Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

कापूस की सोयाबीन; शेतकरी संभ्रमात
बाजारात सोयाबीनला चांगली किंमत
नागपूर, २ जून/ प्रतिनिधी

 

बाजारात अलीकडच्या काळात सोयाबीनच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने कापसाकडे आकर्षित होणारा शेतकरी सोयाबीन पेरावे की कापूस अशा संभ्रमात सापडला आहे.
मागील हंगामात विदर्भात मोठय़ा प्रमाणात सोयाबीनचा पेरा वाढला होता. २००७-०८ यावर्षी सोयाबीनला मिळालेली चांगली किंमत, काही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी विदर्भात येऊन सोयाबीन खरेदी केल्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा अधिक किंमत मिळाली होती. त्यामुळेच २००८-२००९ मध्ये सोयाबीनचा पेरा वाढला, नागपूर विभागातील एकूण १७.१७ लाख हेक्टर लागवड क्षेत्रापैकी सोयाबीनचा पेरा १४८ टक्के झाला होता. एकीकडे सोयाबीनचा पेरा वाढला आणि कापसाचा पेरा कमी झाला. कापसाचे लागवड क्षेत्र फक्त ६३ टक्के होते. हंगामानंतर चित्र पालटले. कापसाच्या हमीभावात घरघशीत ४० टक्के वाढ झाली. (प्रति क्विंटल ३ हजार रुपये) तर सोयाबीनच्या किमती प्रति क्विंटल २००० हजार रुपयांवरून १२०० ते १५०० रुपये प्रति क्विंटलवर आल्या. पाऊस न आल्याने व नंतर कीड लागल्याने सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादनातही पाच ते सात क्विंटलची घट झाली. मागील हंगामाचा अनुभव घेत शेतकऱ्यांचा यंदा कापसाकडे अधिक कल दिसून आला. बी.टी. बियाणांची वाढलेली मागणी व त्यामुळे या बियाणांचा होणारा काळाबाजार या बाबी शेतकरी सोयाबीन पेक्षा कापसाची लागवड करण्यास इच्छुक आहेत हेच दर्शविणाऱ्या आहेत. असे असले तरी आता चित्र बदलू लागले आहे. गेल्या वर्षी सोयाबीनचे उत्पादन घटल्याने यावेळी हंगामापूर्वीपासूनच सोयाबीनची मागणी बाजारात वाढली आहे. वायदा बाजारात आजच सोयाबीनला २६०० रुपये प्रति क्विंटल इतकी किंमत आहे, मागणी सातत्याने वाढतच चालल्याने हे दर आणखी वाढतील असा या बाजारातील जाणकारांचा दावा आहे. एकीकडे हंगामापूर्वीच सोयाबीन तेजीत असताना दुसरीकडे वस्रोद्योग मंत्रालयाने कृषी मूल्य आयोगाला कापसाच्या हमीभावात वाढ करू नये, अशी सूचना केली आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने केंद्र सरकार कापसाच्या हमीभावात घट करण्याची शक्यता कमी आहे, मात्र गेल्या हंगामातील हमीभावामुळे पणन महासंघाच्या वतीने कापूस खरेदी करणाऱ्या सीसीआयला मोठा तोटा आला आहे, तो भरून काढण्याची चिंताही कृषी मंत्रालयापुढे आहे. त्यामुळे यंदा कापसाला तीन हजार रुपयेच भाव मिळेल याबाबत शेतकऱ्यांना शंका आहे. दुसरीकडे सोयाबीनची मागणी वाढत आहे. त्यामुळे कालपर्यंत सोयाबीनपासून दूर चाललेला विदर्भातील शेतकरी आता कापूस की सोयाबीन या संभ्रमात आहे.