Leading International Marathi News Daily
बुधवार, ३ जून २००९
  आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्रातील संधी
वर्ल्ड बँकेतील करिअर्स
  करिअर सल्ला
पैलूदार अन् बावन्नकशी!
  करिअर नामा
यू-टय़ूबची महती
  स्कॉलरशीप
न्यूझीलंडमधील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती
  मोठी स्वप्नं
  संशोधनगाथा
संशोधन लेखकाचा हेतू
  स्पर्धा परीक्षांचे जग
बी.एड्. सीईटी
  स्वयंरोजगार
उद्योगाच्या यशस्वितेसाठी..
  शालेय शिक्षणात ग्रंथालयांचा वापर

स्पर्धा परीक्षांचे जग
बी.एड्. सीईटी
स्पर्धा सर्वच क्षेत्रात असल्याने शिक्षण क्षेत्र यापासून दूर कसे राहील? २००५ सालापासून बी.एड्. अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांची निवड ही स्पर्धा परीक्षेतून केली जाते. त्यामुळे शिक्षक म्हणून करिअर करण्याचे निश्चित केलेल्या उमेदवारांना याची पूर्णपणे जाणीव असेलच. म्हणून बी.एड्.साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या महिन्यात उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून अधिसूचना जाहीर झाल्यानंतर दिलासा मिळालेला असेल.
शिक्षण व्यवसायाबद्दल निष्ठा, आत्मियता, आवड व योग्यता असणारे व्यक्तिमत्त्व तयार करण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात वावरताना प्रत्येक व्यवसाय क्षेत्रामध्ये बदलत्या काळानुसार सापेक्षरीत्या बदल करून
 

आपल्यासमोरील आव्हानांचा व समस्यांचा योग्य पद्धतीने जाणीवपूर्वक सामना करण्याची व्यवस्था प्रत्येक क्षेत्रात केली जाते. प्रत्येक व्यवसाय क्षेत्राला आपली प्रगती, यश व गुणवत्ता साध्य करण्यासाठी जाणीवपूर्वक बदल करणे आवश्यक असते म्हणूनच सर्वच क्षेत्रांमध्ये त्या त्या व्यवसायास आवश्यक पाश्र्वभूमी, कल व पात्रता असणारे विद्यार्थी मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षा घेतली जाते. त्यामुळे या प्रवेश परीक्षेचा उद्देश शिक्षण व्यवसायाच्या दृष्टीने योग्यच ठरणार आहे.
बी.एड्. सीईटी प्रवेश प्रक्रिया व अभ्यासक्रम
बी.एड्. प्रवेश प्रक्रियेसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत मानसिक क्षमता चाचणी, सामान्य ज्ञान, शिक्षक अभिक्षमता हे विषय
असून एकूण ५० गुणांची ही परीक्षा असते. यात मानसिक क्षमता चाचणीचा ३० टक्के भाग म्हणजे १५ गुण तर सामान्य ज्ञानाचा ३० टक्के भाग म्हणजे १५ गुण व शिक्षक अभिक्षमता हा भाग ४० टक्के म्हणजे २० गुण अशी विभागणी केली आहे. सीईटीसोबत इंग्रजी माध्यमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एका तासाची ५० गुणांची इंग्रजी भाषा ज्ञान चाचणी असेल तसेच यात प्रश्नांची
संख्या ५० असेल.
मानसिक क्षमता चाचणी : मानसिक क्षमता चाचणी या घटकातील एकूण १५ गुण असून त्यामध्ये शाब्दिक बुद्धिमापन चाचणी व अशाब्दिक बुद्धिमापन चाचणी असे दोन विभाग पडतात. अशाब्दिक बुद्धिमापन चाचणी या विभागात आकृतीशी संबंधित प्रश्न विचारले जातात. यात आकृतीची मालिका पूर्ण करणे, आकृतीशी संबंधित आकृती पर्यायांतून निवडणे, दिलेल्या आकृतीतील वेगळी आकृती शोधणे, समान आकृत्यांचा गट तयार करणे, लपलेली आकृती शोधणे, एखादा कागद ठरावीक पद्धतीने घडी घालून पुन्हा उघडल्यास तो कसा दिसेल? हे पर्यायातील आकृतीतून निवडणे अशा प्रश्नांचा यात समावेश केलेला असतो.
शाब्दिक बुद्धिमापन चाचणी या घटकात संख्या मालिका, वर्णमालिका, समान- संबंध, आकृतीतील संख्या अथवा वर्ण शोधणे, अंकांची लयबद्ध रचना, अक्षरांची लयबद्ध रचना, नाते-संबंध, दिशाविषयक प्रश्न, वेन-आकृत्या, विधाने-अनुमान, तुलनात्मक प्रश्न, बैठक व रांगेतील प्रश्न, माहितीचे पृथक्करण, कंसातील संख्या शोधणे, घडय़ाळ व कालमापनावरील प्रश्न अशा प्रश्नांचा यात समावेश केलेला असतो.
