Leading International Marathi News Daily
बुधवार, ३ जून २००९
  आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्रातील संधी
वर्ल्ड बँकेतील करिअर्स
  करिअर सल्ला
पैलूदार अन् बावन्नकशी!
  करिअर नामा
यू-टय़ूबची महती
  स्कॉलरशीप
न्यूझीलंडमधील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती
  मोठी स्वप्नं
  संशोधनगाथा
संशोधन लेखकाचा हेतू
  स्पर्धा परीक्षांचे जग
बी.एड्. सीईटी
  स्वयंरोजगार
उद्योगाच्या यशस्वितेसाठी..
  शालेय शिक्षणात ग्रंथालयांचा वापर

स्वयंरोजगार
उद्योगाच्या यशस्वितेसाठी..
मनुष्यबळ व्यवस्थापन (एचआर मॅनेजमेंट )
इंडस्ट्री बदलते आहे. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आता एचआर प्रोफेशनल्सची गरज भासत आहे. उद्योगाच्या यशासाठी आणि जागतिकीकरणाने उदयाला आलेले आणि विस्तारलेले क्षेत्र म्हणून ह्य़ुमन रिसोर्स मॅनेजमेंट आवश्यक ठरत आहे. प्रमोशन,
 

सॅलरी, ट्रान्स्फर याबरोबर आता परफॉर्मन्स मॅनेजमेंट, कंपनीच्या पॉलिसी यातही प्रोफेशनल्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. बिझनेस ओरिएण्टेड अ‍ॅप्रोचमध्ये एचआर डिपार्टमेंट, स्टाफचे अप्रोझल, परफॉर्मन्स, कंपनी पॉलिसीज आणि एकूण उद्योगाच्या यशासाठी या गोष्टी आवश्यक ठरत आहेत.
उद्योजकाने एक लक्षात घेतले पाहिजे की, सहकाऱ्यांची-कर्मचाऱ्यांची साथ ही उद्योगाच्या यशासाठी महत्त्वपूर्ण आहे.
आज जागतिकीकरणाच्या रेटय़ात चांगला कामगार नेमून त्याला कायमच कामावर ठेवणं हे कठीण होऊन बसलं आहे. जागतिकीकरणामुळे मिळणारा पगार, कामाच्या ठिकाणचं वातावरण, व्यवस्थापनाने सोपवलेल्या कामाचा आवाका बदलल्यामुळे कामगारांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत. योग्य कर्मचारी, कुशल कर्मचारी तयार करणे हे सुद्धा एक आव्हानच आहे.
उद्योजकाने आपल्या कामगारांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घ्यायला हवं. त्यामुळे त्यांची निर्णयक्षमता वाढते, आपल्या निर्णयाला मान दिला जातो अशी भावना वाढीस लागून हुरूप वाढतो. आत्मविश्वास वाढतो आणि आपण ज्या संस्थेत काम करतो त्याविषयी त्याचा आदर दुणावतो.
अचूक कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे ही उद्योग व्यवस्थापनातील महत्त्वपूर्ण बाब आहे.
कामाची जबाबदारी सोपवणे (Delegation of Work)- घरी आपल्या आईचे उदाहरण घ्या. ती सुट्टीच्या दिवशी प्रत्येकाला कामे वाटून देते. त्यामुळे काय होतं प्रत्येकजण काम करतो. ज्या कामाला सहा तास लागणार आहेत ते काम दोन तासांत पूर्ण होते. शिवाय प्रत्येकाने एक जबाबदारी पार पडली याचा वेगळा आनंद चेहऱ्यावर दिसतो.
उद्योग म्हटला की सतराशे साठ कामे असतात. उत्पादनाची निर्मिती, त्याचे वितरण, विक्री व्यवस्था, विक्रेत्यांशी बैठका, शासकीय कार्यालयाशी संपर्क, पत्रव्यवहार, ई-मेल, दूरध्वनीवरून संपर्क इ. ही व अशी अनेक कामे असतात. एकच माणूस सर्व कामे कशी करू शकेल? त्यामुळे कामाच्या जबाबदाऱ्या सोपवणे खूप महत्त्वपूर्ण असते. कर्मचाऱ्यांना कामाची जबाबदारी सोपावणे, कामाची विभागणी करणे यासाठीसुद्धा एका विशिष्ट तंत्राचा वापर करावा लागतो.
उद्योग यशस्वी होण्यामागे मनुष्यबळ व्यवस्थापनाचा खूप मोठा सहभाग असतो. त्यामुळे आपल्या कामगारांवर, सहकाऱ्यांवर विश्वास ठेवा. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा. त्या व्यक्तीला काम सोपवल्यावर ती व्यक्ती ती जबाबदारी पेलू शकते का याचा अंदाज घ्या. कामाचे नियोजन कसे करायचे, जबाबदारी कशी पार पाडायची, ठराविक कालावधीमध्ये काम कसं पूर्ण करायचे याची माहिती द्या.
प्रशिक्षणावर भर- तुमच्या कामगारांना तुम्ही उद्योगविषयक दिलेले प्रशिक्षण, ज्ञान ही तुमची उद्योगातील गुंतवणूक आहे. प्रशिक्षणामुळे कामाचा दर्जा तर उंचावतोच तसेच कामाला गती मिळते.
प्रोत्साहन द्या- आपल्या कामगारांना सतत प्रोत्साहन देत राहणे, शाबासकी देणे, कौतुकास्पद उद्गार काढणे हे त्यांना नवीन कामासाठी प्रेरित करण्यासाठी उपयुक्त ठरेल. कंपनीसंबंधातील प्रत्येक गोष्टीची माहिती कामगारांना असू द्या. ही माहिती हाती असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावेल. कामगारांना समजून घ्या. त्यांच्या प्रश्नांना जाणा. कामगाराला जे काही काम द्याल त्याची डेडलाईन म्हणजेच काम पूर्ण करण्याचा कालावधी, कामाचा उद्देश काय आहे त्याची तपशीलवार माहिती, कामाचा उद्देश स्पष्ट करा जेणेकरून सर्वकष माहिती मिळाल्यावर ते काम चोखपणे पार पाडण्याचा तो प्रयत्न करेल व आपल्यावर महत्त्वपूर्ण कामाची जबाबदारी सोपवली म्हणून तो समाधानी राहील. ते काम अधिकाधिक चोख कसे होईल याचा तो विचार करेल. काम चोखपणे पूर्ण केल्यावर सर्वासमोर त्याचे कौतुक करा.
‘‘दोन शब्द कौतुकाचे
पण काम होईल लाखमोलाचे’’

