Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

अतिरिक्त वीज भारनियमनामुळे ग्राहकांमध्ये असंतोष
वार्ताहर / शहादा

उन्हाळ्याच्या झळा एकिकडे बसत असतांना शहर आणि तालुका वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे भाजून निघत आहे. घोषित भारनियमनाव्यतिरिक्त तीन ते चार तास अतिरिक्त भारनियमनाचा बोजा कंपनीच्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांनी लादल्याने ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे. तालुक्यातील १३२ के. व्ही. उपकेंद्राचे एक रोहित्र आठ दिवसांपूर्वी जळाले. परिणामी शहादेकरांना ऐन उन्हाळ्यात पाचऐवजी सात ते आठ तासाच्या भारनियमनाला तोंड द्यावे लागत आहे. एवढेच नव्हे तर शहराच्या पाणी पुरवठय़ावरदेखील त्याचा विपरित परिणाम झाल्याने शहादेकरांना पाण्यासाठीही वणवण करण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील १३२ केव्ही उपकेंद्रावरून तळोदा, अक्कलकुवा, धडगाव तालुक्यांना वीज पुरवठा होतो. रोहित्र वर्षांनुवर्ष बदलले जात नाहीत.

जळगाव : आरोग्यसेवा अधिकारी आंदोलनाच्या पवित्र्यात
वार्ताहर / जळगाव

राज्यातील वरिष्ठ पदावरील डॉक्टर आणि आरोग्यसेवा अधिकाऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणे वेतन न दिल्याने त्यांच्या महासंघाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्या अंतर्गत जळगाव येथे निवासी जिल्हाधिकारी आर. आर. काळे यांना १४ कलमी मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यात ४ जून रोजी जिल्हा रुग्णालयात द्वारसभा घेण्यात येणार आहे. राज्याच्या आरोग्य सेवेतील वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील तज्ज्ञ डॉक्टर्सचा या महासंघात समावेश आहे. आपल्या मागण्यांसंदर्भात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात झालेल्या पत्रकार परिषदेत आपल्या आंदोलनाच्या दिशेसंबंधी माहिती देण्यात आली. यात काळ्या फिती लावून काम करणे, धरणे, लाक्षणिक उपोषण तसेच दवाखाने बंद असे आंदोलन करण्याचा संघटनेचा मानस आहे. काळे यांना मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. त्यानुसार ४ जून रोजी जिल्हा रुग्णालयात द्वारसभा, ११ रोजी मुंबईत धरणे, २० जून रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, कुटीर व जिल्हा रुग्णालय एक तास बंद व धरणे, २६ रोजी लाक्षणिक उपोषण, २० ऑगस्ट रोजी दवाखाने २४ तास बंद असा आंदोलनाचा कार्यक्रम आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयप्रकाश खडसे, महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. एस. बी. सोनवणे, कोषाध्यक्ष डॉ. बी. आर. पाटील, डॉ. कविता सोनटक्के, डॉ. एस. जी. बडगुजर यावेळी उपस्थित होते.

गटसचिवांच्या संपामुळे शेतकऱ्यांची गैरसोय
शहादा / वार्ताहर

गटसचिवांच्या संपामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत असून याप्रकरणी प्रशासनाने योग्य दखल न घेतल्यास गंभीर परिणाम होतील असा इशारा मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात तालुक्यातील सोनवदच्या शेतकऱ्यांनी दिला आहे. गटसचिवांच्या मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने गटसचिवांनी खरिप हंगाम सुरू होण्यापूर्वीच बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे गटसचिवांच्या माध्यमातून खरिप हंगामाच्या काळात होणारा कर्जपुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गटसचिवांच्या मागण्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खरीपासाठी लागणारा कर्जपुरवठा तात्काळ होण्यासाठी सरकारने संपाबाबत तात्काळ निर्णय घेणे अपेक्षित आहे. अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशारा सोनवदच्या ग्रामस्थांनी दिला आहे.

