Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

विधानसभा निवडणुकीतही आघाडी आवश्यक -माणिकराव ठाकरे
अमरावती, २ जून / प्रतिनिधी

 

आगामी विधानसभा निवडणुकीतही जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आघाडी आवश्यक असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.
शहर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाइं आघाडी ही धर्मनिरपेक्ष विचारांची आघाडी आहे. जातीयवादी शक्तींना रोखण्यात या आघाडीला चांगले यश मिळाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही ही आघाडी कायम राहावी. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळवले आहे, त्यामुळे विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवावी, अशा सूचना काँग्रेस कार्यकर्त्यांकडून येत आहेत पण, तरीही जातीयवादी पक्षांचा पाडाव करण्यासाठी आघाडी करणे आवश्यक आहे, असे ठाकरे म्हणाले.
पश्चिम विदर्भात काँग्रेसला अपेक्षित यश मिळू शकले नाही, याची कारणे वेगवेगळी आहेत. या अपयशाची दखल आम्ही घेतली आहे पण, पराभवासाठी मोठय़ा प्रमाणावर स्थानिक प्रष्टद्धr(२२४)्ना कारणीभूत ठरले आहेत. या पराभवाची जबाबदारी ही कुण्या एकाची नाही. विधानसभा निवडणुकीत हे चित्र बदलेल. वेगवेगळया मतदार संघांमध्ये स्थानिक मुद्यांचा निवडणूक निकालावर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. आता काँग्रेस कार्यकर्त्यांना अधिक श्रम घ्यावे लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीत उमेदवार ठरवताना कुठल्याही उणिवा राहणार नाहीत याची काळजी घेतली जाईल, थेट लोकांपर्यंत पोहोचू, केंद्र व राज्य सरकारने केलेल्या चांगल्या कामांमुळे लोकांमध्ये काँग्रेसप्रती विश्वास निर्माण झाला आहे, सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला आता अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहेत. काँग्रेसचे नेते जिल्हा अणि तालुका पातळीवरील काँग्रेस समित्यांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून आहेत. कार्यकर्त्यांसोबतदेखील आम्ही संपर्क ठेवून आहोत. येत्या २३ जूनपासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती राज्यात संपर्क अभियान सुरू करणार आहे. या माध्यमातून कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज केले जाणार आहे. त्यापूर्वी ३ ते १० जून या काळात जिल्हा पातळीवर अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जाणार आहेत, असे माणिकराव ठाकरे म्हणाले.
गेल्या पाच वर्षांत सरकारने ज्या योजना आखल्या आणि त्याची परिणामकारक अंमलबजावणी केली, ते पाहून लोकांनी काँग्रेसला भरभरून मतदान केले आहे. विधानसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती होईल. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंह आणि युवा नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची घोडदौड सुरू आहे, विधानसभा निवडणुकीतही त्याचा फायदा होईल, असे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
अमरावतीत सक्षम उमेदवार देऊ
अमरावती विधानसभा मतदार संघात सक्षम उमेदवार देऊ, असे सांगतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी तुंबळ युध्द होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. काँगेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या गटातील लोकांची अनुपस्थिती आणि राष्ट्रपतीपुत्र रावसाहेब शेखावत यांची विधानसभा निवडणुकीची तयारी या पाश्र्वभूमीवर ठाकरे यांनी हे संकेत दिले आहेत. अमरावतीतून तो सक्षम उमेदवार कोण राहील? याविषयी त्यांनी बोलण्याचे टाळले.
काँग्रेसच्या दोन गटांमधील संघर्ष आता आणखी पेटणार असल्याचाच गर्भित अर्थ त्यातून निघाला आहे. शहर काँग्रेस कार्यकारिणीत गटबाजी होऊ देणार नाही, या विषयावर आपण पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्याशी चर्चा केली आहे, असे त्यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रष्टद्धr(२२४)्नााच्या उत्तरात सांगितले. त्याचवेळी काँग्रेसमध्ये ‘थर्मामीटर’ कोणाला, कसे आणि केव्हा लावावे हे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना चांगले ठाऊक आहे, असा टोला त्यांनी हाणला.