Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

मंदीतही नोकरीच्या संधींचा सुकाळ
पीयूष पाटील
नागपूर, २ जून

 

एकीकडे जागतिक मंदीमुळे जगभरातील लाखो लोकांना रोजगार गमवावा लागत असतानाच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागात अनेक पदे रिक्त झाली असल्याने मंदीच्या या काळात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. विविध महत्त्वाच्या खात्यांमध्ये अनेक जागा रिक्त असल्याने मोठय़ा प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून सर्वच क्षेत्रावर जागतिक मंदीचा विपरीत परिणाम झाला आहे. या मंदीमुळे एकीकडे उद्योगधंद्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यामुळे मोठय़ा प्रमाणात रोजगार गमाविण्याची वेळ अनेकांवर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून विविध कंपन्यांनी त्यांच्या मनुष्यबळात लक्षणीय कपात केली आहे तर, अनेक कंपन्यांनी वेतनात मोठय़ा प्रमाणात कपात केल्याचे दिसून येते. मंदीमुळे गेल्या काही महिन्यात अनेकांना रोजगार गमवावा लागला. मात्र, असे असले तरी शिक्षण घेऊन महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या तरुण- तरुणींसाठी सरकारी खात्यांमध्ये अनेक पदे रिक्त असल्याने रोजगाराच्या मोठय़ा प्रमाणात संधी उपलब्ध झाल्या आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, नागपुरातील कामठी कॅन्टोमेंट बोर्ड, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, केंद्रीय गुप्तचर खाते, बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक, आरोग्य मंत्रालयात वैद्यकीय अधिकारी, मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक, रीडर आणि लेक्चरर आदी जागा व इतर अनेक विभागांमध्ये मोठय़ा प्रमाणात रिक्त असलेली पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे इतक्या मोठय़ा प्रमाणात विविध प्रमाणात भरती होणार असल्याने मंदीतही रोजगाराच्या इतक्या मोठय़ा संधी उपलब्ध झाल्याने भारतात तरी नोक ऱ्यांचा सुकाळ असल्याचे दिसून येत आहे.
यामध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी विभागातील अभियंत्यांच्या ११ पदांसह २ हजार ३९३ जागा, केंद्रीय गुप्तचर विभागातील कनिष्ठ गुप्तचर अधिकारी पदाच्या १४०, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीत अभियंत्यांसाठी २१, नागपूर कन्टोंमेंट बोर्डातील ४, बँक ऑफ बडोदामध्ये विशेषज्ञ अधिकाऱ्यांची ३५५, कंटनेर कॉर्पोरेशनमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि इतर अशा सुमारे ११० पदांसाठी लेखी परीक्षा व मुलाखती घेण्यात येणार आहेत. ज्या पदांसाठी लेखी परीक्षा आणि मुलाखती होणार आहेत, यातील अनेक पदे चांगल्या वेतनश्रेणीची असल्याने मंदीत नोकरी गमावलेल्या तरुणांबरोबर नवोदितांनाही संधी मिळणार आहे. यातील अनेक पदे संबंधित क्षेत्रात कार्याचा अनुभव असलेल्यांसाठी असली, तरी नवोदितांना मोठय़ा प्रमाणात संधी उपलब्ध झाली आहे. यातील अनेक परीक्षा व मुलाखतीबद्दलची माहिती रोजगार समाचार (एम्प्लॉयमेंट न्यूज) यात उपलब्ध आहे, तर संबंधित विभागांच्या संकेतस्थळावरही याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. यातील अनेक परीक्षांचे अर्ज भरण्याची मुदत अजून संपायची असून जुलै महिन्यात भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे अंतिम वर्षांची परीक्षा देऊन निकालाची वाट पाहणाऱ्या नवोदितांना भविष्यात चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.