पोल्ट्री व्यावसायिकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
मनमाड /वार्ताहर

पोल्ट्रीच्या व्यवसायासाठी लागमारे पशुखाद्य खरेदी करून एक लाख ४० हजार ८३ रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथील पोल्ट्री विक्री व्यवस्थापक रियाज शेख विरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. येथील व्यापारी किसनलाल बंब यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती. बंब यांचा मनमाड येथे कांदा व इतर खाद्य विक्रीचा व्यवहार आहे. २४ मे रोजी शेख हा बंब यांच्याकडे आला आणि पशुखाद्यासाठी लागणारा १६४ क्विंटल मका असा एक लाख ४० हजार ८३ रुपये किंमतीचा माल खरेदी केला. मालाची किंमत ट्रक चालकाजवळ देतो असे सांगून तो माल घेवून गेला. मात्र चालकाकडे पैसे न देता माल उतरवून घेतला आणि ट्रक परत पाठवून दिला. वारंवार मागणी करूनही त्याने मालाचे पैसे देण्याची टाळाटाळ केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची तक्रार बंब यांनी केली आहे.

मोबाईल मनोऱ्यांचे वीज बील तीन वर्षांपासून थकित
नांदगाव / वार्ताहर

नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील मोबाईल मनोऱ्यासाठी घेतलेल्या विजेचे बील तीन वर्षे होऊनही संबंधितांना अद्यापही मिळाले नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ग्लोबल टेलिकॉम मर्यादित, या पुणेस्थित कंपनीने नांदगाव तालुक्यात न्यायडोंगरी, वेहेळगाव येथे मोबाईल मनोरे उभारून ते मोबाईल कंपन्यांना मासिक भाडे तत्वाने दिले आहेत. न्यायडोंगरी येथेही याच कंपनीचा मनोरा असून त्यास तीन वर्षांचा कालावधी झाला आहे. मनोऱ्यासाठी घेतलेल्या विजेचा वापर आतापर्यंत सुमारे ४१७१५ युनिट इतका झाला आहे, अशी माहिती या ग्लोबल टेलीकॉमच्या अधिकाऱ्यांनी सहाय्यक अभियंत्यास लेखी स्वरुपात दिली आहे. युनिटनुसार सुमारे दोन लाख रुपये थकबाकी झाली आहे. वेहेळगाव येथील मनोऱ्यासाठी घेतलेल्या विजेचे बील नेहमीच १२०० रूपयांच्या आसपास येते. सामान्य ग्राहकाचे २०० रुपये वीज बील थकले तरी वीज प्रवाह बंद करण्यासाठी कर्मचारी थेट घरी जातात. मात्र दुसरीकडे ज्यांची कितीही वीज बील भरण्याची क्षमता आहे, त्यांना मात्र वीज बील पाठविले जात नाही, याबाबत सर्वसामान्य जनतेत तीव्र नाराजी दिसून येत आहे.

मेशी-वासोळ रस्त्यासाठी उपोषण
देवळा / वार्ताहर

वर्षभरापूर्वी पुरात वाहून गेलेल्या मेशी ते वासोळ रस्त्याची दुरूस्ती न झाल्याने मेशी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी देवळा येथे तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. रस्ता नसल्यामुळे दोन्ही गावांतील संपर्कास अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्याचा प्रश्न तात्काळ न सोडविल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा इशाराही यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी दिला. तहसीलदार सी. एच. वैष्णव यांनी उपोषणाची गंभीर दखल घेत संबंधित विभागाला सूचना दिल्या. तहसीलदारांच्या आश्वासनानुसार लाक्षणिक उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी सरपंच गंगुताई शिरसाठ, उपसरपंच गंगाधर शिरसाठ, सदस्य सुनील शिरसाठ, बापू जाधव, श्रीराम बोरसे, सिताराम बोरसे, बापू शिरसाठ, कडू कुवर, हिलाल गरूड, भटू शिरसाठ, समाधान बोरसे आदी उपोषणास बसले होते. दरम्यान, मेशी येथे सिंगलफेज उपकेंद्र तात्काळ सुरू करावे, अशी मागणीही उपसरपंच गंगाधर शिरसाठ यांनी केली आहे.

वाखारीत दूरध्वनी सेवेचा बोजवारा
देवळा / वार्ताहर

तालुक्यातील वाखारी येथील दूरध्वनीसेवा तांत्रिक अडचणीमुळे नेहमीच नादुरूस्त राहत असल्याने बहुतांश ग्राहकांनी दूरध्वनी संच परत केले असून दूरध्वनी सेवा त्वरित सुरळीत न झाल्यास देवळा येथील दूरध्वनी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा ग्राहकांनी दिला आहे. वाखारी येथील दूरध्वनीसेवा वारंवार खंडित होते. गावातील ग्राहकांसाठी दूरध्वनी सेवा म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली असून वैतागून बहुतांश ग्राहकांनी खासगी कंपन्यांचे मोबाईल खरेदी केले आहेत.