Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी आय.सी.एस. कार्यप्रणाली सज्ज
नियंत्रण कक्ष कार्यान्वित
खोपोली, २ जून/वार्ताहर

 

नैसर्गिक आपत्तीचा संभाव्य धोका विचारात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. विनायक निपुण व खालापूरचे तहसीलदार रामनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यात आपत्तीजनक घटनाप्रसंगी प्रभुत्व संपादन करणारी आय.सी.एस. रचनाप्रणाली (इन्सिडन्स कमाण्ड सिस्टीम) कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती आपत्तीकालीन नियंत्रक तथा निवासी नायब तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी दिली.
आय.सी.एस. रचना प्रणालीनुसार तत्पर उपाययोजनेसाठी एकूण ११ गट स्थापन करण्यात आले आहेत. पूर्वसूचना गट, शोध व सुटका पथक, वैद्यकीय मदत निवारा पथक, वाहतूक व्यवस्थापन, अन्न पुरवठा, मृत व्यक्तींची विल्हेवाट, वीजपुरवठा आणि दूरसंचार, वित्त व प्रशासन कामकाज, पाणीपुरवठा व सांडपाणी, कायदा आणि सुव्यवस्था आदींचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. विविध विभागातील शासकीय अधिकाऱ्यांकडे या ११ गटांतील कामकाजाची जबाबदारी देण्यात आली आहे.
अतिवृष्टी, पूर, वादळ याबाबत ग्रामस्थांना-नागरिकांना पूर्वसूचना देणे, वरिष्ठांकडून येणारे संदेश पुनश्च त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आपद्ग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलविणे, मोडकळीस आलेले विद्युत व टेलिफोन खांब दुरुस्त करणे, झालेल्या नुकसानाचे तत्पर पंचनामे करून मदतीचे वाटप करणे इत्यादी कामे उपाययोजनेसाठी स्थापन करण्यात आलेल्या ११ गटांतर्फे करण्यात येणार आहेत. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना अद्ययावत प्रशिक्षणही देण्यात आलेले आहे, असा खुलासाही नियंत्रक पवार यांनी केला.
खालापूर तालुक्यात पाताळगंगा, आंबा, धावरी या नद्या वाहतात. पाताळगंगा नदीलगतची सावरोली, धामणी, खालापूर बीड खुर्द सांगडे, ठाणे न्हावे, वाशिवली-जांबरुंग (बौद्धवाडा), बोरिवली ही गावे, तर खोपोली नगर परिषद हद्दीतील विहारी, रहाटवडे, देवलाड, वासरंग, मुळगाव, शीळ, भानवज, वीणानगर हा परिसर, तसेच अंबा नदीलगतची चावणी, दूरशेत ही गावे- धावरी नदीलगतची चौक सोंडेवाडी (पोखरवाडी) ही गावे नैसर्गिक आपत्तीतील संभाव्य धोक्याची गावे ठरली आहेत. या सर्व गावांतील एकत्रित लोकसंख्या सुमारे ३५ ते ४० हजार आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन परिसरातील मंडळ अधिकारी, तलाठय़ांसह आय.सी.एस. रचनाप्रणालीत जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत.
खोपोली नगरपालिका हद्दीतील सुभाषनगर व भानवज येथील आशियाना हिल्स परिसर व चौक मंडळ अंतर्गत वाशिवली चौक, बोरिवली सोंडेवाडी (गारभाट) येथे दगड कोसळण्याचा संभाव्य धोका आहे. तशी परिस्थिती उद्भवल्यास आपद्ग्रस्तांची व्यवस्था महिंद्र मेमोरियल स्कूल (खोपोली), नेताजी पालकर विद्यालय (चौक) व जिल्हा परिषद शाळा (चौक व माथेरान) येथे तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येणार आहे.
खालापूर तालुक्यात डोणवत, भिलवले, कलोते, मोर्बा ही चार धरणे व आत्करगाव येथील एक पाझर तलाव आहे. अतिवृष्टीमुळे धरणातील व पाझर तलावातील पाणी सोडण्याची वेळ आल्यास आत्करगाव, होनाड, चिंचवली-गोहे, चौक-धारणी, वाशिवली, बोरिवली ही गावे बाधित होण्याची शक्यता आहे. दुर्दैवाने तशी आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्यास यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
आपत्तीप्रसंगी उपयोगी पडणारी साधनसामुग्री व मनुष्यबळ यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. यशवंती हायकर्स, रोटरी क्लब, लायन्स क्लब, हनुमान-मित्रमंडळ, न.पा. अग्निशमन दल यांची मदत घेण्यात येणार आहे.
नियोजनाच्या अभावामुळे खोपोली न.पा. हद्दीतील वीणानगर-भानवज, मोगलवाडी, भाऊ, कुंभारचाळ, कृष्णनगर वसाहतीत, बाजारपेठेत, शीळफाटा परिसरातील डी.सी. नगर, जैनमंदिर परिसर, शहाणे आळी परिसर इत्यादी ठिकाणी अतिवृष्टीत पुरसदृश परिस्थिती निर्माण होते. वित्तीयहानीही आढळून आली आहे, त्यामुळे मोगलवाडी, उषानगर, क्रांतीनगर, वीणानगर परिसरातून जाणारा अरुंद नाला खोलवर साफ करण्यात यावा, न. पा. हद्दीतील-नाल्यातील साफसफाई रोजच्या रोज नित्यनेमाने करण्यात यावी या नागरिकांच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्यामुळे, न.पा. प्रशासनाला नाला व गटारातून रोजच्या रोज काढलेल्या कचऱ्याची त्याच दिवशी विल्हेवाट लावण्यात यावी, असे सक्त आदेशही देण्यात आले आहेत, असे तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी निक्षून सांगितले.
नैसर्गिक आपत्तीप्रसंगी तत्परसेवा उपलब्ध करून देण्यासाठी खालापूर पोलीस स्टेशन, पंचायत समिती कार्यालय, महावितरण कार्यालय, खोपोली न. पा. कार्यालय इत्यादी ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. खालापूर तहसील कार्यालयात तत्परतेने समस्येचे निराकरण करण्यासाठी आपद्ग्रस्तांना सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेला नियंत्रण कक्ष कार्यान्वित झाला आहे, असे सांगून नागरिकांनी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास ०२१९२-२७५०४८ येथे तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन नियंत्रक चंद्रसेन पवार यांनी केले आहे.