Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

सध्याच्या काळात संगीत ही एकटय़ाने करायची गोष्ट राहिलेली नाही. उगाच आपला एकटाच गात बसला आहे, असे कुणी कलावंत करीत नाही. गायचे असले किंवा वाद्य वाजवायचे असले, तरी ते एकटय़ाने करता येत नाही, एवढी संगीतातील परिस्थिती बदललेली आहे. देवापुढे बसून त्याची आराधना करण्यासाठी सुरेल आवाजात त्याचे मन रिझवण्याचे काम संगीताने केले. (मुस्लीम धर्मातील बांग हे तर केवढे अपूर्व असे संगीत आहे.) पण तरीही संगीत म्हणून जे काही व्यक्त होते, ते एकटय़ाने आपल्या मेंदूतील प्रतिभेने सादर करायचे असते. कलावंताला जे सुचते ते त्याच्या प्रतिभेच्या स्फुरणातून! ते व्यक्त करण्यासाठी त्याला एखाद्या भाषेची आवश्यकता असते. तो कधी रंगांची भाषा वापरतो तर कधी रेषांची! कधी स्वरांची तर कधी देहाची! त्याला जे व्यक्त करायचे आहे, ते नेमके व्यक्त करण्यासाठी त्याला दुसऱ्या भाषेचा आधार उपयोगाला येत नाही.

कोणत्याही निवडणुकीच्या निकालानंतर विजयी गटाची सर्वसाधारणपणे प्रतिक्रिया ‘हे तर अपेक्षितच होतं’ अशी असते, तर पराभूत गट आत्मचिंतनाच्या, पर्यायाने आत्मक्लेशाच्या मूडमध्ये जातो. पण यावेळची रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक याला अपवाद ठरली आहे. १६ मे रोजी झालेल्या मतमोजणीमध्ये राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव, काँग्रेस आघाडीचे उमेदवार नीलेश यांनी भाजप- सेना युतीचे मावळते खासदार सुरेश प्रभू यांच्यावर निर्णायक आघाडी घेतल्यानंतर मतमोजणी केंद्राबाहेर काँग्रेस आघाडीच्या तंबूमध्ये जल्लोष झाला खरा, पण खुद्द राणे या मताधिक्याबाबत फारसे समाधानी नव्हते. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच प्रसिद्धीमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी आपली ही नाराजी व्यक्त केली, पण त्याबाबत अधिक काही बोलण्याचे टाळले.

