Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

‘देवमामलेदार यशवंत गौरव’ पुरस्कार जाहीर
२६/११च्या हल्ल्यातील शहीद पोलिसांची निवड
सटाणा, २ जून / वार्ताहर

 

माणुसकीचे पहारेकरी आयन्युज मराठी वृत्तवाहिनीच्या वतीने देण्यात येणारा श्री संत देवमामलेदार यशवंत गौरव पुरस्कार यावर्षी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, तुकाराम ओंबळे व बागलाणचेभूमिपूत्र अरूण चित्ते यांना येथील ‘माणुसकीचे पहारेकरी-आयन्युज’ या वृत्तवाहिनीतर्फे ‘श्री संत देवमामलेदार यशवंत गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
रविवारी सायंकाळी सहा वाजता येथील राधाई मंगल कार्यालयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती वृत्तवाहिनीचे संपादक देवेंद्र वाघ यांनी दिली. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या स्थानिक वृत्त वाहिनीतर्फे देवमामलेदारांचे कार्य आजच्या काळातही पुढे नेणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या गौरवार्थ हा पुरस्कार दिला जातो. यंदाच्या पुरस्कारासाठी २६/११ च्या हल्ल्यात देशरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असल्याचे वाघ यांनी सांगितले. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आ. संजय चव्हाण असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून खा. प्रतापदादा सोनवणे, विभागीय महसूल आयुक्त डॉ. संजय चहांदे, जिल्हाधिकारी पी. वेलरासु, धुळ्याच्या जिल्हाधिकारी प्राजक्ता लवंगारे, महाराष्ट्र पोलीस अ‍ॅकॅडमीच्या संचालिका श्रीदेवी गोयल, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय पाटील, बागलाणच्या तहसीलदार इंदिरा चौधरी आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार विश्वास चंद्रात्रे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड, आय न्युजचे संचालक सुनील मोरे, पंकज पवार, सुनील पाटील यांनी केले आहे.