Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

सारसबाग वर्तुळाकार वाहतूक योजना समन्वयाअभावी अडचणीत
सलील उरूणकर
पुणे, २ जून

स्वारगेट-सारसबाग आणि पूरम चौकामध्ये चक्राकार वाहतूक व्यवस्थेची अंमलबजावणी सुरू होऊन चार महिने उलटल्यानंतरही, या मार्गावर रस्ते अभियांत्रिकीच्या दृष्टीने जे बदल करणे आवश्यक आहेत त्याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या मार्गावर मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाहतूक शाखा आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाच्या अभावामुळे ही रस्ते अभियांत्रिकीची कामे अपूर्ण राहिली आहेत.

वारजे जलकेंद्राच्या दुसऱ्या टप्प्याला स्थायी समितीची मंजुरी
पुणे, २ जून / प्रतिनिधी

पश्चिम पुण्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या वारजे जलशुद्धीकरण केंद्राच्या दुसऱ्या टप्प्याला स्थायी समितीने आज बहुमताने मंजुरी दिली. स्थायी समितीचे अध्यक्ष निलेश निकम यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. वारजे जलशुद्धीकरण केंद्रात सध्या प्रतिदिन १०० दशलक्ष लीटर पाण्यावर प्रक्रिया करून ते वितरित केले जाते. या पहिल्या टप्प्याच्या प्रकल्प क्षमतेत प्रतिदिन ८६ दशलक्ष लीटरची वाढ करणे आणि नवीन प्रतिदिन २०० दशलक्ष लीटर प्रक्रियेचा प्रकल्प उभारणे या कामासाठी निविदा काढण्यात आली असून ती स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आली होती.

प्रत्येक तालुक्यात आपत्कालीन कक्ष स्थापणार - जिल्हाधिकारी
पुणे, २ जून/प्रतिनिधी

जिल्ह्य़ात प्रत्येक तालुक्यात आपत्कालीन कक्षाची स्थापना करण्यात येणार असून आपत्ती नियंत्रण कक्षात काम करणाऱ्या व्यक्तींना योग्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याबरोबरच प्रत्येक कक्षाची रोज चाचणी घेऊन कामचुकार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी पुणे जिल्हा पूर नियंत्रण व जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन समिती बैठकीत दिले. या बैठकीत बोलताना दळवी म्हणाले की, जिल्ह्य़ातील ८९ गावे पूरपरिस्थितीजन्य असून ८ गावे अतिसंवेदनशील गटात मोडतात.

प्रत्येक तालुक्यात आपत्कालीन कक्ष स्थापणार - जिल्हाधिकारी
पुणे, २ जून/प्रतिनिधी

जिल्ह्य़ात प्रत्येक तालुक्यात आपत्कालीन कक्षाची स्थापना करण्यात येणार असून आपत्ती नियंत्रण कक्षात काम करणाऱ्या व्यक्तींना योग्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याबरोबरच प्रत्येक कक्षाची रोज चाचणी घेऊन कामचुकार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी पुणे जिल्हा पूर नियंत्रण व जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन समिती बैठकीत दिले.

फुकट काहीही नको; फक्त पुनर्वसन जलदगतीने करा
पुणे, २ जून/प्रतिनिधी

फेरीवाले व्यावसायिकांच्या पुनर्वसनात कुठलीही गोष्ट आम्हाला फुकट देऊ नका. पुनर्वसनासाठी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा खर्च द्यायला आम्ही तयार आहोत, असा सकारात्मक पवित्रा घेत फेरीवाले व्यावसायिकांनी राज्य शासनाच्या पुनर्वसन धोरणाचे स्वागत केले आहे. फक्त पुनर्वसन योग्य त्या पद्धतीने आणि जलदगतीने व्हावे, एवढीच त्यांची मागणी आहे.

