Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

चंद्रपूर जिल्ह्य़ात वीज रोधक यंत्रणा;
पोंभूर्णा व मूल येथे टॉवर्सची उभारणी
चंद्रपूर, २ जून/ प्रतिनिधी

 

वीज कोसळून बळी जाणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. हे अकाली मृत्यू टाळण्यासाठी शासनाने राज्यातील ३३ जिल्हय़ात विद्युत रोधक यंत्रणा उभी केली आहे. चंद्रपूर जिल्हय़ात पोंभूर्णा व मूल या दोन तालुक्यात हे टॉवर्स उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. पावसाळय़ात आकाशात कडाडलेली वीज भूतलावर कोसळून शेकडो लोकांचे बळी घेते. बळी जाणाऱ्यांमध्ये शेतात काम करणाऱ्यांचा सर्वाधिक समावेश असतो. शेतकऱ्यांचा अकाली मृत्यू टाळण्यासाठी आता शासनाने पाऊल उचलेले असून विजेला अटकाव करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात वीज अटकाव यंत्रणा उभारण्याचे काम सुरू केले आहे. पावसाळय़ाला सुरुवात होण्यापूर्वीच राज्यातील बहुतांश जिल्हय़ात टॉवर्स उभारणीचे काम सुरू आहे. एका टॉवरच्या उभारणीला ५० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. टॉवर ५० मीटर उंचीचे असून तीनशे मीटर परिघाचे क्षेत्र विजेच्या आपत्तीपासून सुरक्षित राहू शकणार आहे. त्याशिवाय जमिनीपासून उंच असलेल्या पाण्याच्या टाक्यांवरही लायटनिंग कंडक्टर बसवण्यात येणार आहे. मदत व पुनर्वसन खात्याने प्रत्येक गाव आणि शहरात पाण्याच्या टाकीवर ‘लायटनिंग कंडक्टर’ लावण्याची सक्ती केली असून तसे आदेश संबंधित जिल्हय़ाच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी राज्यात विजेने ४४५ जणांचे बळी घेतले. चंद्रपूर जिल्हय़ात गेल्या वर्षी ५० लोकांचा वीज पडून मृत्यू झाला. ही बाब ध्यानात घेऊन पोंभूर्णा व मूल तालुक्यात वीज अटकाव यंत्रणेचे टावर्स उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. राज्य विद्युत कंपनीचे कार्यकारी अभियंता हे काम करीत असून ९ जूनच्या आत टॉवर्सची उभारणी होईल अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली. मूल व पोंभूर्णा या दोन तालुक्यात गेल्यावर्षी २० लोकांचे बळी गेले. मूल व पोंभूर्णा या दोन तालुक्यापाठोपाठ जिवती तालुक्यातील एका शाळेवर वीज पडून चार विद्यार्थी मृत्युमुखी पडले होते. कोरपना, ब्रह्मपुरी, राजुरा, गोंडपिंपरी, सिंदेवाही व नागभीड या तालुक्यातदेखील विजेच्या बळीची संख्या जास्त आहे. टॉवर्स उभारण्यात आल्याने तालुक्यातील लोकांना दिलासा मिळाला आहे.