सामान्य अध्ययन : सामान्यज्ञान या घटकात सामान्य इतिहास, सामान्य भूगोल, राज्यशास्त्र व नागरिकशास्त्र, विज्ञान
व तंत्रज्ञान, साहित्य, शिक्षण व चालू घडामोडी या विषयांचा समावेश आहे. चालू घडामोडी या घटकात राजकीय, आर्थिक, कला व क्रीडा या चालू घडामोडींचा समावेश असतो. त्याचप्रमाणे इतिहास या घटकात साधारणपणे महाराष्ट्राचा इतिहास यावर प्रश्न असतात.
सामान्य ज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी प्रथम पाठय़पुस्तकांचा अभ्यास व्यवस्थितपणे करणे आवश्यक आहे. इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतची इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, नागरीकशास्त्र या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे.
चालू घडामोडींचा अभ्यास करताना रोज ज्ञानात भर घालणारे वर्तमानपत्र वाचणे जरूरी आहे.
शिक्षण अभिक्षमता- या घटकात अद्ययावत विषयज्ञान, नेतृत्वगुण, संप्रेक्षण, व्यावसायिक निष्ठा त्याचप्रमाणे शिक्षण व समाजातील बदलाबाबत सजगता यांचा समावेश असतो. या प्रश्नांद्वारे उमेदवाराची शिक्षक अभिक्षमता तपासली जाते. म्हणजेच आपण फुरसतीचा वेळ कसा घालविता? या प्रश्नाद्वारे विषयज्ञान अद्ययावत ठेवता किंवा नाही हे तपासले जाते. तर व्यावसायिक निष्ठा तपासताना- समजा तुम्ही शिक्षक आहात आणि तुमच्या असे लक्षात येते की, तुमचे सहकारी शिक्षक हे व्यावसायिक नैतिकतेचे उल्लंघन करत आहेत तर तुम्ही काय कराल? असे प्रश्न िवचारले जातात. त्याचप्रमाणे तुम्ही शिक्षकाचा व्यवसाय निवडण्यामागचे कारण काय? असे प्रश्न विचारले जातात. शिक्षक अभियोग्यता या घटकात आपला शिक्षणाबद्दलचा कल तपासला जातो.
या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी १८ गुणांची आवश्यकता असली तरी बरीच तयारी करावी लागणार आहे. सामान्यज्ञान या विभागात विविध विषयांतील ज्ञान तपासले जाते, तर मानसिक क्षमता चाचणी या विभागात उमेदवाराची विचार करण्याची क्षमता तपासली जाते. विषयातले अद्ययावत ज्ञान, नेतृत्वगुण, व्यावसायिक निष्ठा, शिक्षण क्षेत्रातील कल यातून अभिक्षमता तपासली जाते. स्पर्र्धेच्या या युगामध्ये कोणत्याही व्यवसायामध्ये पडण्यापूर्वी त्याची व्यावसायिक माहिती, पात्रता, गुणवत्ता व आवड त्या त्या व्यक्तीमध्ये असणे आवश्यक आहे. या गुणांचा जर त्या व्यक्तीमध्ये अभाव असेल तर त्या व्यवसायाच्या दृष्टीने अगर व्यक्तीच्या दृष्टीने ते मारक ठरू शकते. भावी पिढी निर्माण करण्याची जबाबदारी संपूर्णपणे आज शिक्षकांवर आहे. त्यामुळे त्यांना स्वत:ला या परीक्षेतून जाणे आवश्यक आहे. शिक्षण म्हणजे व्यक्तीचा सर्वागीण विकास. हा विकास म्हणजे व्यक्तीचा ज्ञानात्मक, क्रियात्मक, भावात्मक विकास होय.
आपली शिक्षणपद्धती ही याच तत्त्वावर आधारलेली आहे. विद्यार्थ्यांच्या बालमनावर ज्याप्रमाणे संस्कार होतील त्याप्रमाणे त्याचं व्यक्तिमत्त्व तयार होतं. जर या बालवयात त्यावर योग्य संस्कार झाले नाहीत तर त्याचे दुष्परिणाम त्या व्यक्तीलाच नव्हे तर कुटुंबाला, समाजाला व देशाला भोगावे लागतील. विद्यार्थी हा अनुकरणीय असतो, त्यामुळे तो सर्वात जास्त वेळ जवळ असणाऱ्या, त्याच्यासाठी आदर्श असणाऱ्या शिक्षकाचे अनुकरण सर्वात पहिल्यांदा करतो. त्यामुळे स्वत: शिक्षकाने आदर्श होण्यासाठी नेतृत्वगुण, व्यावसायिक निष्ठा, शिक्षण व समाजाच्या बदलातील सजगता, शिक्षण व समाजाप्रती आदर, सतत शिकण्याचा प्रयत्न या गोष्टी अवलंबिल्या पाहिजेत. म्हणूनच तयारीला लागा. चांगले आदर्श शिक्षक बनण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा व त्यासाठी प्रवेश परीक्षेच्या तयारीला लागा.
परीक्षेसाठी शुभेच्छा.
प्रा. संजय मोरे
फोन : ९३२२३५०४६६