महापौरांच्याअतिरिक्त बांधकामास आक्षेप
पिंपरी, २ जून / प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडच्या महापौर अपर्णा डोके राहत असलेल्या इमारतीतील रहिवाशांनी केलेल्या अतिरिक्त बांधकामास येथील बांधकाम व्यावसायिकाने आक्षेप घेतला आहे. चिंचवडच्या ‘देदीप्यमान’ या इमारतीत महापौर डोके राहतात. त्यांच्यासह इमारतीतील आठ जणांनी अतिरिक्त बांधकाम केल्याचा आक्षेप एका बांधकाम व्यावसायिकाने घेतला असून खासगी वकिलामार्फत या सर्वाना नोटीस बजावण्यात आली आहे. तथापि, या प्रकरणी आपल्याला कोणतीही नोटीस आली नसल्याचे महापौरांनी सांगितले. तर, या प्रकरणी पालिकेकडे तक्रार दाखल झाली नसल्याचे प्रशासनाकडूनही सांगण्यात आले.

आंबेगावात तीन लाख रोपांची लागवड
मंचर, २ जून / वार्ताहर

आंबेगाव तालुक्यात वनखात्यामार्फत वृक्ष लागवडीची मोहीम जोरदारपणे राबविण्यात येणार आहे. तालुक्यात वनखात्याच्या माध्यमातून पावसाळ्यात तीन लाख रोपांची लागवड करण्यात येणार असून त्यामध्ये २५ हजार पाचशे औषधी वनस्पतींचा समावेश असणार असल्याची माहिती घोडेगावचे वनक्षेत्रपाल निवृत्ती खलाटे यांनी दिली.तालुक्यात २००९-२०१० सालात वनखात्याअंतर्गत येत्या पावसाळ्यात सुमारे तीन लाख रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये पंचवीस हजाराहून अधिक वनस्पती रोपांचा समावेश असणार आहे. तीन लाख वृक्षांच्या अनुषंगाने रोपे तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

खासगी बसच्या धडकेतसायकलस्वार जागीच ठार
हडपसर, २ जून /वार्ताहर
पुणे-सासवड रस्त्यावर भरधाव खासगी बसची धडक बसल्याने सायकलस्वार जागीच ठार झाला. फुरसुंगी रेल्वे उड्डाणपुलाजवळ काल सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.मुकुंद वैजनाथ पांचाळ (वय २०, रा. हरपळेवस्ती, फुरसुंगी, मूळ रा. लोखंडी सावरगाव, जि. बीड) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सायकलस्वाराचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाकडाची मोळी घेऊन पांचाळ हा सायकलवरून पुण्याहून सासवडच्या दिशेने जात होता. त्यावेळी पुण्याच्या दिशेने येणाऱ्या भरधाव खासगी बसची धडक पांचाळ याच्या सायकलला बसली. या अपघातात पांचाळ गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी अपघतानंतर बस पेटविण्याचा प्रयत्न केला. अरुंद रस्ता आणि बेशिस्त वाहतुकीमुळे फुरसुंगी रेल्वे उड्डाणपुलाजवळता रस्ता धोकादायक झाला आहे, अशी प्रतिक्रिया या भागातील कार्यकर्ते व नागरिक डॉ. बाळासाहेब हरपळे यांनी दिली.

‘न्या. सराफ मागास आयोगाची बेकायदेशीरपणे नियुक्ती’
पुणे, २ जून / प्रतिनिधी
राज्य सरकारने न्या. बापट कमिशनचा अहवाल धुडकावून सत्तेच्या जोरावर मराठय़ांना ओबीसीमध्ये घेण्याबाबत न्या. सराफ मागास आयोगाची बेकायदेशीरपणे नियुक्ती केली असल्याची टीका करण्यात आली. महाराष्ट्र ओबीसी समन्वय समितीचे प्रमुख हनुमंत उपरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण ओबीसीचे नामधारण करून मराठय़ांना आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. आगामी विधानसभेत न्या. बापट आयोगाच्या शिफारशी शासनाने मान्य केल्या नाही तर मतदानाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी प्रमाणे जागा दाखवून देवू, असे प्रतिपादन त्यांनी या वेळी केले. या वेळी चंद्रकांत बावकर, मनोहर खेडकर उपस्थित होते.

बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक;महापालिकेच्या लिपिकाला शिक्षा
पुणे, २ जून / प्रतिनिधी

बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी महापालिकेच्या लिपिकाला तीन वर्ष कारावासाची शिक्षा व अकरा हजार रुपयांचा दंड मुख्य न्यायदंडाधिकारी यशवंत चावरे यांनी आज ठोठावला.
चंद्रकांत नामदेव भोईटे (वय ५३, रा. शुक्रवार पेठ) असे न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या लिपिकाचे नाव आहे. महापालिकेचे वरिष्ठ लिपिक सूर्यकांत पवार यांनी याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली होती. भोईटे याने बनावट कागदपत्रांद्वारे महापालिकेतून निलंबित झालेल्या तसेच मृत कर्मचाऱ्यांच्या नावाने मे १९९४ ते फेब्रुवारी १९९८ या कालावधीत तीन लाख रुपये परस्पर काढून घेत अपहार केला होता.

टोल वसुलीविरोधात याचिका दाखल करणार?
पुणे, २८ मे / प्रतिनिधी
अन्यायकारक टोल वसुलीविरोधात जनहित याचिका दाखल करून न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती अखिल भारतीय भ्रष्टाचारविरोधी समितीतर्फे आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. नागरिकांना चांगले रस्ते उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. मूलभूत सुविधांसाठी शासनातर्फे विविध कर आकारले जातात. वाहन खरेदी करतानादेखील सरकार वाहनधारकांना स्वतंत्रपणे ‘रस्ता कर’ आकारते. असे असतानाही नागरिकांना राज्यामध्ये रस्त्यावरील टोल द्यावा लागणे हे अन्यायकारक आहे. या अन्यायाच्या विरोधात एक लाख नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन निवेदन व जनहित याचिकेद्वारे न्यायालयात दाद मागितली जाईल, अशी माहिती समितीच्या जनसंपर्क अधिकारी साधना तुरखिया यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.टोल वसुली बंद केली नाही, तर सरकारने आकारलेला रस्त्यावरील कर नागरिकांना परत करावा अशी मागणी तुरखिया यांनी या वेळी केली.पत्रकार परिषदेला समितीचे राष्ट्रीय सल्लागार शाकिर शेख, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र खिवंसरा आदी उपस्थित होते.

वारीवरील चित्ररूप पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, २ जून / प्रतिनिधी
आळंदी-देहू वारीचे चित्ररूप दर्शन घडविणाऱ्या ‘वारी-पिल्ग्रीमेज ऑफ जॉय’ या पुस्तकाच्या इंग्रजी व फ्रेंच या भाषेमधील आवृत्तीचे प्रकाशन सोमवारी (दि. ८) करण्यात येणार आहे.संदेश भंडारे लिखित या पुस्तकाचे प्रकाशन ‘हेरिटेज इंडिया’ या संस्थेतर्फे करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक मंजिरी खांडेकर यांनी दिली. सिम्बायोसिस संस्थेच्या ‘विश्वभवन’ सभागृहात सायंकाळी सहा वाजता शिल्पकलेचे गाढे अभ्यासक आणि डेक्कन महाविद्यालय पदव्युत्तर व संशोधन संस्थेचे अध्यक्ष गो. बं देगलुरकर यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या वेळी भारतीय संस्कृतीचे अभ्यासक गोविंद पुरुषोत्तम देशपांडे, लेखक सचिन कुंडलकर उपस्थित राहणार आहेत, असे खांडेकर यांनी सांगितले.

