Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

राज्य

विधानसभा निवडणुकीतही आघाडी आवश्यक -माणिकराव ठाकरे
अमरावती, २ जून / प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीतही जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आघाडी आवश्यक असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. शहर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाइं आघाडी ही धर्मनिरपेक्ष विचारांची आघाडी आहे. जातीयवादी शक्तींना रोखण्यात या आघाडीला चांगले यश मिळाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही ही आघाडी कायम राहावी.

चंद्रपूर जिल्ह्य़ात वीज रोधक यंत्रणा;
पोंभूर्णा व मूल येथे टॉवर्सची उभारणी
चंद्रपूर, २ जून/ प्रतिनिधी
वीज कोसळून बळी जाणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. हे अकाली मृत्यू टाळण्यासाठी शासनाने राज्यातील ३३ जिल्हय़ात विद्युत रोधक यंत्रणा उभी केली आहे. चंद्रपूर जिल्हय़ात पोंभूर्णा व मूल या दोन तालुक्यात हे टॉवर्स उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. पावसाळय़ात आकाशात कडाडलेली वीज भूतलावर कोसळून शेकडो लोकांचे बळी घेते. बळी जाणाऱ्यांमध्ये शेतात काम करणाऱ्यांचा सर्वाधिक समावेश असतो.

कापूस की सोयाबीन; शेतकरी संभ्रमात
बाजारात सोयाबीनला चांगली किंमत
नागपूर, २ जून/ प्रतिनिधी
बाजारात अलीकडच्या काळात सोयाबीनच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने कापसाकडे आकर्षित होणारा शेतकरी सोयाबीन पेरावे की कापूस अशा संभ्रमात सापडला आहे. मागील हंगामात विदर्भात मोठय़ा प्रमाणात सोयाबीनचा पेरा वाढला होता. २००७-०८ यावर्षी सोयाबीनला मिळालेली चांगली किंमत, काही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी विदर्भात येऊन सोयाबीन खरेदी केल्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा अधिक किंमत मिळाली होती.

‘देवमामलेदार यशवंत गौरव’ पुरस्कार जाहीर
२६/११च्या हल्ल्यातील शहीद पोलिसांची निवड
सटाणा, २ जून / वार्ताहर
माणुसकीचे पहारेकरी आयन्युज मराठी वृत्तवाहिनीच्या वतीने देण्यात येणारा श्री संत देवमामलेदार यशवंत गौरव पुरस्कार यावर्षी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, तुकाराम ओंबळे व बागलाणचेभूमिपूत्र अरूण चित्ते यांना येथील ‘माणुसकीचे पहारेकरी-आयन्युज’ या वृत्तवाहिनीतर्फे ‘श्री संत देवमामलेदार यशवंत गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

रायगड लोकशाहीदिन आत्मदहन प्रकरण
दिरंगाई जि.प. मुख्याधिकाऱ्यांची नव्हे, तर चौकशी समितीची
अलिबाग, २ जून / प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील कोयनावेळे ग्रामपंचायतीमध्ये कोटय़वधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे, ही वस्तुस्थिती आह़े याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ़ निपुण विनायक यांच्या आदेशाप्रमाणे चौकशी करून आम्ही त्यांना अहवाल सादरही केला होता़ तो अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पसंत पडला नाही, म्हणून त्यांनीच २१ ऑगस्ट २००८ रोजी जिल्हा पुनर्वसन अधिकारी आऱ एऩ गरुड यांच्या अध्यक्षतेखाली ‘चौकशी समिती’ स्थापन केली़ २ मार्च २००९ रोजी निवडणूक आचारसंहिता लागली, गरुड यांची बदली झाली, परिणामी चौकशी समितीचा अहवाल आला नाही़

शिवज्योतीसह शिवभक्तांचा ताफा सोलापुरातून रायगडला रवाना
सोलापूर, २ जून / प्रतिनिधी

येत्या शुक्रवारी ५ जून रोजी रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी सोलापुरातील शिवप्रभू प्रतिष्ठानच्या चारशे शिवभक्तांचा ताफा तुळजापूर येथून श्री तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादाची शिवज्योत घेऊन शहरात दाखल झाला. शिवाजी चौकातील अश्वारूढ शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या शिवभक्तांच्या ताफ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
शिवप्रभू प्रतिष्ठानचे संस्थापक तथा शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे, राजन जाधव, नागनाथ जाधव, शिवाजी भोसले आदींनी या शिवभक्तांच्या ताफ्याचे स्वागत केले. या वेळी आशुतोष बरडे, समीर गायकवाड, पिंटू पवार, बाबासाहेब जाधव, अतुल शेटे, संतोष पवार, नितीन मोरे, रवी गाडे आदी शिवभक्तांनी शिवज्योत पायी चालत रायगडावर नेण्याचे नियोजन केले आहे. त्यांना प्रोत्साहनपर शुभेच्छा देण्यात आल्या. नंतर हा शिवभक्तांचा ताफा ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या घोषणा देत रायगडकडे रवाना झाला.

दानपेटीतील रोकड लंपास
सांगली, २ जून / प्रतिनिधी

सांगली शहरातील झुलेलाल मंदिराच्या दानपेटीतील १२ हजार रूपयांची रोकड अज्ञाताने लंपास केली. याशिवाय घनश्यामनगर व बालाजीनगर येथेही चारठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला.
येथील झुलेलाल मंदिराच्या गाभाऱ्यातील खिडकीतून प्रवेश करून अज्ञाताने दानपेटी फोडून त्यातील १२ हजार रूपयांची रोकड लंपास केली. ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत संतोष चावला यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतही घनश्यामनगर येथील एस. जी. लामतुरे यांच्या घरातील सिलेंडरही अज्ञाताने चोरला. तसेच रफिक इनामदार व संतोष प्रकाश इंगळे यांच्या घरीही चोरीचा प्रयत्न झाला. बालाजीनगर येथेही काल भुरटय़ा चोरांनी चोरीचा प्रयत्न केला.

बनावट नेमणूकपत्र देऊन फसवणूक, तिघांना अटक
देवळाली प्रवरा, २ जून/वार्ताहर

कृषी सहायक पदाचे बनावट नेमणूक आदेश देऊन फसवणूक करू पाहणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवून राहुरी पोलिसांनी त्यांना अटक केली. आरोपींमध्ये बांधकाम व्यावसायिक व तोतया पत्रकाराचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात कृषी सहायक पदाचे बनावट नेमणूक आदेश तयार करून कृषी विद्यापीठाचा रबरी शिक्का व उपकुल सचिव यांची संगणकाद्वारे सही तयार करून ५ तरुणांना वरील तिघे फसवू पाहत होते. अल्ताफ इस्माईल शेख (४५, जुना बाजार, नगर), बांधकाम व्यावसायिक कमाल खान (५०, वरवंडी, तालुका राहुरी) व तोतया पत्रकार प्रदीप विनायक गिरी (४५, विरार) या तिघांना पोलिसांनी आज अटक केली. या तिघांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी सहायक पदाची बनावट नेमणूकपत्रे तयार केली. नेमणूकपत्र मिळाल्यानंतर आरोपींना प्रत्येकी (एका उमेदवारामागे) ३ लाख रुपये द्यायचे ठरले होते. परंतु नेमणूकपत्रे बनावट असल्याचे आढळून आल्याने उमेदवार सावध झाले.