‘कृष्णकुंजा’र आज ही घे म्हणान गर्दी होती. तशी हयसर रोजचीच गर्दी असता. धाकल्या साहेबांन आपलो वेगळो ‘बॅनर’ सुरु केल्यापासून हयसर रोजची गर्दी असता. आजची गर्दी नेहमीसारखी दिसा नव्हती. सगळे गोरे आज ‘कृष्णकुंजा’च्या ब्हायर उभे होते. आजची हयसरली ही ‘वेगळी गर्दी’ बघान बाबल्यान आपला डोक्या गर्दीत घातल्यांनी. सुरुवातील त्येका वाटला बी.बी.शी.चे वार्ताहर आसत की काय? पण नाय.. बाबल्यान पुन्हा एकदा गर्दीक कान लायलो. आणि गजाली एैकून हे गोरे कोण याचो नक्की अंदाज घेण्याचो प्रयत्न केल्यानी. बाबल्याक थोडाफार इंग्रजी येता, त्येचो आज बऱ्यापैकी फायदो झालो. थोडय़ाच वेळान बाबल्याल अंदाज इलो. हयसर उभे असलेले काय बी.बी.शी.चे वार्ताहर नव्हते. युरोप, अमेरिकेतून आयल्लले स्थानिक अस्मिता जपणारे ते कार्यकर्ते होते. सायबान जशी मराठी अस्मिता जपून भय्यांक हद्दपार करण्याचो जो इडो उचललो त्येनी प्रभावित जावन हे हय आयल्लले. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात सध्या परप्रांतिय घुसुन, कष्ट करुन आपला एक स्थान निर्माण करतसत. पण यामुळे स्थानिक मात्र हद्दपार जातसत. त्येमुळे प्रत्येक ठिकाणी स्थानिक लोकांर अन्याय जातासा. ह्येची पहिली ठिणगी मुंबयत सायबान टाकली आणि त्येची बातमी शी.एन.एन., बी.बी.शी.न जगात पोचयली. यातून अनेक विदेशी लोक प्रभावित झाल्यानी. त्यांका त्यांच्या मनातल्या मनातलो इशु सायबान लावन धरलो म्हणान बरा वाटला.. ‘कृष्णकुंज’च्या बाह्येर फॉरेनरांची गर्दी झाल्याची बातमी हाहा म्हणता पसरली. नेहमीसारख्यो ओबी व्हॅन आणि पत्रकारांची लगबग सुरु झाल्यानी. ऊनात ऊभे रवन घामाघूम झालेले पत्रकार बघून सायबान सॅन्डवीच आणि चा पाठवून दिलो. इंग्रजी आणि फॅरेनच्या चनेल्सनी फॅरेनसून आललेल्या गोऱ्यांसमोर दांडुको धरुन मुलाखती सुरु केल्यो. सगळीच चर्चा इंग्रजीत होती. बाबल्याच्या डोक्यावरसून एक एक बाऊंसर जायय होते. मात काही शब्द बाबल्याक समजत होते. रॅज ठॅकरे, स्टगलर फॉर मरॅठी पिपल हे बाबल्याक समाजलेले काही शब्द. दुपारचे एक बाजून गेल्लले. इतक्यात वरसून एक माणूस आयलो आणि त्येनी एका गोऱ्याक सांगला - ‘आपको उप्पर बुलाया है’. त्या निरोप्याक वाटला— या गोऱ्याक मराठी समजूचा नाय म्हणान तो बाबडो हिंदीत बोललो. तेची काय चूक नाय त्येका इंग्रजी खय येत होता. त्या गोऱ्याक बाबडय़ाक काय समजूक नाय. तितक्यात इंग्रजी चॅनलवारी एक मुलगी पुढे आयली आणि तीने त्या गोऱ्याक इंग्रजीत सांगला.. गोऱ्यांचा एक शिष्टमंडळ सायबाकडे वर गेला. पुना पत्रकारात शांतता. आता वर गेलले पुन्हा खाली कधी येतत, नायतर सायब कधी वर बोलयतत याकडे डोळे लावन बसण्यापलिकडे आता काय काम नव्हता. वाट बघता-बघता दोन तास गेले. बाबल्याक कंटाळो इलो. बिच्चाऱ्या चनेलवाल्या पत्रकारांची दया इली. कंटाळून जाण्याच्या तयारीत असताना गोऱ्यांचा शिष्टमंडळ खाली इला बुवा. दांडूकेवाल्यांनी त्येंच्यापुढे एकच गर्दी केल्यानी. बाल्याच्या कानार शब्द पडत होते-‘वुई मेट मि. ठॅकरे. ही लिसन टू अवर ग्रीव्हन्सीस. वुई वॉंट हिज पार्टीज फ्रॅंचाईजीस इन डिफरंट युरोपियन कंट्रीज टू प्रोटेक्ट अवर इन्टेस्ट.’ बाबल्याक थोडोफार अर्थ समाजलो. इतक्यात पत्रकारांक वरती बोलायल्याचा आमंत्रण आयला. सगळे त्या दिशेन धावत सुटले. सायबाची पत्रकारपरिषद सुरु झाली.. ‘आज जगाच्या कानाकोपऱ्यातल्या देशात आमच्या मुंबईकरांच्या आंदोलनाची दखल घेतली गेली आहे. आज युरोप, अमेरिकेतून शिष्टमंडळ आले होते. त्यांना युरोप, अमेरिकेत मनसे सुरु करावयाची आहे. सुरुवातीला आम्हाला आनंद वाटला. मात्र त्यांचे पडसाद गंभीर होणार हे आम्ही आत्ताच ओळखले. उदा. सिलिकॉन व्हॅलितील गोरे लोक तेथील मराठी माणसांच्या विरोधात बोलत होते. हे आम्हाला कदापी सहन होणार नाही. त्यामुळे आम्ही त्यांना सन्मानाने परत पाठविले..’ सायबांची पत्रकारपरिषद संपली. सगळ्यांची पांगांपाग झाली आणि बाबल्या भांभावलेल्या अवस्थेत घरी परतलो..
प्रसाद केरकर
prasadkerkar73@gmail.com