Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

पोलीस नाईक बिडवे यांच्या मृत्यूने संपूर्ण दलाचे मनोधैर्य खच्ची
वार्ताहर / नाशिकरोड

4 पोलीस अस्वस्थ तर सर्वसामान्य चिंताग्रस्त
4 गुंडांचा राजकीय आश्रय मोडून काढण्याची मागणी
नाशिकरोड परिसरात गस्तीवर असणारे पोलीस नाईक कृष्णकांत विनायक बिडवे (४५) व रामदास विठोबा शिंदे यांच्यावर रविवारी रात्री झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बिडवे यांचे मंगळवारी सकाळी उपचार सुरू असताना निधन झाल्याच्या घटनेने स्थानिक पोलीस दलाचे मनोधैर्य खच्ची झाले आहे. पोलिसांवर झालेला हा भीषण हल्ला व त्यात बिडवे यांचा गेलेला बळी यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून सर्वसामान्यांमध्ये चिंता पसरली आहे.

नाशिक विभागात पाणीटंचाईची समस्या तीव्र
प्रतिनिधी / नाशिक

जूनच्या प्रारंभी मान्सूनची प्रतीक्षा असतानाच दुसरीकडे पाणी टंचाईच्या समस्येने दाहक स्वरूप धारण केले असून नाशिक विभागात या संकटात सापडलेल्या गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीत विभागात २४२ गावे व ३२४ वाडय़ांना १५१ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सिन्नर तालुक्यातील एका वाडीला पाच बैलगाडींमार्फत पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाने दिली आहे. जूनच्या पूर्वार्धात पावसाला सुरूवात झाली नाही तर स्थिती अधिक बिकट होणार असल्याने प्रशासन धास्तावले आहे.

सहकार विभागाच्या आश्वासनानंतर बाजार समिती बचाव संघटनेचे आंदोलन मागे
प्रतिनिधी / नाशिक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील आर्थिक गैरव्यवहारांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सहकार विभागाने कलम ५३ अन्वये नोटीस पाठविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर बाजार समिती बचाव समितीच्यावतीने सुरू असणारे आमरण उपोषण मंगळवारी मागे घेण्यात आले. ज्येष्ठ समाजसेवक पां. भा. करंजकर, डॉ. गिरधर पाटील, पंडितराव पाटील यांनी सहकार उपनिबंधकांशी या विषयांवर चर्चा केली.

जिल्हा बँक संपाचा विषय औद्योगिक न्यायालयात
प्रतिनिधी / नाशिक

कामगार उपायुक्तांची मध्यस्थी निष्फळ ठरल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील संपाचा विषय आता औद्योगिक न्यायालयात पोहोचला आहे. कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप बेकायदेशीर असल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे असले तरी नाबार्डच्या निकषानुसार वेतनवाढीची मागणी करण्यात आल्याचा दावा करत कामगार संघटनेने बँकेने न्यायालयाचा अवमान केल्याची तक्रार केली आहे. उभयतांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे संप अधिकच चिघळण्याची शक्यता असून सलग दुसऱ्या दिवशी काम बंद राहिल्याने कोटय़वधींची उलाढाल ठप्प झाली आहे. दरम्यान, सायंकाळी या प्रश्नी व्यवस्थापन व कर्मचारी संघटने दरम्यान झालेल्या चर्चेतूनही तोडगा निघू शकला नाही.

वेतनवाढीसाठी अभियंत्यांची आज निदर्शने
प्रतिनिधी / नाशिक

राज्यातील अभियंत्यांना केंद्र शासनाप्रमाणेच वेतन मिळावे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील सर्व अभियंते निदर्शने करणार असल्याची माहिती महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा महासंघाने दिली आहे. या आंदोलनाच्या पुढील टप्प्यात ६ जून रोजी सामुदायिक रजेवर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक जिल्हा बेसबॉल संघ निवडीसाठी आज चाचणी
नाशिक / प्रतिनिधी