संस्कार शिबिरांच्या माध्यमातून समाजप्रबोधन - चव्हाण
िपपरी, २ जून / प्रतिनिधी

समाजाच्या सांस्कृतिक प्रगतीसाठी संस्कार शिबिरांची नितांत गरज आहे, त्यातूनच प्रबोधन व परिवर्तन होऊ शकेल, असे मत ज्येष्ठ साहित्यिक रामनाथ चव्हाण यांनी व्यक्त केले. अशोक बँकेचे अध्यक्ष अशोक शीलवंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित धम्मसंस्कार शिबिराच्या समारोप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रकाश रोकडे, रमनलाल सोनग्रा, गेणूभाऊ कडू, विजय जगताप, सुजाता मंचरकर आदी उपस्थित होते. यावेळी भन्ते राजरतन, पहिसेन, सुमित, सुदस्सन यांनी मार्गदर्शन केले. यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद जगदाळे, उपअधीक्षक डॉ. श्याम गायकवाड उपस्थित होते. शुभांगी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. दीपक भालेराव यांनी आभार मानले.

मधुमेहासंबंधीचे विशेष केंद्र सह्य़ाद्री हॉस्पिटलमध्ये सुरू
पुणे, २ जून / प्रतिनिधी
‘मधुमेहावर केवळ उपचार न करता या आजाराविषयी योग्य शिक्षण देऊन लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी’, या हेतूनेच सह्य़ाद्री हॉस्पिटलच्या वतीने ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डायबेटिस’ या केंद्राची स्थापना करण्यात आली असून या केंद्रात मधुमेहाविषयीच्या सर्व समस्यांचे निराकरण एकाच छताखाली केले जाईल, अशी माहिती ‘सह्य़ाद्री हॉस्पिटल’चे अध्यक्ष चारुदत्त आपटे यांनी दिली. सह्य़ाद्री हॉस्पिटलच्या वतीने बिबवेवाडी येथे सुरू करण्यात येणाऱ्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डायबेटिस’ या केंद्राचे उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. वासुदेव परळीकर, डॉ. मिलिंद गडकरी, डॉ. दिलीप काळे, डॉ. शैलजा काळे, माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे उपस्थित होते. ‘डायबेटिस न्यूज अ‍ॅडव्हमूज’ या नियतकालिकाचे प्रकाशन डॉ. जयश्री आपटे यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले.

भोरमध्ये टपाल वेळेत मिळत नसल्याची तक्रार
भोर, २ जून / वार्ताहर

भोर येथील टपाल कार्यालयात दिलेली पत्रे, पाकीट बाहेरगावच्या लोकांना वेळेत मिळत नाहीत. तसेच परगावाहून येणारी पत्रे, पाकीट, पार्सल येथे वेळेत मिळत नाहीत. त्याबाबतचे तक्रारीचे लेखी निवेदन अंधश्रद्धा विरोधी भोर शाखेच्या वतीने येथील पोस्ट मास्तरांना देण्यात आलेले आहे.या निवेदनात त्यांनी गावोगावी पाठविलेली व इतर ठिकाणांहून त्यांना येणारी पत्रे, पाकिटे वेळेवर कधीही मिळत नसल्याची उदाहरणे दिली आहेत. त्यामुळे त्यांच्या संघटनेच्या बैठकांची निमंत्रणे, निरोप वेळेत पोहोचत नसल्याचे म्हटले आहे. या कारभाराबाबत योग्य सुधारणा झाली नाही तर आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

सांस्कृतिक संस्थांना देणगी
तळेगाव दाभाडे, २ जून/वार्ताहर
ज्या संस्थांच्या कार्यामुळे तळेगाव शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाऊ लागले अशा तीन प्रमुख सांस्कृतिक संस्थांना येथील कृष्णराव भेगडे मावळ विकास प्रतिष्ठानच्या वतीने एक लाख रुपयांची देणगी नुकतीच प्रदान करण्यात आली.‘कलापिनी’ संस्थेस पन्नास हजार रुपये, तर ‘श्रीरंग कलानिकेतन’ संस्थेस पंचवीस हजार आणि ‘मराठी नाटय़ परिषद’ शाखेस पंचवीस हजार रुपयांची देणगी देण्यात आली.