Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

रायगड लोकशाहीदिन आत्मदहन प्रकरण
दिरंगाई जि.प. मुख्याधिकाऱ्यांची नव्हे, तर चौकशी समितीची
अलिबाग, २ जून / प्रतिनिधी

 

पनवेल तालुक्यातील कोयनावेळे ग्रामपंचायतीमध्ये कोटय़वधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे, ही वस्तुस्थिती आह़े याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ़ निपुण विनायक यांच्या आदेशाप्रमाणे चौकशी करून आम्ही त्यांना अहवाल सादरही केला होता़ तो अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पसंत पडला नाही, म्हणून त्यांनीच २१ ऑगस्ट २००८ रोजी जिल्हा पुनर्वसन अधिकारी आऱ एऩ गरुड यांच्या अध्यक्षतेखाली ‘चौकशी समिती’ स्थापन केली़ २ मार्च २००९ रोजी निवडणूक आचारसंहिता लागली, गरुड यांची बदली झाली, परिणामी चौकशी समितीचा अहवाल आला नाही़ तो आला असता तर आम्ही सत्वर कारवाई केली असती़ परिणामी या सर्व प्रकरणात आम्ही दोषी नाही, तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेली ‘चौकशी समिती’ दोषी आहे, अशी भूमिका रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास भोसले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली आह़े
रामचंद्र केशवराव कदम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाही दिनातच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे, रायगड जिल्हा प्रशासनाच्या अंगलट आलेले हे गंभीर प्रकरण रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास भोसले यांच्या गळ्यात घालून, आपण नामानिराळे राहण्याचा प्रयत्न रायगड जिल्हा प्रशासनाने केला, परंतु आज भोसले यांनी ही भूमिका व्यक्त केल्यामुळे या प्रकरणातील दोषाची सुई पुन्हा रायगड जिल्हा प्रशासनाकडेच वळली आह़े
रायगडचे जिल्हाधिकारी डॉ़ निपुण विनायक आणि रायगड जि़ प़ मुख्याधिकारी विश्वास भोसले यांच्या या कारवायी दिरंगाई प्रकरणातील आरोप-प्रत्यारोपांच्या द्वंद्वात आता या जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या चौकशी समितीचे अध्यक्ष रायगड जिल्हा पुनर्वसन अधिकारी आर.एन. गरुड आणि सदस्य रायगड जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) चंदन आ़ मोकाशी, कार्यकारी अभियंता (बांधकाम) एऩ् एम़् वेदपाठक, रा.जि.प. पेण उपविभाग शाखा अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता (पाणीपुरवठा) डी.के. महाजन हे अडचणीत येणार, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने, रायगड जिल्हाधिकारी कार्यालय आणि रायगड जिल्हा परिषद या दोन्ही कार्यालयांत मोठी अस्वस्थता निर्माण झाली आह़े
दरम्यान लोकशाही दिनात आत्मदहनाचा प्रयत्न करणारे रामचंद्र केशवराव कदम यांच्या विरुद्ध अलिबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने कदम यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत़
शिवसेना कार्याध्यक्षांकडून विशेष दखल
रायगड लोकशाही दिनातील आत्मदहन प्रयत्नासंदर्भात ‘लोकसत्ता’ने आज दिलेल्या वृत्ताची विशेष दखल शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी घेतली़, तर या संदर्भात शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी ‘लोकसत्ता’शी संपर्क साधून या प्रकरणातील संपूर्ण माहिती जाणून घेतली़ विधिमंडळाच्या मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात शिवसेना या प्रश्नावर आवाज उठविणार आह़े