समाज संघाच्या नवी मुंबई शाखेच्या चौथ्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी गडकरी बोलत होते. विदर्भाचा विकास करायचा असेल तर शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. येत्या चार वर्षांंत येथे येणाऱ्या विमानतळ, सेझ आदी प्रकल्पांमुळे विदर्भाचा चांगला विकास होईल, असे गडकरी म्हणाले. विदर्भातून नोकरी-व्यवसायासाठी मुंबईत येणाऱ्या तरुणांची येथे राहण्याची सोय व्हावी म्हणून हावरे बिल्डर्सकडून विदर्भ समाज संघाला एक हॉल देण्यात आला आहे, त्यामुळे विदर्भातील बेरोजगारांना येथे एक हक्काचा आसरा मिळून आपले नशीब अजमावण्याची संधी मिळेल, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. याप्रसंगी हावरे बिल्डर्सचे संचालक व भाजप प्रदेश नेते सुरेश हावरे यांनी नवी मुंबईत विदर्भ भवनासाठी भूखंड मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. सुरेश हावरे यांचे सामाजिक कार्य पाहता त्यांना भाजपतर्फे विधानसभेसाठी संधी देण्यात यावी, अशी मागणी संघाचे अध्यक्ष गजानन नागे यांनी यावेळी केली. संघ पूर्ण ताकदीनिशी हावरेंच्या पाठीशी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपचे सी.व्ही. रेड्डी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते .

अ‍ॅक्सीस बँकेत २० हजारांची चोरी
बेलापूर/वार्ताहर :
वाशीतील अ‍ॅक्सीस बँकेत काऊंटरवर पैसे मोजत असताना चोरटय़ांनी एका इसमाकडील २० हजार रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी फिर्यादी सुशांत पटनाईक यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पटनाईक यांचा कामगार शिवकुमार गुप्ता हा दुपारी दीड वाजता वाशी सेक्टर १७ येथील अ‍ॅक्सीस बँकेत पैसे काढण्यासाठी गेला होता, त्यावेळी ही घटना घडली.

ऐरोलीत विवाहितेची आत्महत्या
बेलापूर/वार्ताहर :
हुंडय़ासाठी पतीकडून शारीरिक व मानसिक छळवणूक झाल्याने विवाहितेने स्वत:स जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना ऐरोली येथे घडली. लता सुभाष इनकर असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी लताचे वडील अनंत पवळे यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. २६ मे रोजी रात्री १० वाजता लताने स्वत:स जाळून घेतले होते. ८० टक्के भाजलेल्या लताचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला.