Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

‘लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढायला कलमाडींना कोणी अडवले होते?’
पुणे, २ जून / प्रतिनिधी

 

‘पुणे पॅटर्न’ तोडला नाही, तर विधानसभेची आगामी निवडणूक पुण्यात स्वबळावर लढवू, असा इशारा देणाऱ्या खासदार कलमाडी यांनी लोकसभेची निवडणूक स्वबळावर का लढवली नाही, त्यांना त्या वेळी स्वबळावर लढायला कोणी अडवले होते, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसने कलमाडी यांना विचारला आहे.
राष्ट्रवादीने ‘पुणे पॅटर्न’ तोडला नाही, तर पुण्यातील सर्व जागा स्वबळावर लढविण्याचा इशारा कलमाडी यांनी रविवारी जाहीररीत्या दिला. तसेच पालकमंत्री त्या जिल्ह्य़ाचा नसावा, अशीही मागणी करत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या अजित पवार यांना लक्ष्य केले. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणारे पत्रक महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रवक्ते चंदन सोंडेकर यांनी आज प्रसिद्धीस दिले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठिंब्यावर पुण्यातून लोकसभा निवडणूक जिंकल्यावर कलमाडी यांनी स्वबळाची भाषा सुरू केली आहे. हेच ‘स्वबळ’ त्यांना निवडणुकीपूर्वी का आठवले नाही. तेव्हा स्वबळावर लढायला त्यांना कोणी अडवले होते, असा प्रश्न सोंडेकर यांनी या पत्रकातून उपस्थित केला आहे. स्वत:च्या पदरात खासदारकी पडल्यानंतर आता कलमाडी यांना राष्ट्रवादीबरोबर आघाडी नको आहे. म्हणजे आता काँग्रेसच्या इतर उमेदवारांचे काहीही झाले तरी चालेल. त्यांना सत्तेपासून वंचित ठेवायचे आणि स्वत: राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्यावर स्वबळाची भाषा बोलायची, या प्रकाराची आता काँग्रेसनेच योग्य ती दखल घ्यावी, असेही आवाहन या पत्रकातून करण्यात आले आहे.