राज्यस्तरीय उपकनिष्ठ बेसबॉल स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्य़ाच्या संघांची निवड करण्याच्या हेतूने बेसबॉल असोसिएशन ऑफ नाशिकतर्फे बुधवारी दुपारी चार वाजता भोसला सैनिकी महाविद्यालयाच्या क्रीडांगणात निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या खेळाडुंची जन्मतारीख एक जानेवारी १९९४ अथवा त्यानंतरची असेल, असे खेळाडू या निवड चाचणीत सहभागी होऊ शकतील. निवड झालेले नाशिकचे संघ ८ ते १० जून या कालावधीत अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकचे प्रतिनिधीत्व करतील. ज्या खेळाडूंना या चाचणीत सहभागी व्हायचे असेल अशा खेळाडुंनी भोसला सैनिकी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी राजू शिंदे यांच्याशी ९८६०७८६२७६ या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

भटक्या, विमुक्तांचा आंदोलनाचा इशारा
नाशिक / प्रतिनिधी

मतदारयादीत नाव नोंदणी, पिवळे रेशनकार्ड, जातीचे दाखले, बेघरवासियांना घरे या मागण्यांप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठकीचे आयोजन करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते, परंतु त्याची कोणतीही दखल घेतली न गेल्याने १७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र भटक्या व विमुक्त जाती संघातर्फे रतन सांगळे, भिमा काळे यांनी दिला आहे. भटक्या, विमुक्तांच्या घरांसाठी तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी शहर परिसरात पाच ठिकाणी जागा निश्चित केल्या होत्या. सर्व प्रकारच्या नागरी सुविधा दिल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले होते. परंतु त्यांची बदली झाल्याने काम थांबले आहे. या सर्व प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी दखलपात्र आंदोलन करण्याची गरज आहे, असेही संघाने म्हटले आहे. आंदोलनाच्या दिवशी मुलबाळांसहित, पशुप्राण्यांसह, पालासहित, भांडे कुंडे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ यावे, असे आवाहन संघातर्फे करण्यात आले आहे. आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी व पूर्वतयारीकरिता नवीन आडगाव नाका येथे सोगल बंगल्यात शनिवारी जी. जी. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आली असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.

लोकशाहीदिनी दाखल तक्रारी त्वरित निकाली काढण्याचे निर्देश
नाशिक / प्रतिनिधी

लोकशाही दिनात दाखल झालेल्या तक्रारी त्वरित निकाली काढाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी पी. वेलरासु यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात वेलरासु यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या लोकशाही दिनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. जी. वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन महाजन यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. लोकशाही दिनात एकूण १३ तक्रारी अर्ज दाखल झाले. त्यात महसूल विभाग ७, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक ग्रामीण, जिल्हा परिषद प्रत्येकी एक, भूमी अभिलेख दोन, इतर एक असे एकूण १३ अर्ज दाखल झाले. वेलरासु यांनी मागील प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेवून ते तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रश्न सोडविणार- डॉ. शोभा बच्छाव
नाशिक / प्रतिनिधी

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सर्व प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची ग्वाही आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांनी दिली आहे. महाराष्ट्र राजपात्रित वैद्यकीय अधिकारी (मॅग्मो आयुर्वेद) आणि नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित डॉक्टरांच्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन विभागीय संदर्भ सेवा रूग्णालयात बच्छाव यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती विष्णुपंत म्हैसधुणे, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. जी. वाघ, आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप वैद्य, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ए. डी. भालसिंग, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश आहेर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिबिरात ३० बाटल्या रक्त जमा झाले. डॉक्टरांनी रक्तदान करून समाजात चांगला आदर्श निर्माण केला असून यामुळे समाजातील रक्तदानाबद्दलची भीती आणि गैरसमज निश्चितच दूर होण्यास मदत होईल, असे बच्छाव म्हणाल्या. म्हैसधुणे, डॉ. आहेर, डॉ. पाटील यांचीही भाषणे झाली.