उद्योगातील निर्णय प्रक्रियेत कामगारांचा सहभाग अवश्य असावा कारण तुमच्या सहकाऱ्यांकडे, कामगारांकडे विविध प्रकारच्या कल्पना असतील, त्या कल्पनांचा उपयोग तुम्हाला निश्चितच होईल.
० खरं सांगायचं तर यशस्वी बॉस व्हायचं असेल तर तुमच्या अ‍ॅटिटय़ूडमध्ये थोडा बदल करायला हवा.
० तुमचे कामगार किंवा सबॉर्डिनेटस जे असतील त्यांना कामाच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून द्या.
० बहुतेक वेळा जास्त बॉसिंगमुळे ही कामं पूर्ण होत नाही. अशा वेळेस ‘डेडलाईन ठरवा’ आणि त्याप्रमाणे कामाची आखणी करून कर्मचाऱ्यांच्या पदाप्रमाणे त्याची विभागणी करा.
० कर्मचाऱ्यांना त्यांच्या अपेक्षा, कामातील बदल, त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी एखादी मीटिंग अ‍ॅरेंज करा. त्यांच्या शंकांचे निरसन करा.
० मनुष्यबळ व्यवस्थापन हे कौेशल्य प्रत्येक बॉसने कर्मचाऱ्यांशी कौशल्याने वागून त्यांच्या कामाचं योग्य वेळी कौेतुक केलं पाहिजे. कर्मचाऱ्यांना सतत कामासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक ठरते.
० व्यवस्थापनातील पहिले तत्त्व म्हणजे तुम्ही किती काम करता हे महत्त्वाचे नाही तर तुम्ही इतरांकडून किती काम करून घेता हे महत्त्वाचे आहे.
कर्मचारी व्यवस्थापनातील महत्त्वाचा भाग म्हणजे कर्मचाऱ्यांची चांगल्या कामासाठी सार्वजनिक स्तुती करा पण खाजगीत त्यांच्या चुका निदर्शनास आणून द्या.
० कर्मचाऱ्यांचे विचार, मते नीट ऐकून घ्या. तुमच्या व्यावसायिक यशासाठी त्यांची मते फायदेशीर ठरतील.
० उत्कृष्ट नेता होण्यासाठी, उत्कृष्ट वक्ता व्हा. चागंले संभाषण कौशल्य मनुष्यबळ व्यवस्थापनातील महत्त्वाची बाब आहे.
० काम पूर्ण व्हायचे असेल तर सोपवलेल्या कामामध्ये सारखे मध्ये मध्ये येऊ नका.
० प्रयत्न केल्यास सर्वसामान्यांकडूनही असामान्य काम करवून घेता येईल.
० एकीचे बळ मोठे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना एकसंध बांधा.
० प्रशिक्षण द्या, उपदेश करू नका.
० लक्षात ठेवा, ''Dont React... Respond''
० कर्मचाऱ्यांना कामावर मूलभूत सुविधा जरूर द्या. चहा, नाश्ता, कँटीनच्या सोई पुरवा.
० ऑफिसमध्ये बॉक्सला Suggestion Box जरूर जागा द्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरचं दडपण कमी होईल व आपली मते ते मांडू शकतील.
सारिका भोईटे-पवार
फोन: ९८१९५९७१३२/ २५३७९९४४.