Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

रत्नागिरी नगराध्यक्षपदाची १८ जून रोजी निवडणूक
खास प्रतिनिधी
रत्नागिरी, २ जून

 

रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदासाठी येत्या १८ जून रोजी निवडणूक होत असून, लोकसभा निवडणूक निकालाच्या पाश्र्वभूमीवर नवी राजकीय समीकरणे जुळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
रत्नागिरी नगर परिषदेच्या २८ जागांसाठी २००६ च्या डिसेंबरमध्ये निवडणूक झाली. त्यापैकी भाजपा-सेना युती व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी १२, तर काँग्रेसने तीन जागा जिंकल्या. तसेच एक उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आला. तरीसुद्धा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या राजकीय नाटय़ामध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे उमेदवार उमेश शेटय़े अनपेक्षितपणे पराभूत झाले आणि भाजपा-सेना युतीच्या अशोक मयेकरांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. राष्ट्रवादीच्या आमदार उदय सामंत गटाचे आठ नगरसेवक त्यावेळी गैरहजर राहिल्यामुळे हे शक्य झाले. तेव्हापासून नगर परिषदेत भाजपा-सेना युती सर्व महत्त्वाची सत्ता पदे उपभोगत आहे. गेल्यावर्षी अलिखित करारानुसार मयेकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सेनेचे मधुकर घोसाळे काँग्रेसमधील याच गटा-तटाच्या राजकारणाचा फायदा घेऊन नगराध्यक्षपदी विराजमान झाले. दरम्यान, माजी नगराध्यक्ष उमेश शेटय़े, त्यांच्या पत्नी उज्ज्वला शेटय़े आणि शम्मी नागवेकर या राष्ट्रवादीच्या तिघांचे नगर परिषद सदस्यत्व पक्षांतर बंदी कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले. या निर्णयाला संबंधितांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. पण त्याबाबतचा निकाल प्रलंबित असल्यामुळे सध्या नगर परिषदेत भाजपा-सेना युती १२, राष्ट्रवादी काँग्रेस ९, काँग्रेस ३ आणि अपक्ष १ असे बलाबल आहे.
नुकत्याच झालेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या वेळी आमदार सामंत गटाने नगर परिषदेत काँग्रेसच्या नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे युतीचे आसन बळकट झाले असल्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी निवडणुकीनंतर यामध्ये लक्ष घालून राष्ट्रवादी, काँग्रेस आणि अपक्ष अशी आघाडी निर्माण करण्याचे आश्वासन राणे यांनी दिले. येत्या १८ जूनपर्यंत त्या दृष्टीने राणे काय हालचाली करतात आणि काँग्रेसचे स्थानिक नगर परिषद सदस्य त्यांना कसा प्रतिसाद देतात, यावर या आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ सदस्यांमध्ये एकजुटीचा अभाव, ही या प्रक्रियेतील आणखी एक डोकेदुखी आहे. त्याचप्रमाणे उमेश शेटय़े यांच्यासह तीन नगरसेवकांच्या अपात्रतेबद्दल उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या अर्जाची सुनावणी १६ जून रोजी आहे. त्याचा काय निकाल लागतो, यावरही नगराध्यक्ष निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.
रत्नागिरीचे नगराध्यक्षपद महिला उमेदवारासाठी राखीव झाले आहे. स्वाभाविकपणे राष्ट्रवादी आणि भाजपा-सेना युतीतील ज्येष्ठ महिला सदस्यांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. येत्या काही दिवसांत त्याबाबतच्या हालचाली आणखी गतिमान होतील, अशी अपेक्षा आहे.