Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

नाशिक ग्रामीण पोलीस भरती प्रक्रियेच्या चौकशीची मागणी
नाशिक, २ जून / प्रतिनिधी

 

नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई पदांसाठी २००७ मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी दीपक पाटोदकर यांनी एका निवेदनाद्वारे पोलीस महासंचालकांकडे केली आहे. याविषयीची माहिती मंगळवारी पाटोदकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
नाशिक जिल्ह्य़ात २००७ मध्ये पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या प्रक्रियेत अनेक बेकायदेशीर बाबी घडल्या असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. भरतीची माहिती आपण माहितीच्या अधिकारान्वये मागण्याचा प्रयत्न केला. तथापि, ती देण्यात आली नाही. त्यामुळे आपण अपिलात गेलो होतो. अपिलाचा निर्णय आपल्या बाजूने लागूनही अपूर्ण माहिती देण्यात आली. या माहितीवरून भरती प्रक्रियेत अनेक गैरकृत्ये घडल्याचे निदर्शनास येत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. उत्तरपत्रिका न तपासताच गुणपत्रक तयार करण्यात आले तसेच तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला असल्याचे पाटोदकर यांनी म्हटले आहे. पोलीस अधीक्षकांनी भरतीमध्ये शासकीय परिपत्रके, नियम व नितीमूल्यांची, ओबीसी व इतर मागासवर्गीयांच्या मुलभूत अधिकारांची अवहेलना केल्याची तक्रार करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेत एकाही सदस्याला विचारात घेण्यात आले नाही, शासनाच्या मार्गदर्शक तत्वांची व आरक्षणाच्या नियमांची पूर्णत वाताहत करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाची पोलीस महासंचालकांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही पाटोदकर यांनी केली आहे.